- अमेरिकन खासदारांनी केली चौकशीची मागणी
वॉशिंग्टन,
सॅन फ्रॉन्सिस्को येथील Indian Consulate भारतीय वाणिज्य दूतावासावरील हल्ल्याचा अमेरिकी खासदार आणि काही भारतीय-अमेरिकी संस्थांनी निषेध केला असून, या मागील कटकर्त्यांना न्यायालयात खेचण्यासाठी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. निषेध करण्याचा अधिकार प्रत्येकाला अमेरिकी घटनेने दिला आहे, पण कुणालाही हिंसाचाराचे स्वातंत्र्य दिलेे नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजितसिंग संधू यांच्यासह भारतीय मुत्सद्दींना फुटीरतावादी शिखांनी दिलेल्या धमक्यांचा निषेध केला आणि विदेश राजनैतिक अधिकार्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात यावी, असे आवाहन बायडेन प्रशासनाला केले.
खलिस्तानी समर्थकांनी 2 जुलै रोजी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सॅन फ्रॉन्सिस्कोमधील Indian Consulate भारतीय वाणिज्य दूतावासात जाळपोळ झाल्याचे दिसून आले. या व्हिडीओवर ‘हिंसाचारच हिंसाचाराला जन्म देते’ असे शब्द होते तसेच खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीपसिंग निज्जरच्या हत्येची बातमीही यात होती. अमेरिकी भूमीत विदेशी मुत्सद्दींना जीवाची भीती बाळगण्याचे कारण नाही. प्रशासन त्यांना सुरक्षा उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा असल्याचे खासदार फ्रॅन्क पाल्लोन यांनी म्हटले. निषेध करण्याचा अधिकार अमेरिकी घटनेत देण्यात आला आहे. परंतु, राजनैतिक सुविधांसह हिंसाचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे विदेशी प्रकरणांच्या समितीचे सदस्य आणि खासदार ग्रेगरी मीक्स यांनी म्हटले आहे.