तभा वृत्तसेवा
वर्धा,
Ganpati Bappa : बाप्पा तू येतोय् आम्हाला आनंदच आहे. वर्धेत तसा तुझा सार्वजनिक वावर फारच कमी आहे. घरोघरी मात्र तू रविवारपासुनच पोहोचायला सुरुवात केली. बाप्पा आहे न कठीण घरी पोहोचणे... अरे गणेशा तुला घरी घेऊन जाताना भक्तांची काय अवस्था झाली हेे तू स्वत: अनुभवले असेल ना! बाप्पा गेल्या तीन वर्षात तू तीन वेळा आला. पण... तेच खड्डे तुला वारंवार दिसले असतील ना.. बाप्पा भय इथलेे संपता संपत नाही. काही तरी उजेड पाड बाबा त्या ठेकेदारांच्या!
बाप्पा (Ganpati Bappa) वर्धेत तुझा सार्वजनिक उत्सव तसा फारच कमी होतो. घरो घरी मात्र तू दिमाखात बसतो. सुट्ट्या, पाणी पाऊस आणि वेळेचे भान बघून रविवारपासुनच गणेशभक्तांनी तुला घरी नेले. पण, बाप्पा त्या रस्त्यांची तुलाही सवय झाली असेल ना? त्या मलनिस्सारन ने सारे शहर ओबडधोबड करून ठेवले. माणसाने माणसासाठी तयार केलेले रस्ते फारच कठीण आहेत बरं. देवा, सध्या नगर पालिकेत कोणाचीच सत्ता नाही. सारा कारभार तसा अधिकार्यांच्याच हातात आहे बरं! त्या गटाराच्या कामात रस्ते फोडून चार वर्षे उलटली. पण, रस्ते काही सुधे होण्याचे नाव घेत नाही. असे गजानना, रस्त्याच्या मधोमध कुठे खड्डा येईल आणि तो खड्डा कधी दवाखान्यात घेऊन जाईल, हेही सांगता येत नाही. शहरातील एकही रस्ता तुला न हालवता सुखरूप घरी घेऊन जावा असा नाही. (Ganpati Bappa) बाप्पा तू दहा दिवस मुुक्कामाला आहेस. जरा, बघ ना तुझ्या निवासात तरी ते शहरातील रस्त्यांची कामं उरकवतील म्हणजे तुला जाता जाता जरा समाधानही वाटेल.