श्रीसमर्थ रामदासस्वामी लिखित वाल्मीकि रामायणाच्या संपादित खंडांचे प्रकाशन

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते बुधवारी राष्ट्रार्पण

    दिनांक :01-Jul-2023
Total Views |
पुणे, 
Srisamartha Ramdasswami धुळे येथील श्रीसमर्थ वाग्देवता मंदिरातर्फे श्री समर्थ रामदास स्वामीलिखित वाल्मीकि रामायणाच्या संपादित आवृत्तीच्या आठ खंडांचा प्रकाशन सोहळा बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वाजता हा सोहळा होणार आहे, अशी माहिती येथे झालेल्या पत्रपरिषदेत धुळेस्थित श्रीसमर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष अनंत चितळे, मंदिराचे विश्वस्त विनय खटावकर व पुणेस्थित समर्थ व्यासपीठाचे उपाध्यक्ष सुहास क्षीरसागर यांनी दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फुलगाव येथील श्रृतिसागर आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघचालक नानासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
 
 
SWAMI
प्रकल्पाविषयी श्रीसमर्थांनी १६२० ते १६३२ या आपल्या टाकळी येथील तपश्चर्येच्या काळात नाशिकमधील विद्वानांकडून संस्कृतमधील वाल्मीकि रामायणाची प्रत मिळवून, आपले आराध्य दैवत असणाèया प्रभू श्री रामचंद्रांचे चरित्र स्वहस्ते लिहून काढले. रामायणाच्या सात कांडांच्या संस्कृत श्लोकांची एकंदर १७२० पृष्ठे समर्थांनी आपल्या हस्ताक्षरात लिहून काढली. विसाव्या शतकात समर्थ संप्रदायातील थोर संशोधक, Srisamartha Ramdasswami लेखक कै. शंकर श्रीकृष्ण देव यांनी श्रीसमर्थांची ग्रंथ संपदा जतन करण्यासाठी १९३५ मध्ये धुळे येथे श्री समर्थ वाग्देवता मंदिर या संस्थेची स्थापना केली. श्रीसमर्थांची वास्तव्य स्थाने तसेच त्यांची आणि त्यांच्या शिष्यांच्या अफाट ग्रंथ संपदेची सुमारे चार हजार हस्तलिखिते त्यांनी देशभर फिरून जतन केली. यात ही समर्थांच्या हस्ताक्षरातील वाल्मीकि रामायणाची मिळालेली संपूर्ण प्रत धुळ्याच्या श्री समर्थ वाग्देवता मंदिरात सध्या अत्यंत आधुनिक पद्धतीने जतन करण्यात आलेली आहे.
 
 
श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर यांच्यातर्फे श्री समर्थ रामदासस्वामी लिखित वाल्मीकि रामायणाच्या मूळ प्रतीचे कांडनिहाय संपादन करून मूळतः असलेल्या सात कांडांचे आवृत्तीच्या आठ खंडांमध्ये रूपांतरित करून ते प्रकाशित करण्याचा संकल्प २०१० मध्ये करण्यात आला होता. त्यानुसार सुमारे तेरा वर्षांच्या अखंड संशोधन व संपादन प्रकल्पांनंतर बुधवारी या खंडांचे प्रकाशन होत आहे.
सध्या जगात सुमारे ४४ देशांत वाल्मीकि रामायणावर विविध विद्यापीठांत संशोधन आणि अभ्यास केला जात आहे. परंतु, या संशोधनासाठी ज्या वाल्मीकि रामायणाच्या हस्तलिखिताचा आधार घेतला जातो, ती प्रत समर्थांच्या कालखंडानंतरची आहे. या पृष्ठभूमीवर, सुमारे ४०० वर्षांपूर्वी समर्थांनी एकहाती सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली ही प्रत जगात चालणाèया या संदर्भातील संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक मूळ स्रोत ठरणारी आहे. म्हणूनच ही सर्वांत जुनी प्रत संशोधनासाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री समर्थ वाग्देवता मंदिर संस्थेने २०१० पासून वाल्मीकि रामायण संशोधन प्रकल्प सुरू केला होता.
 
 
या संशोधन ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यात समर्थांच्या हस्ताक्षरातील स्कॅqनग केलेली पाने, त्यापुढे संस्कृत श्लोक, त्याचा मराठी आणि इंग्रजी भाषेतील अनुवाद, समर्थांच्या लेखन शैलीवरील व्याकरणात्मक प्रबंध, इंग्रजी शब्दांची सूची, प्रभू श्रीरामांच्या सुमारे २०० विशेषणांसह इतर शेकडो शब्दांवर निवडक टिपा यांचा या सर्व ग्रंथात समावेश आहे. विशेष म्हणजे, समर्थांनी हस्तलिखित लिहिताना रामायणातील निवडक प्रसंगांवर काढलेल्या अनेक सुबक चित्रांची स्कॅqनग केलेली पानेही यात प्रसिद्ध केली गेली आहेत. प्रत्येक कांडानंतर समर्थांनी आपली नाम मुद्रा आणि तिथी लिहिलेली असल्याने या प्रतीच्या अस्सलतेबद्दल शंका घेण्यास जागा उरत नाही. या मागील १३ वर्षे चाललेल्या संशोधन प्रकल्पासाठी पुणे, मुंबई, सातारा, नागपूर, धुळे, दिल्ली आदी देशभरातील विविध शहरांतील २७ संशोधक, संस्कृत तज्ज्ञ, भाषा तज्ज्ञ, व्याकरणकार, वैदिक यांनी मोठी मेहनत घेतलेली आहे, अशी माहितीही या पत्रपरिषदेत देण्यात आली.