नवी दिल्ली,
जमिनीवरील ताफ्यातील तपशीलवार तपासणीनंतर अखेर स्वदेशी अॅडव्हॉन्स हलके (Dhruv helicopters) ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरमधील (एएलएच) मेटलर्जिकल आणि डिझाईनमधील त्रुटी भारतीय लष्कराने ओळखल्या आहेत. यासंबंधीचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर सशस्त्र दलांचा एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र, या हेलिकॉप्टरला होणारे अपघात हा लष्कराच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरला होता. या पृष्ठभूमीवर डिझाईन आणि मेटलर्जिकल संबंधी त्रुटी लक्षात आल्या आहेत. ध्रुव हेलिकॉप्टर पुन्हा कार्यान्वित केले जात आहे. त्यांचे भाग प्राधान्याने बदलले जात आहेत आणि त्यांच्या उड्डाणाचा कालावधी पूर्वीच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे, असे संरक्षण आणि सुरक्षा आस्थापनातील सूत्रांनी सांगितले.
अरुणाचल प्रदेशात एक एएलएच (Dhruv helicopters) हेेलिकॉप्टर (ज्याला रुद्र नावाने ओळखले जाते) कोसळले होते. यातील ‘कलेक्टिव्ह’ यंत्रणा मोडकळीस आल्याने हा अपघात झाला होता. या कलेक्टिव्हमुळे हेलिकॉप्टरमधील रोटर्स आणि ‘बॅक’ची शक्ती नियंत्रित होते. यासंदर्भात माध्यमांनी ऑक्टोबर 2022 मध्ये अहवाल प्रकाशित केला होता. 2019 मध्ये आणखी एक ध्रुव हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर कोर्ट ऑफ इन्क्वायरीत हेलिकॉप्टरचा हा भाग समस्याग‘स्त असल्याचे आढळून आले होते. या अपघातात लष्कराचे तत्कालीन कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीरसिंह चमत्कारिकरीत्या बचावले होते तसेच हेलिकॉप्टरमधील सामूहिक त्रुटीदेखील आढळून आल्या होत्या.
या वर्षी अनेक अपघातांनंतर (Dhruv helicopters) लष्करी विमानांना प्रमाणित करण्यासाठी जबाबदार असलेली सर्वोच्च सरकारी नियामक संस्था ध्रुव हेलिकॉप्टरचे संपूर्ण पुनरावलोकन करीत आहे. आम्ही नेमकी समस्या ओळखली असून, काही विशिष्ट भाग बदलण्याची मागणी केली आहे, असे संरक्षण आस्थापनातील एका उच्च अधिकार्याने सांगितले. आमच्या सूचनेनुसार हेलिकॉप्टरमधील हे भाग बदलले जात आहेत, असेही त्याने सांगितले. या संपूर्ण प्रकि‘येला काही कालावधी लागणार आहे. हा डिझाईनमधील दोष आहे की मेटलर्जिकल समस्या, असे विचारले असता, हे दोन्हीचे मिश्रण आहे, असे अधिकारी म्हणाला. चांगली गोष्ट म्हणजे, सर्व त्रुटी ओळखण्यात आल्या आहेत आणि त्या दूर केल्या जात आहेत, असे अन्य एका सूत्राने सांगितले. आतापर्यंत 300 हून अधिक (Dhruv helicopters) ध्रुव हेलिकॉप्टर्सची निर्मिती करण्यात आली असून, 3 लाखांहून अधिक तास उड्डाण केले आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या हेलिकॉप्टर्सना वारंवार अपघात होत आहेत. या वर्षी मार्चपासून तीन हेलिकॉप्टर्सला अपघात झाला आहे, ज्यामुळे लष्कराला संपूर्ण ताफ्याची दोनदा तांत्रिक तपासणी करावी लागली.