आमदार प्रताप अडसड धावले प्रवशांच्या मदतीला

11 Jul 2023 21:26:00
तभा वृत्तसेवा
चांदूर रेल्वे, 
अकोला जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडल्याने मध्य रेल्वेच्या माना ते मूर्तीजापूर रेल्वे मार्गावरील एक ठिकाणची रेल्वे रूळाखालची गिट्टी वाहून गेली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. काही गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. यामध्ये शेकडो प्रवासी अडकले होते. यात अडकलेल्या चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुक्यातील जवळपास 70 प्रवाशांसाठी MLA Pratap Adsad आमदार प्रताप अडसड यांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर मध्यरात्री 3.30 वाजता प्रवासी मूतीर्र्जापूरवरून चांदूर रेल्वेला पोहचले.
 
MLA Pratap Adsad
 
मूर्तीजापूर तालुक्यातील माना या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे एका ठिकाणची रेल्वे रूळाखालील गिट्टी व माती वाहून गेल्याने भुसावळ मध्य रेल्वे मंडळाकडून सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली. यामध्ये वर्धा ते भुसावळ पॅसेंजर गाडीचा सुद्धा सहभाग होता. पॅसेंजर गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील प्रवासी असल्याने प्रवाशांना परतीच्या प्रवासासाठी बराच काळ थांबावे लागणार असल्याने प्रशासनातर्फे तातडीने त्यांना माना येथून मूर्तीजापूर रेल्वे स्टेशनला परत नेण्यात आले. यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघातील प्रवाशांनी MLA Pratap Adsad आमदार प्रताप अडसड यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला व त्यांना गावी परत येण्याकरिता व्यवस्था नसल्याबाबत माहिती दिली.
 
 
आ. अडसड MLA Pratap Adsad यांनी तातडीने प्रशासनाच्या मदतीने आणि अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर व मूर्तीजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या मदतीने मूर्तीजापूर येथील बस स्थानक आगारप्रमुखांशी संपर्क साधून धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे येथील प्रवाशांना घरी सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था केली. स्वतः काळजीपूर्वक लक्ष देऊन आमदार अडसड यांनी सोमवारी 8 वाजतापासून तर मध्यरात्री 3.30 वाजेपर्यंत प्रवाशांशी संपर्क सुरू ठेवला. एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमदार अडसड यांना मदत मागितली असता त्यांनी पूर्णतः आम्हाला मदत केली, असे प्रवाशांनी म्हटले. ज्या 70 प्रवाशांना सुखरूपरीत्या घरी आणण्यात यश आले, त्या प्रवाशांनी प्रताप अडसड यांचे आभार मानले आहे. यामध्ये 17 प्रवासी चांदूर रेल्वे तालुक्यातील तर उर्वरित धामणगाव रेल्वेतील होते. यात चांदूर रेल्वेचे आगारप्रमुख पवन देशमुख तसेच मूर्तीजापूरचे आगारप्रमुख यांचे सहकार्य लाभले.
Powered By Sangraha 9.0