उंबर्डा बाजार येथे कावडं यात्रा उत्साहात

13 Sep 2023 17:55:54
उंबर्डाबाजार,
Kavad Yatra श्रावणातील शेवटच्या सोमवारी उंबर्डा बाजार येथे मोठ्या उत्साहात कावड यात्रा काढण्यात आली. श्रावण महिन्यात यावर्षी नव्याने सुरू करण्यात आलेल्या कावड यात्रेला उंबर्डा बाजार येथील तरुण मंडळीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व श्रावण महिना असल्याने गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले. श्री महाकाल मित्र मंडळ यांच्या वतीने कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली.
 
 
Kavad Yatra
 
त्यानुसार उंबर्डा बाजार येथून ५ किमी अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र महादेव संस्थान राफेरी येथील जलाशयातील कावडीने पाणी आणून गावातील पुरातन शिव मंदिर येथे जलाभिषेक करण्यात आला. ग्रामस्थांनी ठिकठिकाणी कावडीची आरती ओवाळून पूजन केले. शिव मंदिराच्या प्रवेश द्वारावर कावड यात्रेचे अध्यक्ष प्रवीण बोरगडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. Kavad Yatra या कावड यात्रेला गावकर्‍यांनी व बाहेर गावावरून आलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ११ सप्टेंबरला कावड यात्रा उंबर्डाबाजार मधील मुख्य मार्गावर काढण्यात आली. तर महिला मंडळींनी घरासमोर पाणी शिंपडून व रांगोळी काढून कावड यात्रेचे स्वागत केले. परिसरातील नागरिकांनी ही भव्य कावड यात्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
 
 ग्रामस्थांकडून कावड धारकांसाठी चहा, साबुदाणाची उसळ फळांचे वाटप करण्यात आले. तर शेवटी श्री महादेव संस्थान येथील शिवलिंगाला कावडीतून आणलेल्या जलाचा जलाभिषेक करून कावड यात्रेची सांगता करण्यात आली. शिवभक्तांचा उत्साह आणि वाद्यांच्या गजरात ’जय भोले’ ’हर हर महादेव’ जय घोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. नवीन उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसाद पाहून दरवर्षी ही कावड यात्रा काढण्याचा निर्णय जय श्री महाकाल मित्र मंडळ उंबर्डा बाजार यांनी केला आहे. तर हभप श्री नागेश महाराज शेगांव यांच्या मार्गदर्शनात अनेक तरुणांनी वाईट व्यसनाचा परित्याग केला.
Powered By Sangraha 9.0