वेध
- नीलेश जोशी
Har Ghar Jal : पाणी म्हणजे जीवन! पण अशुद्ध पाणी मानवी जीवनाकरिता घातक ठरते. स्वच्छ व शुद्ध पाण्यामुळे जलजन्य आजाराला प्रतिबंध करता येतो. मात्र, अद्याप देशातील अनेक गावांत शुद्ध पिण्यायोग्य पाणीपुरवठा होत नाही, हे दुर्दैवच. अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील खारपाणपट्टा पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्षासाठी ओळखला जातो तर अन्यत्रही अनेक गावांत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यातील विविध गावांत उन्हाळ्यात गावकर्यांचा पिण्यासाठी पाणी आणणे हा एककलमी कार्यक्रम असतो. त्यातही नदीकाठच्या गावातील गावकरी कोरड्या पडलेल्या नदीपात्रात खड्डा करून त्यातून पाणी भरतात. एक बादली पाण्यासाठी अर्धा-पाऊण तास वेळ जातो. त्या पाण्याची स्वच्छता, शुद्धता याबाबत न बोललेलेच बरे! आता याच समस्येवर जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालामार्फत लक्ष वेधले आहे. या अहवालात त्यांनी सुरक्षित पेयजल पुरवठा झाल्यास देशातील अशुद्ध पाण्यातून होणार्या अतिसाराच्या आजारामुळे चार लाख मृत्यू टाळता येतील, असे म्हटले आहे.
देशात सुरक्षितपणे व्यवस्थापित पेयजल पुरवठा झाल्यास (Har Ghar Jal) जलजन्य आजार असलेल्या अतिसारामुळे होणारे मृत्यू टळू शकतात. एवढेच नव्हे, तर तब्बल 8.2 लाख कोटी रुपयांची बचतही होऊ शकते. ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींचा बहुतांश वेळ आणि शक्ती नियमित वापराच्या पाण्याकरिता खर्च होतो. त्यामुळे स्वाभाविकच या महिलांना अधिक उत्पन्नासाठी वेगळा प्रयत्न करण्यास संधी मिळत नाही. सोबतच त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याच समस्येचे गांभीर्य अहवालाच्या माध्यमातून जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. खरं म्हणजे सुरक्षित पेयजल म्हणजे पाण्यातील भौतिक, जैविक व रासायनिक घटकांची तपासणी करून त्या पाण्याची योग्यता निश्चित करणे, पाण्याची गुणवत्ता व स्वच्छता यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. स्वच्छता असेल तेथे आरोग्य नांदेल, आरोग्य नांदेल तेथे भरभराट होईल, असे म्हणतात. आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहाराबरोबर स्वच्छ मोकळी हवा, आसपासचा स्वच्छ परिसर आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी याची आवश्यकता असते. स्वच्छ व निर्मळ दिसणारे पाणी शुद्ध व सुरक्षित असतेच असे नाही. (Har Ghar Jal) स्वच्छ व निर्मळ दिसणार्या पाण्यामध्ये मानवास हानिकारक ठरू शकणारे कोट्यवधी रोगजंतू असू शकतात. पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरावयाचे पाणी नियमित प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे मिळाल्यास दरवर्षीचे चार लाख मृत्यू टळतील. एवढेच नव्हे, तर ग्रामीण भागातील विशेषतः महिलांना दररोज लागणार्या वेळेची बचत होईल. आरोग्य संघटनेच्या अहवालात दररोज तब्बल 5.5 कोटी तास केवळ पाणी भरण्यावर खर्च होत असल्याचे म्हटले आहे.
ग्रामीण भागातील महिलांच नव्हे तर बाल व किशोरवयीन मुलीही कुटुंबाची तहान भागविण्याकरिता सतत व्यस्त असतात. स्वाभाविकच त्यांचा प्राधान्यक्रम कुटुंबासाठी पाण्याची उपलब्धता हा असतो. अशा स्थितीत त्यांच्या शालेय अभ्यासक्रमाचे काय होत असेल? कोवळ्या वयात पाण्याच्या हंड्याचा डोक्यावर, कमरेवर असलेला भार त्या कशा सोसत असतील, हाही प्रश्न आहेच. त्यामुळे पेयजलाची उपलब्धता निश्चित केल्यास ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारू शकते तर मुलींच्या शैक्षणिक प्रगतीत असणारा एक अडथळा दूर होऊ शकतो. म्हणूनच (Har Ghar Jal) संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये 2030 पर्यंत सर्वांसाठी सुरक्षित आणि परवडणार्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठीचे लक्ष्य निश्चित केले आहे. देश अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशातील प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित पेयजल उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासनाने यापूर्वीच दूरद़ृष्टीचा निर्णय घेतला आहे.
‘हर घर जल’ (Har Ghar Jal) ही योजना देशात व्यापक स्तरावर राबविली जात आहे. समस्या असली तरी त्या समस्येच्या मुळाशी जाऊन समस्येचे निर्मूलन करणे हा संकल्प असलेल्या केंद्र शासनाने देशातील 19.4 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी आतापर्यंत 12.7 कोटी कुटुंबांना नळाद्वारे सुरक्षित पेयजल पोहोचविले आहे. ही टक्केवारी 65.5 इतकी असून उर्वरित कुटुंबांना 2024 पर्यंत नळाद्वारे सुरक्षित पेयजल देण्याचा संकल्प मोदी सरकारचा आहे. अर्थात या संकल्पामुळे तब्बल चार लाख मृत्यू टळतील तर 8.2 लाख कोटी रुपयांची बचत होईल. हे जरी खरे असले, तरी ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य आणि सामाजिक, आर्थिक जीवनमानात सुधारणेसह बाल व किशोरवयीन मुलींच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल, हे निश्चित.
9422862484