नवी दिल्ली,
Microsoft Wordpad : जवळपास 28 वर्षांपूर्वी वर्डपॅडने बाजारात पाऊल ठेवल. हा विंडोजचा एक महत्त्वाचा भाग होता. आता हा महत्त्वाचा भाग निरोपाच्या उंबरठ्यावर आहे. मागील काही वर्षांपासून याचे कोणतेही सुधारित व्हर्जन न मिळाल्याने मायक्रोसॉफ्टने याला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मायक्रोसॉफ्टने येत्या काही दिवसांत (Microsoft Wordpad) वर्डपॅड बंद करण्याची योजना आखली आहे. याला अद्ययावत केले जाणार नाही. कंपनीने आपल्या यूजर्सना रिच टेक्स्ट डॉक्युमेंट्स एमएस वर्ड किंवा डॉक्युमेंट्सवर स्वीच करण्याचा सल्ला दिला आहे. वर्डपॅडला पर्याय म्हणून कंपनी आता नोटपॅडला नव्या स्वरूपात आणणार असल्याचे समजते.
या सर्व घडामोडींमुळे आगामी काळात विंडोज 12 मध्ये वर्डपॅड राहणार नाही. सध्या (Microsoft Wordpad) मायक्रोसॉफ्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) लक्ष केंद्रीत करीत आहे. नव्या विंडोज 12 मध्ये एआय आधारित फिचर्स राहणार आहेत. याविषयी कंपनीकडून अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, विंडोज 12 आगामी 2024 पर्यंत आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात आणखी काय-काय नवीन फिचर्स राहणार, हे अद्याप जाहीर झाले नसले तरी, यात वर्डपॅड राहणार नाही, हे निश्चित मानले जात आहे.