नवी दिल्ली,
प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे प्रयत्नरत असून, राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 च्या राज्यातील प्रभावी अंमलबजावणीविषयी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन, (Vikas Chandra Rastogi) उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, विकासचंद्र रस्तोगी यांनी दुसर्या अखिल भारतीय शिक्षा समागमाच्यानिमित्त आयोजित चर्चासत्रात काल येथे केले. प्रगती मैदान येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 च्या तिसर्या वर्धापन दिनानिमित्त दुसर्या अखिल भारतीय शिक्षण समागमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या दोन दिवसीय समागमात, शिक्षण क्षेत्राच्या अनेक विषयांवर विस्तृत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधान सचिव, विकासचंद्र रस्तोगी (Vikas Chandra Rastogi) हे दर्जेदार शिक्षण आणि प्रशासनात सुलभता- या विषयाच्या चर्चासत्रात सहभागी झाले. या सत्रात त्यांनी महाराष्ट्र सरकारने शिक्षण क्षेत्रात घेतलेल्या मोठ्या व महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती सर्व उपस्थित प्रतिनिधींना दिली. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळ्ण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगितले. देशात सर्वात जास्त राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद मान्यताप्राप्त महाविद्यालये महाराष्ट्रात असल्याचे सांगत, राष्ट्रीय मान्यता मंडळामार्फत घेण्यात येणार्या उपक्रमांमध्येही आपण अग्रेसर असल्याची त्यांनी माहिती दिली.
प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षणाचा प्रचार व प्रसार, कौशल्याधारित बहुविद्याशाखीय आणि आंतरविद्या शाखीय दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात एक समान अभ्यासक्रम क्रेडिट फ्रेमवर्कची रचना, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांच्या करीअरकरिता पर्यायी शिक्षण पद्धती, विविध शाखांमध्ये आणि संस्थांमध्ये अभ्यासक्रम निवडण्याची लवचिकता आदी शिक्षण धोरणातंर्गतची ठळक वैशिष्ट्यांबद्दल त्यांनी माहिती दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन धोरण अवलंबले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र स्किल विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, उच्च शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Vikas Chandra Rastogi) यानिमित्ताने लावण्यात आलेल्या प्रदर्शनातील महाराष्ट्राच्या दालनाने अनेक लोकांनी भेट दिली.