शरद पवारांची शोकांतिका

sad story of Sharad Pawar महाआघाडीच्या चिंधड्या उडाल्या

    दिनांक :06-Jul-2023
Total Views |
प्रासंगिक 
- मोरेश्वर बडगे
sad story of Sharad Pawar केवळ शब्दांच्या गुगलीने नकोशा राजकारण्यांना संपवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार सध्या स्वत:ची राजकीय विकेट वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपडत आहेत. बाहेरचे कोणी नाही, तर त्यांच्या पुतण्यानेच बंड करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार 2 जुलै रोजी आपल्या 8 सहकार्‍यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा राजकारण तापले. sad story of Sharad Pawar 2019 च्या निवडणुकीनंतर अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला होता. मात्र, 80 तासांतच अजितदादांनी माघार घेतली. यावेळी मात्र अजितदादा वेगळ्या मूडमध्ये आहेत. sad story of Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 53 आमदार आहेत. त्यापैकी 33 आमदार सोबत आल्याने अजितदादांच्या अंगात हत्तीचे बळ आले आहे. घरातूनच झालेल्या या हल्ल्याने शरद पवार अस्वस्थ आहेत.
 
 

Sharad Pawar 
 
 
राजकीय हवेचा अंदाज पवारांना आधी येतो, असे बोलले जाते. sad story of Sharad Pawar पण इथे पवारांना पुतण्या असा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करेल याचा अंदाज आला नसावा. 25 व्या वर्षांत पदार्पण करणारी राष्ट्रवादी काँग्रेस उभी फुटली आहे. राष्ट्रवादीच्या या दोन्ही गटांनी बुधवारी स्वतंत्र बैठका घेऊन शक्तिप्रदर्शन केले. काकाची जिरवण्यासाठी अजितदादांना किमान 36 आमदार आणि संघटना आपल्या पाठीशी आहेत, हे सिद्ध करावे लागेल. थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावरच त्यांनी निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे. sad story of Sharad Pawar याचा अर्थ हे केवळ घरातले वादळ नाही. लंबी लढाई आहे. राजकारणात बंड हा प्रकार नवा नाही. मोठी बंड झाली आहेत; पण अजितदादांचे बंड वेगळे आहे. तब्बल 50 वर्षे दुसर्‍यांची घरं फोडत आलेल्या पवारांचेच घर फुटले. भाकरी आपल्यालाच फिरवता येते, गुगली आपणच टाकू शकतो या मस्तीत पवार होते. अजितदादाने भाकरी काय तवाच फेकून दिला, धावपट्टीच खणून काढली. कधी ना कधी हे होणारच होते. उशीर झाला एवढेच. कोणाला आवडो वा ना आवडो, महाराष्ट्राचे राजकारण पवारांभोवती फिरत आले.
 
 
खरे तर त्यांनी दिल्लीच्या तख्ताला धडक द्यायला हवी होती. पण दर काही वर्षांनी सवतासुभा चालवण्याची खोड पवारांना भोवली. संभ्रमाचे जाळे विणून शेवटी स्वत:च त्यात गुरफटण्याच्या स्वभावाने त्यांच्या सार्‍या मेहनतीवर पाणी पडले. sad story of Sharad Pawar सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माच्या मुद्यावरून पवारांनी 25 वर्षांपूर्वी काँग्रेस सोडली. राष्ट्रवादी काँग्रेस नावाने वेगळे दुकान थाटले. नाव राष्ट्रवादी असले, तरी हा पक्ष प्रादेशिक पक्षच राहिला. ममता बॅनर्जी यांनी स्वत:च्या जोरावर बंगाल हातात ठेवला. पण पवार स्वबळावर राज्यात कधी सत्ता मिळवू शकले नाहीत. राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी पदोपदी तडजोडी करीत आले. आज तर ते एकटे पडले आहेत. महाआघाडीच्या चिंधड्या उडाल्या आहेत. sad story of Sharad Pawar ‘टू बी ऑर नॉट टू बी’ असा यक्षप्रश्न पवारांसमोर असणार! अशावेळी मुख्य प्रवाहात सामील होणे हाच शहाणपणाचा मार्ग असतो. काका भाव देत नाही हे लक्षात येताच पुतण्याने राष्ट्रीय प्रवाहासोबत पोहणे पसंत केले.
 
 
काळाचे इशारे ओळखतो तोच पुढे जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाला पुढे नेऊ शकतात हे कोणी भाजपचा नेता नव्हे तर अजितदादा म्हणत आहेत. विकास हाच भविष्यातला पासवर्ड आहे. ज्यांना हे ओळखणे जमणार नाही ते प्रवाहाच्या बाहेर फेकले जातील. 2024 च्या निवडणुका जवळ येत चालल्या असताना भाजपसाठी मैदान मोकळे होत चालले आहे. sad story of Sharad Pawar आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली. आता शरद पवारांची राष्ट्रवादीही ‘देवेंद्रवासी’ झाली आहे. काँग्रेस तर शरपंजरी आहे. भाजपशी लढायला मैदानात आहे कोण? ‘अकेला देवेंद्र क्या करेगा’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस काय करू शकतात ते आता दिसले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे ऑपरेशन फडणवीस यांच्याच टेबलवर झाले. फडणवीस यांच्याशी घेतलेला पंगा उद्धव यांना महागात पडला. शरद पवारांच्या चक्रीत अडकले नसते तर आज सुखात असते. उद्धव आपल्या आमदारांना सांभाळू शकले नाहीत. थोडेथोडके नव्हे तर 40 आमदारांनी त्यांच्याविरोधात बंड केले होते. sad story of Sharad Pawar या आमदारांनी भाजपकडून खोके घेऊन गद्दारी केली, असा कांगावा उद्धव सेनेने चालवला.
 
 
 
मग आता उद्धव का विचारत नाहीत की, अजितदादांनी किती खोके घेतले? दादा फुकटात आले काय? बोलती बंद आहे. ‘50 खोके, एकदम ओके’ हा नारा आता ऐकू येत नाही. याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हणवणारे उद्धव खोटे विष लोकांमध्ये पसरवत होते. गद्दारी तर उद्धव यांनी केली होती. शरद पवार तर गद्दारांचे सरदार आहेत. जिधर दम, उधर हम. त्यांनी वसंतदादांच्या पाठीत पहिला खंजीर खुपसला होता. पुढे विदेशी मुळाच्या सांगून सोनिया गांधींना सोडले. नरेंद्र मोदींची अधूनमधून प्रशंसा करण्याच्या सवयीतून अजूनही ते बाहेर पडू शकले नाहीत. sad story of Sharad Pawar 2014 मध्ये देवेंद्र सरकारला न मागता पाठिंबा देणारे हेच शरद पवार होते. नागालँड सरकारमध्ये भाजप आहे हे ठाऊक असताना तिथल्या आपल्या आमदारांना सरकारमध्ये सामील व्हायला सांगणारे हेच पवार होते. मग आज आपला पुतण्या भाजपसोबत जातो म्हणतो तर पवारांचे नखरे सुरू झाले. पवारांनी कधी तत्त्वाचे राजकारण केले नाही. त्यांचे राजकारण सत्तेभोवतीच फिरत राहिले. पवारांचा आजचा आक्रोश कन्यामोहापोटी आहे. इथे कुठेही तत्त्वाचे भांडण नाही. कुटुंबातला संघर्ष आहे. राष्ट्रवादीच्या मालकीचा तंटा आहे. जिथे जिथे प्रादेशिक पक्ष सत्तेत आहेत तिथे हाच तमाशा आहे. म्हणून प्रादेशिक पक्ष नकोत. sad story of Sharad Pawar राष्ट्रीय पक्षांना जवळ केले पाहिजे. पवारांना राष्ट्रवादीचा ताबा मुलीकडे म्हणजे खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे द्यायचा आहे. त्यातून तलवारी निघाल्या आहेत.
 
 
आतापर्यंत झाकली मूठ होती. आता त्यांचीच माणसे शरद पवारांची अंडीपिल्ली बाहेर काढत आहेत. वय 83 वर्षे आहे. या वयातही सत्तेची हाव सुटत नाही. रिटायर झाले तर त्यांची थोडी तरी प्रतिष्ठा राहील. पण एवढे झटके बसूनही शरद पवार लोकात जातो म्हणताहेत; पण त्यांचे लोक आहेत कुठे? ‘लोक माझे पांगती’ असे सुधारित आत्मचरित्र त्यांना लिहावे लागेल, अशी परिस्थिती आहे. लोक नाहीत, महाआघाडीच्या चिंधड्या उडाल्या. ओबीसीसोबत मराठा कार्डही भाजपच्या बाजूला आल्याने 2024 ची निवडणूक भाजपला अधिक सोपी झाली आहे. sad story of Sharad Pawar याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिले पाहिजे. महाआघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात फडणवीस यांनी ज्या चतुराईने किल्ला लढवला, त्याला तोड नाही. नरेंद्र मोदी-अमित शाह जोडीचा विश्वास जिंकणे सोपी गोष्ट नाही. त्या जोरावर फडणवीसांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांना चितपट केले. एकाच वर्षात दोन राजकीय पक्ष संपवणारा हा चाणक्य आहे. हा त्यागमूर्तीही आहे. हक्क असतानाही फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले. आता अजितदादांना निम्मे उपमुख्यमंत्रिपद दिले. मनाचा एवढा मोठेपणा. भविष्यातला भाजपचा हा मोठा चेहरा आहे.