तभा वृत्तसेवा
अर्जुनी मोर,
नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्यांना तातडीने मदत मिळावी, असे शासनाचे धोरण आहे. मात्र त्यांची अंमलबजावणी करणार्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांच्या उदासिनतेमुळे तालुक्यातील झरपडा येथील दोन वृद्धांच्या कुटूंबीयांना मागील वर्षभरापासून उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान, याची माहिती होताच MLA Manohar Chandrikapure आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी त्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतली व संबंधितांना कारवाई करण्याची सूचना केली.
झरपडा येथील रामचंद्र ठाकरे (75) हे कुटूंबासह राहत असलेले घराचे छत मागील वर्षी झालेल्या पावसाने कोळसले. त्यामुळे संपूर्ण कुटूंब उघड्यावर आले. या कुटूंबीयांना गावातील समाज मंदिराचा आसरा मिळाला. मात्र प्रशासनाची मदत अद्यापही मिळाली नसल्याने अद्यापही समाज मंदिरातूनच ठाकरे कुटूंब संसाराचा गाडा चालवित आहेत. MLA Manohar Chandrikapure तसेच झरपड येथील मालन— चौधरी (70) या भाऊ, भावजय व त्यांची शिक्षण घेणार्या दोन मुलांसह राहणार्या घराची मागील भींत मागील वर्षीच्या पावसाळ्यात पडली. त्यावेळेस तात्पुरती डागडुजीची मदत मिळाली असली तरी ठोस उपाययोजना अद्यापही झाले नाही. परिणामी यंदाच्या पावसामुळे घर केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. या शक्यतेच्या भीतीपोटी जीव मुठीत घेऊन चौधरी कुटूंब दररोजचा दिवस काढत आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, ठाकरे व चौधरी कुटूंब मागील वर्षभरापासून शासकीय मदतीतून आपला निवारा उभा राहावे, यासाठी स्थानिक प्रशासकीय कार्यालयाची पायपीट करीत आहेत. मात्र आश्वासनाशिवाय त्यांना काहीही मिळाले नाही. त्यामुळे मागील एक वर्षापासून दोन्ही कुटूंब उघड्यावर जीवन जगत असून प्रशासनाच्या उदासिनतेवर रोष व्यक्त करीत आहेत. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दोन्ही कुटूंबीयांची भेट घेतली. त्यांच्या समस्या व मागणी जाणून घेतल्या. तसेच स्थानिक तलाठ्याला तातडीने पंचनामा करुन या कुटूंबांच्या समस्यांचे निराकरण करण्याची सूचना केली. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्ता निशा मस्के, माजी सरपंचा तनुरेषा रामटेके उपस्थित होत्या.
मागील वर्षीपासून आमचे कुटूंब पडक्या घरात वास्तव्य करीत आहोत. घरी माझे भाऊ,भावजय आणि शिक्षण घेत असलेले त्यांचे दोन मुले आहेत. पडके घर कधीही कोसळेल या भीतीपोटी रात्रीला झोप येत नाही, मुलांचा अभ्यास होत नाही. तलाठ्याकडे गेले असता उडते उत्तर मिळते. त्यामुळे आम्ही कुणाकडे जावे, असा प्रश्न मालन चौधरी यांचा आहे.
मी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाची पायपीट करुन थकलो. माझ्याकडे कुणीही लक्ष देत नाही. घर पडल्याने आपल्या कुटुंबासोबत व लहान लहान नातवंडांसह समाज मंदिरात राहत आहे. एक वर्षानंतरही घराचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने हक्काचा निवारा मिळेल की नाही, हा प्रश्न रामचंद्र ठाकरे यांच्यासमोर आहे.