फळ पिके देठीं।निमित्य वारियाची भेटी॥

14 Jan 2024 05:45:00
तुका आकाशाएवढा
Saint Tukaram Maharaj : संत तुकाराम महाराजांनी जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यास खूप मार्गदर्शन केलेले आहे. आपल्या शेताची काळजी कशी घ्यावी? पीक कशा प्रकारे काढावे? त्याचे रक्षण कधी व कसे करावे? या संदर्भात सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच स्वरूपाचे मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या शेतात असलेल्या फळबागांसंदर्भात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेतू एकच की, त्याचे नुकसान व्हावयास नको. तो मोठ्या कष्टाने पीक घेत असताना अनेक चुका त्याच्या हातून होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग त्याने एवढे कष्ट उपसून घेतलेले पीक त्याच्या हातून जाऊ नये. त्या संदर्भातील त्याचे असणारे अज्ञान दूर करण्याचे हेतू मनात बाळगून ठेवतात. कारण या अज्ञानामुळे त्याच्या होणार्‍या प्रचंड प्रमाणातील नुकसानीला तो जबाबदार असतो. ही बाब त्याच्या लक्षात येत नाही. त्याला असे वाटते की, आपण जे काही करतो ते बरोबरच आहे. कदाचित ते बरोबरही असेल; परंतु कधी कधी त्याची पद्धत चुकत असताना ती लक्षात येत नाही; म्हणून ही बाब त्याच्या लक्षात आली पाहिजे. यापुढे त्याचे असे नुकसान व्हायला नको म्हणूनच त्याला मार्गदर्शनाची गरज लक्षात घेता त्याला साध्या, सरळ, सोप्या भाषेत महाराजांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
 
 
Saint Tukaram Maharaj
 
संत-महात्मे दूरदर्शी असतात. निमित्त शेतीचं जरी असले, तरी या दिलेल्या एका द़ृष्टांतावरून अनेक गोष्टी शिकावयाच्या असतात. त्या नीट समजून घ्यावयाच्या असतात. केवळ शेतकर्‍यालाच समजावून सांगत नसून ते आपल्या हिताच्या कोणत्या गोष्टी आहेत व अहिताच्या कोणत्या आहेत याबाबत नेहमी सर्वांनाच या द़ृष्टांतावरून जाणीव करून देत असतात. ही बाब सुजाण असलेल्या माणसांच्या लक्षात यायलाच पाहिजे. अनेक वेळा आपण आपल्या उन्नतीच्या द़ृष्टीने कार्य करीत असतो. लाभापर्यंत जातोसुद्धा, परंतु पाहिजे तसा लाभ मात्र होताना दिसत नाही. याचे कारणही लक्षात येत नाही. परंतु संतांनी केलेल्या उपदेशाचे आपण जर तंतोतंत पालन केल्यास आपण निश्चितपणे उद्दिष्टापर्यंत जाऊन आपणास पाहिजे तो लाभ घेऊ शकतो. म्हणूनच संतांचे मार्गदर्शन जीवनात अत्यंत मोलाचं ठरतं. त्यांनी दिलेले द़ृष्टांत सर्व परिस्थितीला लागू पडताना दिसतात. पक्व झालेल्या फळासंदर्भातील केलेला उपदेश केवळ शेतकर्‍याच्या हिताचा नसून तो आपणासही तेवढा मार्गदर्शक ठरतो. केवळ शेती आणि शेतकरी असा नसून तो आपआपल्या कार्याच्या द़ृष्टीने लागू पडतो. त्या स्वरूपाचा संदर्भ आपण लावावयास पाहिजे. निमित्त मात्र शेतकरी आहे. पक्व-अपक्व विचार समजून घेण्याच्या द़ृष्टीने पक्व विचार कसा ओळखावा, हे फळाचा द़ृष्टांत देऊन शेतकर्‍याला उपदेश करताना महाराज म्हणतात की,
 
फळ पिके देठीं। निमित्य वारियाची भेटी॥
हा तों अनुभव रोकडा। कळो येतो खरा कुडा॥
तोडिलिया बळें। वाया जाती काची फळे॥
तुका म्हणे मन। तेथे आपुले कारण॥ अ. क्र. 1848
आपल्या शेतीत शेतकर्‍याने फळबाग लावलेली असताना त्या फळझाडांचे यथोचित असे संगोपन करून त्या झाडांना योग्य असे त्याला पूरक खतपाणी केल्यामुळे ती बहारात येत असताना अधिक काळजी घ्यावी लागते. केलेल्या मेहनतीला त्याच्या फळे लागल्याने श्रमसाफल्य झाल्याची भावना त्याला उल्हसित करीत असते. म्हणूनच झाडाला लागलेली फळे पाहून त्याला खूप आनंद होत असतो. या फळांच्या बाबतीत त्याला त्याच्या अनुभवावरून त्या फळांच्या तोडणीबाबत विचार करायला लावतो. ही फळे कधी व कशी उतरावयाची की जेणेकरून आपले नुकसान न होता व फळे सुव्यवस्थित काढण्याबाबतीचा निर्णय महत्त्वाचा ठरतो. कोणती फळे पिकली व कोणते फळे कच्ची राहिलेली आहेत, हे ओळखता आले पाहिजे. याबाबतचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. कारण जर न पिकलेली फळे उतरविल्यास त्याचे नुकसान होऊ शकते; की जे कधीही भरून निघण्यासारखे नसते. झाडाला लागलेली असंख्य फळांपैकी पाडाला जी फळं लागतात त्या फळांचा देठ सैल होत जातो. त्याला झाडावर चढून अशी फळे काढण्याची काही एक गरज नसते तर थोडीशी जरी हलकी हलकी हवा सुटल्यास अशी फळे आपोआप निसटतात. देठाजवळ पिकल्यामुळे ती जमिनीवर येऊन पडतात. परिपक्व झाल्याची वाट पाहावी लागत नाही. असा आजवरचा अनुभव प्रत्येक शेतकर्‍याला असतो. असा हा रोकडा म्हणजेच रोख अनुभव आहे. हा अनुभव एवढा असतो की खरे काय नि खोटे काय याबाबतची त्याला माहिती होऊन जाते. पक्के व कच्चे यातला असणारा फरक त्याला लगेच जाणवतो की, झाडावरचं कोणतं फळ पिकलेलं आहे. पक्के झालेलं आहे. अशा फळांना जास्तीची ताकद लावून तोडावे लागत नाही. अशी ताकद लावून फळे तोडल्यास ती कच्ची फळे वाया जातात. पिकलेल्या फळाला ताकद लावण्याची गरज भासत नाही; ते हवेची थोडीशीही झुळक सुटल्यास खाली येऊन पडते. असे फळ आपल्याला पक्व झाल्याचा दाखलाच देते.
 
 
जर का शेतकर्‍याने अपरिपक्व फळे काढण्याचा प्रयत्न केल्यास अशी ही कच्ची फळे कितीही दिवस ठेवली तरी ती पिकत नाही. त्यांचा असलेला रंगही बदलत नाही किंवा त्याच्या चवीतही बदल होत नाही. अशी फळे खाण्यास योग्य ठरत नाही. ती कोणत्याच कामी येत नाही. जरी काही कारणास्तव शेतकर्‍याने फळे झाडावरून उतरवून घेतली असता ती कोणाच्याच कामी येणार नाही. त्याचा परिणाम म्हणजे त्याला होणार्‍या नुकसानीला सामोरे जावे लागेल. म्हणून अशी कच्ची फळे काढण्याची कधीही घाई करू नये. Saint Tukaram Maharaj महाराजांनी हा द़ृष्टांत फळांच्या बाबतीत दिलेला असला, तरी दुसर्‍या अंगाने मानवी व्यक्तिमत्त्वाबाबतसुद्धा याचा विचार आपणास करता येईल. तो असा की, मानवी स्वभाव, कर्तृत्व, मानवतावादी विचार. त्याबाबतचे परीक्षण करण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन केलेले आहे. खर्‍या-खोट्याचा निवाडा कसा करावा? कच्चे-पक्के कसे ओळखावे? कोणत्या गोष्टीमुळे नुकसान कसे टाळता येईल? यश कसे प्राप्त करावे? या संदर्भात साडेतीनशे वर्षांपूर्वी जी जीवनमूल्ये मांडली ती आजही जीवनोपयोगी आहेत. कोणत्या गोष्टी कराव्या किंवा करू नये? कच्चे-पक्के कसे ओळखावे? याबाबत दाखले देऊन स्पष्ट केले आहे.
 
 
Saint Tukaram Maharaj ; जो विचार फळांच्या बाबतीत केला तोच मानवाच्या बाबतीत होय. कारण हा विचार करताना असे लक्षात येते की, कोणते काम कोणी करावे. कारण योग्य कार्य करण्यासाठी योग्य व्यक्तिमत्त्व लागत असते. म्हणून एखाद्या कामाची जबाबदारी सोपविताना तो ती पार पाडू शकेल किंवा नाही याबाबत लक्षात घ्यावे लागेल. कोणाकडून कोणती अपेक्षा करावी? कारण त्याला त्या कामाच्या बाबतीत कितपत माहिती आहे. त्याबाबतचा अनुभव लक्षात घेता ती त्याला पेलेल किंवा नाही? हे ओळखणे महत्त्वाचे ठरते. जर का त्याला परिपूर्ण अशी माहिती नसेल तर तो ते कार्य करण्यास सक्षम ठरणार नाही. त्याठिकाणी हार निश्चित होईल. होणार्‍या नुकसानीला सामोरे जावे लागेल. संरक्षणाच्या द़ृष्टीने हाच विचार केला जात असतो. कोणत्या सैनिकाची कुठे ड्युटी लावावी लागेल तर कुठे प्रस्तावित युद्ध जिंकता येते. अर्थात पक्क किंवा सक्षम असेल तरच फायदा निश्चित होईल. त्याचं पक्केपण सिद्ध करण्याची गरज भासणार नाही. म्हणून अर्धवट काम केल्यापेक्षा तो जोपर्यंत निपूण होत नाही तोपर्यंत त्याकडून अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. म्हणूनच परिपक्वतेचे लक्षण दिसत नाही तोपर्यंत प्रतीक्षेला महत्त्व असते. कारण त्याचं कच्चेपण आपणाला महागात पडेल. म्हणूनच प्रतीक्षा न केल्यास होणारे नुकसान टाळणे शक्य नाही. याला कारणीभूत आपलंच मन असतं, हे महाराजांनी सांगितलं आहे. म्हणून निर्णय घेताना तो काळजीपूर्वक घेतला गेला पाहिजे. याकरिता आपल्याला आलेल्या अनुभवाच्या द्वारे आपलं मन ताब्यात ठेवून आणि अनुभवाच्या आधारावरच योग्य-अयोग्य, कच्चे-पक्के, खरे-खोटे ओळखता आले पाहिजे. कच्च्या म्हणजेच अनुभवशून्य माणसाकडे काम न सोपविता लायक अनुभवी त्याची परिपक्वता ओळखून कार्य केल्यास आपण यशस्वी ठरू शकतो.
 
- प्रा. मधुकर वडोदे
- 9422200007
Powered By Sangraha 9.0