तभा वृत्तसेवा
गोंदिया,
वाचकहो, शिर्षक वाचून जरा संभ्रमात पडले असाल. होय हे मात्र खरे आहे. दीड वर्षापुर्वी Gondia Zp गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींची निवड झाली. या सभापतींना खाते वाटपही झाले. मात्र जिल्हा परिषदेच्या संबंधित यंत्रणेने गोंदिया जिल्हा परिषदेच्या साईटवर पाच पैकी दोन सभापतींची खातीच दर्शविली नसल्याची बाब आज मंगळवारी जिल्हा परिषदेच्या साईटला भेट दिल्यावर निदर्शनास आले. यावरून तंत्रज्ञानात प्रगत असल्याचा उदोउदो करणारी गोंदिया जिल्हा परिषद किती अद्यावत असल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषद Gondia Zp मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध योजना, उपक्रम राबविले जातात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शासकीय योजनांची माहिती, जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांची व इतर माहिती नागरिकांना व्हावी म्हणून गोंदिया जिल्हा परिषदेची साईट आहे. साईटच्या मुख्य पानावर जिपमध्ये असलेले 16 विभाग, पदाधिकारी, अधिकारी, विषय समिती, संरचना, पर्यटन, पंचायत समिती यांची माहिती दर्शविण्यात आली आहे.
यासंदर्भात जाणून घेण्यासाठी विभागांच्या मेनूवर गेले असता, त्यात बहुतांश माहिती जुनीच असल्याचे दिसून आले. पदाधिकारी मेनूवर गेले असता त्यात अध्यक्ष पंकज रहांगडाले, उपाध्यक्ष यशवंत गणवीर, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, समाजकल्याण सभापती पूजा सेठ यांची खाती दर्शविण्यात आली आहेत. Gondia Zp मात्र सभापती संजय टेंभरे व रुपेश कुथे यांची खाती दर्शविण्यात आली नसल्याचे दिसून आले. वर्षभरापुर्वीच टेंभरे व कुथे यांना अनुक्रमे बांधकाम, अर्थ व कृषी, पशुसंवर्धन खाते प्राप्त झाले. असे असताना गोंदिया जिल्हा परिषदेच्या तांत्रिक विभागाला संबंधित सभापतींचे खाते साईटवर दर्शविण्याचे कसे सूचले नाही, हा प्रश्नच आहे. या साईटला रोज शेकडो लोक भेट देतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात गोंदिया जिल्हा परिषद किती अद्ययावत आहे हे गोंदिया जिल्हा परिषदेच्या साईटला भेट दिल्यावर दिसून येेते.