स्वामिकाज गुरुभक्ती। पितृवचन सेवा पति॥

10 Sep 2023 05:45:00
तुका आकाशाएवढा
Saint Tukaram Maharaj : आयुष्यात प्रत्येकच आहे त्यापेक्षा प्रगती साधण्याच्या द़ृष्टीने स्वप्न पाहात असतो. ही स्वप्नपूर्ती केवळ म्हटल्याने पूर्ण होत नाही तर त्याकरिता मन:पूर्वक प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न करताना ते कोणत्या पद्धतीने करावे, या संदर्भातील निर्णय तेवढेच उपयुक्त ठरतात. नैतिकतेने केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. आज आपण पाहतो की, अनेक लोक आयुष्याच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचले आहेत. त्याकरिता त्यांनी आधी अशा स्वरूपाचे प्रयत्न करण्यासाठी एवढी मोठी ऊर्जा आणली असेल तरी कोठून? तर, या बाबतीत थोडं खोलात शिरल्यास असे लक्षात येते की, ही एवढी मोठी उंची गाठण्यासाठी आधी त्यांनी मनानं ठरवलं; नंतर त्याला परिश्रमाची साथ दिली. कार्यात सातत्य ठेवून मनातील आळस काढून टाकला. तेव्हा कुठं ही उंची त्यांना गाठता आली. यावरून आपलं मन किती मोठं आहे. त्याच्यापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही. जे मनानं ठरविले जाते ते पूर्णत्वास जातेच, ही बाब आपल्या लक्षात आलीच असेल.
 
 
Saint Tukaram Maharaj
 
माणसानं जर का ठरवलं की, काही दिवस अन्न घ्यायचेच नाही, पाणी प्यायचेच नाही तर तो हे करून दाखवू शकतो; एवढे इच्छाशक्तीला महत्त्व आहे. भक्ती आणि शक्ती एक झाल्यास ईश्वर प्राप्त होऊ शकतो. म्हणून मनापासून निश्चय करणे महत्त्वाचे आहे तरच हाती घेतलेलं कोणतंही काम आपण पूर्ण करून दाखवू शकतो. आपलं आपल्या क्षेत्रात अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर ते पूर्ण करण्याचा द़ृढ निश्चय केल्यास उद्दिष्टापर्यंत जाण्यास वेळ लागणार नाही. परंतु कमजोर वृत्तीने म्हणजे, पाहू, करू, केव्हातरी, जमलं तर, असे केल्यास कधीही उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. यशाचा अर्थ असा की, कोणतेही कार्य करायचं असेल तर ते मनापासून करा. वर-वरपणे ठरविलेलं कोणतेही कार्य कधीही पूर्णत्वास जाऊ शकत नाही. येणारे अनेक अडथळे दूर करून सातत्यपूर्वक ठरविलेल्या उद्दिष्टापर्यंत गेल्याशिवाय थांबायचं नाही. त्याकरिता असा निर्णय घेण्यासाठी खूप मोठी ताकद लागते. त्याकरिता आपल्या मालकाची सेवा, गुरूची भक्ती व स्त्रियांनी पतीची सेवा मनोभावे करणे जरूरी आहे. या चार गोष्टींसोबतच आणखी दोन गोष्टी मनोभावे करायच्या महाराजांनी सांगितल्या आहेत. त्या अशा की, दुसर्‍याच्या दु:खात आपण सामील झालो पाहिजे आणि मुखाने नेहमी सत्य बोलले पाहिजे; एवढ्या साध्या व सोप्या भाषेत जगद्गुरू संत तुकोबांनी सांगितले आहे व हीच विष्णूची महापुजा आहे. म्हणून प्रस्तुत अभंगातून Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराज उपदेश करतात की,
 
स्वामिकाज गुरुभक्ती। पितृवचन सेवा पति॥
हेचि विष्णूची महापूजा। अनुभव नाहीं दुजा॥
सत्य बोले मुखें। दुखवे आणिकांच्या दु:खें॥
निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेंचि फळ॥ अ. क्र. 2175
 
Saint Tukaram Maharaj : आपल्या मालकाने म्हणजेच आपण ज्याच्या अंतर्गत काम करीत असतो त्याने सांगितलेले कार्य प्रामाणिकपणे करावे. चांगल्या मार्गाचा अवलंब करून जागृत राहून काम केल्यास आपल्या कार्याचा दर्जा वाढवून कर्तृत्व सिद्ध करावं. आपण त्या कामाची प्रतारणा कधी करू नये. मन:पूर्वक काम केल्यास आपल्याला ते पूर्ण केल्याचा आनंद मिळतो. त्याच्या हितामध्ये आपलं हित दडलेलं असतं याची जाणीव ठेवावी. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे आपल्या कामाप्रती असलेला आदरभाव हीच खरी सेवा आहे. तीच आपली गुरुभक्ती ठरते. कामचुकारपणा कधीही करू नये. आपल्या हातून त्यांचं नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. आपल्या शेजारचा काही काम करत नाही म्हणून आपणही करायचे नाही, असा विचार मनात कधीही आणू नये. जो कुणी असा विचार करत असेल तो कामचुकार असतो. आयुष्यात तो कधीही भरभराट करू शकत नाही. म्हणून आपण प्रामाणिक राहून काम करावे. यापेक्षा दुसरी चांगली पूजा नाही. हीच खरी ईश्वर भक्ती आहे तसेच आपल्याला जग दाखविणारे आई-वडिलांप्रती आपली भावना निर्मळ असावयास पाहिजे. त्यांचा आदरभाव, त्यांनी सांगितलेले कार्य तेवढ्याच नम्रतापूर्वक पार पाडले गेले पाहिजे. कर्तव्याची एकनिष्ठ राहायला पाहिजे. आई-वडिलांच्या सेवेव्यतिरिक्त दुसरी कोणतीच सेवा श्रेष्ठ नाही. हीच खरी भक्ती होय. ज्यांना आई-वडिलांचा सहवास लाभतो त्यांना तीर्थयात्रा करण्याची काहीच गरज नसते. यशाचा अर्थ असाही नाही की, ईश्वर भक्ती करू नये ती जरूर करावी. भक्त पुंडलिकाची गोष्ट आपल्याला माहीतच आहे. आई-वडिलांच्या सेवेत कुठलाही खंड न पाडता पुंडलिक अविरतपणे सेवा करीतच राहिले. साक्षात परमेश्वराला बाजूला उभं करून ठेवलं. ही शक्ती त्याला प्राप्त झाली ती केवळ आई-वडिलांच्या सेवेचे फळ म्हणूनच. कारण प्रथम आई-वडिलांच्या सेवेला त्याने महत्त्व दिले होते. हीच खरी ईश्वरपूजा असल्यामुळे ती अखंडीतपणे करावी. आई-वडील आपल्या मुलांकडे कधी दुर्लक्ष करीत नाहीत. एवढंच काय, तर काही अपेक्षाही करीत नाहीत.
 
 
नि:स्वार्थपणे त्याची प्रत्येक गरज पूर्ण करण्याकरिता ते अहोरात्र झटताना दिसतात. मुलांना गोडधोड खायला देतात. जेव्हा मुलं गोडधोड खाऊन तृप्त होतात, तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरती आनंद ओसंडून वाहत असताना दिसतो. मुलाचे लाड करताना दोघांनाही आनंद होत असतो. म्हणून आपण त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं व त्यांच्या आदेशानुसारच चालावं. आयुष्यभर ते मुलांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत असतात. म्हणून आई-वडिलांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराज म्हणतात की, पत्नीने पतीची सेवासुद्धा एकनिष्ठ होऊन करावी. आपलं आचरण शुद्ध ठेवून तसेच सत्याची वागणूक ठेवून पतिव्रतेचे पालन करावे. पतीच्या सुख-दु:खात सामील होऊन दु:ख निवारण्यासाठी प्रयत्न करावे. हीच खरी पूजा आहे. सत्य हाच धर्म मानून त्याप्रमाणे आपले आचरण ठेवावे. त्यानुसारच वागावे. आलेल्या अडचणींवर मात करावी. आपल्या ध्येयानुसार कृती झाली पाहिजे तरच जीवनात आपण यश प्राप्त करू शकतो. आजच्या युगात जसे बुलडाण्याच्या लताबाई करकरे यांनी आपल्या पतीच्या उपचारासाठी प्रचंड मेहनत केली. पतीचे आरोग्य ठणठणीत व्हावे याकरिता अनेक संकटांची तमा न बाळगता त्याला समर्थपणे सामोरे जात छोट्या दवाखान्यापासून तर मोठ्या शहरातल्या दवाखान्यापर्यंत गेली. पैसे संपल्यानंतर पतीला परत न आणता डॉक्टरांची ऑपरेशनकरिता औषध व फी देण्याकरिता 65 वर्षीय या बाईने मॅरॉथान स्पर्धेत भाग घेतला आणि भल्यामोठ्या आलेल्या संकटावर मात करण्याच्या निश्चयाचे बळ घेऊन पटांगणात दाखल झाली. दु:ख मनात ठेवून रडत न बसता दु:ख बाजूला ठेवून लढायचे ठरवून धावायला लागली आणि या स्पर्धेत ती जिंकलीदेखील. केवळ पतिनिष्ठेच्या भरवशावर ती यश संपादन करू शकली. म्हणून नवर्‍याप्रती असलेल्या या शुद्ध प्रेमापोटीचे फळ तिला मिळाले होते. खर्‍या अर्थानं पतीची सेवा तिनं केली होती. अशी एकनिष्ठ सेवा पत्नीने करावी, अशी अपेक्षा आहे. हीच विष्णूची महापूजा आहे. असे मनोभावे कार्य करीत असताना झालेला आनंद हा कोणत्याही मापदंडात बसत नाही. एवढा तो मोठ्या स्वरूपात असतो. अशा स्वरूपाचा झालेला आनंद ज्यांनी ज्यांनी घेतला असेल त्याचे वर्णन करणेही शब्दांच्या पलीकडचे असते. म्हणूनच अशा या सर्वश्रेष्ठ अनुभूतीचा आनंद हा निराळाच असतो.
 
 
सत्य हाच धर्म मानून त्या मार्गावर चालावे. सत्य वचन अंगी बाळगल्यास अनेक दु:खाचे हरण होते. म्हणून सन्मार्गाचा पुरस्कार केल्यास जीवन सुखी व समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही. जगात अनेक लोक दु:खी-कष्टी आहेत. अशा दु:खी-कष्टी लोकांना मदत केली पाहिजे. त्यांचे दु:ख हे आपले दु:ख मानावयास पाहिजे तरच आपण त्यांना सहाय्य करू शकतो. आपल्या अंत:करणातील करुणा जागृत झाली पाहिजे. आपल्या परीने त्यांना जी काही मदत करता येईल ती आपलेपणानं निश्चितपणे करावी. पण, हे केव्हा शक्य होईल; जोपर्यंत आपण ते दु:ख आपलं समजत नाही तोपर्यंत आपण त्याच्या दु:खात सहभागी होणार नाही. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की, जो नेहमी सत्य बोलतो, सत्य वचन अंगीकारतो. केवळ सत्य बोलण्याचे वा चांगले कृत्य करण्याचे भासवत नाही तर प्रत्यक्ष सत्य वचनाचे आचरण करतो, तोच इतरांचे दु:ख आपले दु:ख समजून त्यांना सुखचा मार्ग दाखवू शकतो. म्हणून जीवनात ध्येय निश्चित करून आपल्या आचाराबरोबरच विचाराला सोबत घेत असताना कुठलाही आळस न करता आपल्या मनात येईल तो सुविचार, आपल्यावर सोपविलेले कार्य, आई-वडिलांची सेवा करण्याचे बळ प्राप्त होत असते आणि त्याचं चांगलं फळ आपण आयुष्यभर चाखू शकतो. त्याकरिता लागणारा मनाचा निग्रह खूप मोठा असावा लागतो. हे सर्व शक्य घेतलेल्या खंबीर निश्चयामुळेच होऊ शकतं. म्हणून Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराज म्हणतात की, आयुष्यात चांगल्या गोष्टी प्राप्त करावयाच्या असतील तर आळस सोडून देऊन आपणास अपार मेहनत, उत्कृष्ट नियोजन, इमानदारीनं काम करण्याची प्रवृत्ती, आपल्या स्वामींविषयीची निष्ठा, आई-वडील व गुरुजनांचा आशीर्वाद, सत्य धर्माचे पालन केल्यास निश्चयाचे बळ निर्माण होऊन जनसामान्यात सन्मान प्राप्त होईल. याकरिता महाराजांनी मोठ्या कौशल्याने आधीच्या चरणात ‘हेचि’ या शब्दाचा प्रयोग केलेला आहे तर नंतरच्या चरणात ‘तेचि’ या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. भावार्थ असा आहे की, कोणते कर्म केले म्हणजे आपल्याला कोणती गोष्ट साध्य होऊ शकते आणि हे मिळालेले कोणत्या कर्माचे फळ आहे हे लक्षात येते.
- प्रा. मधुकर वडोदे
- 9422200007
 
Powered By Sangraha 9.0