- फाईलचा वाढतो मुक्काम : कर्मचार्यांना मुख्यालयाची अॅलर्जी
यवतमाळ,
जिल्ह्यातील अनेक शाळा गुरुजींविनाच सुरू आहेत. त्यातही या शाळांमध्ये पाहिजे तशा सुविधासुद्धा नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचबरोबर आरोग्य विभागातंर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातदेखील सुविधांचा अभाव आहे. नव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारीDr. Mainak Ghosh डॉ. मैनक घोष यांच्यापुढे शिक्षण, आरोग्याच्या सुविधा पुरविण्याचे आव्हान असून, कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे हा मुख्य हेतू डोळ्यांसमोर ठेवून शिक्षण विभागामार्फत लाखो रुपये खर्च केल्या जातात. मात्र, अनेक शाळांचा विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. तर अनेेक शाळांमध्ये विद्यार्थी आहेत, मात्र शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत वारंवार पालकांनी प्रशासनाकडे पाठपुरावासुद्धा केला आहे. पण अद्यापही शिक्षक मिळाले नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाकडून लाखोंचा खर्च केला जातो. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी मुख्यालय राहात नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तर जिल्हा परिषदेतील विविध विभागांत अनेक फाईल रखडल्या आहेत. या फाईल निकाली काढण्यासाठी लक्ष्मीदर्शन झाल्याशिवाय फाईल समोर जात नसल्याचा अनुभव अनेक वेळा नागरिकांना येतो. त्यामुळे जिल्हा परिषदेतील या बाबूगिरीवर मुख्य कार्यकारी अधिकारी Dr. Mainak Ghosh डॉ. घोष काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.