ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांंतर्गत 7, पूर्णा नदीवर 4 खरबी बंधारे

    दिनांक :19-Sep-2023
Total Views |
- पिंपळगाव खुटा तलावाला मंजुरी : खा. हेमंत पाटील

उमरखेड, 
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या विकासकामांकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष पॅकेज जाहीर केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. यामध्ये ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प अंतर्गत 7 व पूर्णा नदीवरील 4 खरबी बंधार्‍यांना आणि पिंपळगाव खुटा तलावासाठी मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती खासदार Hemant Patil हेमंत पाटील यांनी दिली.
 
 
hemant patil dksl
 
छत्रपती संभाजीनगर येथे शनिवार, 16 सप्टेंबर रोजी मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये सर्वात प्रथम पोटा उच्च, जोड परळी, पिंपळगाव कुटे आणि महमदापुरच्या उच्चपातळी बंधार्‍यास मंजुरी दिली. ज्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील 500 एकर जमीन ओलित होणार आहे. शेतीसाठी वर्षभर पाणी उपलब्ध राहणार आहे. किनवट तालुक्यातील महत्त्वाच्या उनकेश्वर उच्च पातळी बंधार्‍यासदेखील 230 कोटी 64 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून आंध‘प्रदेशमध्ये वाहून जाणारे पाणी इथेच थांबले पाहिजे यासाठी गेल्या 24 वर्षांपासून कळमनुरी, उमरखेड, हदगाव, हिमायतनगर, महागाव, किनवट आणि माहूर या तालुक्यांतील शेतकर्‍यांकडून बंधार्‍याची मागणी केली जात होती.
 
 
ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पावरील या सात उच्च पातळी बंधार्‍यांना 24 वर्षानंतर सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामुळे नांदेडसह यवतमाळ जिल्ह्यातील 1 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामध्ये 7 उच्च पातळी बंधार्‍यांसह कालवा दुरुस्त्या होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या शेतकर्‍यांपर्यंत पाणी पोहचण्यास मदत होणार आहे.
 
 
त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील खरबी येथील 20 कोटी रुपयांचा बंधारा, हिंगोली शहरासाठी आवश्यक असलेल्या पिंपळखुटा तलावासाठीसुद्धा मान्यता देण्यात आली आहे. हळद संशोधन केंद्र व प्रक्रिया उद्योगासोबतच 100 हेक्टरवर मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क व हळदीचे क्लस्टर उभारण्यासाठी भूसंपादनास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. जुनुना परिसरात 100 हेक्टर म्हणजे 250 एकर जमिनीचे भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. हिंगोलीत उद्योग भवनासाठी 12 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हदगाव औद्योगिक परिसर भूसंपादनासाठी 150 एकर जमीन खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व एमआयडीसींना मूलभूत सुविधांसाठी 63.30 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे.
 
 
त्याचबरोबर उद्योग विभागाकडून हदगाव व हिमायतनगरच्या बस स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सोबतच सीएमईजीपीवायमधून 620 उद्योजक हिंगोली जिल्ह्यांमध्ये तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हिंगोली लोकसभा क्षेत्रातील जलसंपदा, उद्योग, आरोग्य, ग्रामविकास, शिक्षण, परिवहन विकासाच्या विषयांना विशेष प्राधान्य देऊन भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल Hemant Patil खा. हेमंत पाटील यांनी सरकारचे आभार मानले आहेत.