चिखलदरा शहरात पाण्याचा ठणठणाट

- पर्यटकांसोबत नागरिकही अडचणीत
- टँकरने नाममात्र पाणीपुरवठा

    दिनांक :30-Jun-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
धारणी, 
Water stagnation : चिखलदरा शहराचे वातावरण सध्या पर्यटकांना आकर्षित करीत असून निसर्गाच्या सानिध्याचा लाभ घेण्यासाठी हजारो पर्यटक विदर्भाच्या नंदनवनात पोहचत आहेत. मात्र, नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधीकरणतर्फे पेयजल पुरवठा होत नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे. शहरात टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या घोषणा मात्र प्रचंड करण्यात आल्या; पण, ‘उंटाच्या तोंडात जिरे’ याप्रमाणे पाणी पुरवठा असल्याने जनता त्रस्त झालेली आहे.
 
Water stagnation
 
चिखलदरा नगरपालिका आणि जीवन प्राधीकरणाचे अधिकारी मुख्यालयी राहात नाहीत. परतवाडा किंवा अमरावतीमध्ये राहून कारभार पाहतात, म्हणून पिण्याच्या पाण्याची टंचाई व तीव्रता त्यांना समजणे अवघड आहे. एका माहितीप्रमाणे, चिखलदरा शहराला पाणी पुरवठा करणार्‍या जलस्त्रोतात पाणीच नाही. पाणी शिल्लक नसल्याचे पण अनेक कारणे आहेत. एक महिन्यापूर्वी एका ठेकेदाराला बांधकामासाठी पाण्याची आवश्यकता होती, त्यावेळी अधिकार्‍यांच्या संगनमताने पिण्याच्या पाण्याचा साठा बांधकामासाठी सोडण्यात आलेला होता, म्हणून 10 जून नंतर पाण्याचा ठणठणाट चिखलदरा शहरात झालेला आहे.
 
 
याविषयी माहिती देण्यासाठी शहरात कोणताच अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना पाण्यासोबत माहितीचा अभाव पण सहन करावा लागत आहे. दरम्यान चिखलदरा शहरात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचा गाजावाजा करण्यात आला. पण प्रत्यक्षात दिवसात दोन टँकरने पाणी पुरविल्या गेल्याची माहिती आहे. शहरात स्थायिक लोकसंख्या आणि पर्यटकांना धरून 5 हजार नागरिक आहेत. अशा अवस्थेत दोन टँकर पाणी म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे यासारखे आहे. पर्यटक आणि शहरातील जनता यावेळी पाण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यायला विवश आहे. नगरपालिका व प्राधीकरणाने कोणतेच नियोजन केले नाही. यामुळे समस्येने विक्राळ रुप धारण केले आहे. चिखलदर्‍याचे वातावरण आल्हाददायक असले तरी पर्यटक व नागरिक थेंबा-थेंबाकरिता व्याकुळ दिसत आहेत.