गिरड येथील 65 खांबावरच्या राम मंदिराचे तिसर्‍या शतकात प्रवेश

20 Jan 2024 19:32:32
गिरड, 
Girad Shriram Mandir : गिरड येथील निसर्गरम्य टेकडी परिसर आणि शेजारी असलेले वैविध्यपूर्ण वनप्रदेश पर्यटकांना खुणावणारे आणि भाविकांना भुरळ घालणारे आहे. येथील श्रीराम मंदिरात रामदास स्वामी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजासह अनेक संत वारसा लाभला आहे. गिरड येथील श्रीराम मंदिर निर्मितीला दोन शतकापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. 208 वर्ष जुने राम मंदिर आजही 65 खांबांवर उभे आहे.
 
 
GIRAD
 
 
येथील श्रीराम देवस्थान निर्मितीपूर्वी संत सीताराम महाराज हे मठात राहत होते. 1815 मध्ये या मठाचे रूपांतरण श्रीराम मंदिरात करण्यात आले. 1815 मध्ये श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पहिल्यांदाच श्रीरामाची रथ शोभायात्रा काढण्यात आली होती. 1815 मध्ये सीताराम महाराज भ्रमण करीत पैठण येथून गिरडला आले. सध्याच्या गोपालकृष्ण मंदिरालगत झोपडी निर्माण करून राहू लागले. या दरम्यान श्रीराम प्रभू सीता माता, लक्ष्मणाची लाकडाची मूर्ती स्थापन केली. 1843 मध्ये त्यांनी देह ठेवला. येथील कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता सीताराम महाराजांचे शिष्य रामकृष्ण महाराज यांना दीक्षा दिली. 1850 मध्ये जयपूर येथून रामलक्ष्मण सीता यांच्या मूर्ती आणून त्यांची स्थापना करण्यात आल्याचा इतिहास आहे.याकाळात रामकृष्ण महाराजांनी जवळपास तीस वर्षे श्रीराम जन्मोत्सवाची परंपरा चालविली. रामकृष्ण महाराजांच्या देहत्यागानंतर त्यांचे शिष्य बाजीराव महाराजांनी जबाबदारी सांभाळली.
 
याकाळात श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या काळात श्रीराम मंदिराला जमीन दानात मिळाली. या शेतीच्या उत्पन्नातून मंदिराचे बांधकाम करण्यात आले. 1888 मध्ये बाजीराव महाराजांनी समाधी घेतली. बाजीराव महाराजांचे शिष्य मंसाराम यांनी 10 वर्षे मंदिराचा कारभार सांभाळला.1898 मध्ये मंसाराम महाराजांनी देह ठेवला. याच काळात मंसाराम महाराजांचे शिष्य दुसरे सीताराम महाराजाकडे कारभार सोपविला. मंसाराम महाराजांनी शेतीच्या उत्पादनातून मंदिराची निर्मिती केली. येथील श्रीराम मंदिर 65 खांबावर उभारण्यात आले आहे. मंदिर निर्मिती करिता 24 वर्षाचा कालावधी लागल्याचे सांगितले जाते.
 
गिरड येथील श्रीराम मंदिरातून 1885 पासून रथ यात्रा काढली जाते. लाकडाच्या रथावरील घोड्यावर विराजमान असलेल्या श्रीरामाची मूर्ती आहे. हा रथ चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी येथील कारागीर लक्ष्मण गुंडीया व त्यांच्या सहकार्‍याने तयार केला आहे. येथील जन्मोत्सवाची रथ यात्रा पूर्वी मध्यरात्री नंतर काढून रात्रभर गावातील मुख्य मागनि मार्गक्रमण करायची. मात्र न्यायालयाच्या निर्बंधामुळे सायंकाळी 6 ते रात्री 10 दरम्यान ही रथ यात्रा काढण्यात येते.
Powered By Sangraha 9.0