थायलंडमध्ये आहे आशियातील सर्वांत उंच गणेशमूर्ती

भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार

    दिनांक :22-Sep-2023
Total Views |
गणेशवंदना विशेष
Asia tallest Ganesha idol : भारतीय संस्कृतीचा प्रभाव जगातील अनेक देशांवर पडल्याचे आपल्या विविध सण, उत्सवांद्वारे अनुभवास येते. खासकरून गणेशोत्सव व गणपती देवतेबद्दल जगातील अनेक देशांमध्ये प्रचंड कुतूहल व श्रद्धादेखील आहे. ‘भारताबाहेरही अत्यंत लोकप्रिय असलेली देवता’ असे श्रीगणेशाचे निश्चितच वर्णन करता येईल. त्यामुळेच इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड, मलेशिया, लाओस, व्हिएतनाम या आणि इतरही अनेक देशांमध्ये विविध आणि आकर्षक गणेशमूर्ती बघायला मिळतात.
 
Asia tallest Ganesha idol
 
इ.स.च्या 15 व्या शतकापर्यंत इंडोनेशियामध्ये गणपतीच्या मूर्ती खूपच लोकप्रिय होत्या. प्राचीन जावामधील ‘स्मरदहन’ नावाच्या हस्तलिखितात विघ्नहर्त्या श्रीगणेशजन्माची कथा नोंदली आहे. त्यात असे म्हटले आहे की गणपती मुळातच हत्तीचे डोके असलेल्या स्थितीत जन्माला आला. बाली इथल्या प्रचलित प्रथेनुसार कोणते संकट आले तर गणपतीला प्रसन्न करण्यासाठी ऋषिगण नावाचा एक विधी पार पाडला जातो. भारतीय गणेशमूर्ती आणि (Asia tallest Ganesha idol) इंडोनेशियामधील गणेशमूर्तीमध्ये काहीही फरक नाही. तिथेही गणपतीच्या हातात परशू, जपमाळ, तुटलेला दात (एकदंत) आणि प्रसादपात्र दाखवलेले आहे. काही वेळेला तर गणपतीच्या हातात पाश, पद्म आणि शंख अशी आयुधेसुद्धा पाहायला मिळतात. भारतीय प्रतिमेसारखीच इथेही गणपतीची प्रतिमा ही चार हातांची दाखवलेली असते. गणपती बसलेल्या नाही तर उभ्या स्थितीत दाखवला जातो. परंतु नृत्यगणेशाची मूर्ती मात्र इथे आढळत नाही. भारतात फारसा न आढळणारा तांत्रिक गणेश, इंडोनेशियामध्ये मात्र पाहायला मिळतो.
 
Asia tallest Ganesha idol
 
थायलंड येथेही गणेश देवता (Asia tallest Ganesha idol) अतिशय लोकप्रिय आहे. आशियातील सर्वात उंच गणपतीची मूर्ती भारतात नाही तर थायलंडमध्ये आहे. मंगलमूर्ती श्रीगणेशाची आशियातील सर्वांत उंच मूर्ती थायलंड देशातील ‘खलाँग ‘वेन’ शहरात आहे. हे खलाँग ‘वेन शहर ‘चाचाँग्सओ’ नावाने देखील ओळखले जाते. ‘गणेशाचे शहर’ म्हणून या शहराची ओळख आहे. ही मूर्ती सुमारे 40 मीटर उंच असून ती पूर्णपणे पितळ धातूपासून बनलेली आहे. ही मूर्ती आंतरराष्ट्रीय उद्यानात असून येथे दरवर्षी जगभरातील लाखो पर्यटक फिरायला येतात व त्यात भारतीयांची संख्या सर्वाधिक असते.
 
आठशे तुकडे जोडून मूर्ती
थायलंडमधील ही (Asia tallest Ganesha idol) गणपतीची मूर्ती शंभर वर्षांपूर्वी तयार केली गेली असावी असे वाटते. परंतु तसे नाही. ही अतिविशाल मूर्ती निर्माण करण्यास 2000 सालापासून सुरुवात झाली व ती 2012 मध्ये पूर्णत्वास गेली. या जागेचे प्रथम उद्यानात रूपांतर झाले आणि त्यानंतर काही वर्षांनी या उद्यानात गणेशाची ही विशाल मूर्ती बसविण्यात आली. 800 पेक्षा जास्त पितळेचे तुकडे जोडून या मूर्तीची निर्मिती करण्यात आली आहे.
 
 
गणपतीच्या या मूर्तीबद्दल असे म्हणतात की वादळ, भूकंपामुळे या मूर्तीचे नुकसान होऊ नये यासाठी वेगळ्या पद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे. गणेशाच्या हातात बरीच फळं पाहायला मिळतात. पोटावर सर्प आहे आणि मुखात एक लाडू आहे आणि पायावर एक उंदीर बसलेला आहे. थायलंड देशामध्ये ‘नशीब आणि यशाची देवता’ म्हणून श्रीगणेशाची पूजा केली जाते.