तभा वृत्तसेवा
आर्वी,
Ram Mandir : अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना मंगल सोहळ्यानिमित्त आर्वी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रा श्रीराम मंदिर श्रीराम वॉर्ड येथून निघाली. मायबाई मंदिर, रामदेव बाबा, मंदिर, गांधी चौक, शिवाजी चौक शालीग्राम धर्मशाळेचे नरसिंग मंदिर पटांगणात पोहोचली. शोभायात्रेमध्ये महिला भजन मंडळ व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शोभायात्रेच्या मार्गावर प्रत्येक घरासमोर सडा टाकून रांगोळी काढण्यात येऊन रामरथाचे स्वागत करण्यात आले. प्रमुख मार्ग व चौक रामध्वज, पताका लावून संपूर्ण परिसर राममय झाला. Ram Mandir शोभायात्रेच्या मार्गावर पाणी शरबत फळ फराळ व प्रसादाचे वाटप जागोजागी करण्यात आले. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले तसेच अयोध्या येथे कारसेवेकरिता गेलेल्या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.
शहरातील नामवंत गायकांचा गीत रामायण व भक्ती संगीताचा कार्यक्रम झाला. आर्वी शहरातील आजची शोभायात्रा सर्वांत मोठी होती अशी भावना आर्वीकारांनी व्यक्त केली. श्री रामजन्मभूमी अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळा, राम मंदिर शिरपूर रोड, संतोषी माता मंदिर येथे अग्रवाल समाज व गिता परिवाराच्या वतीने सुंदरकांड, भजन झाले. Ram Mandir माहेश्वरी समाजाद्वारे माहेश्वरी भवन येथे सुंदर कांड, भजन, प्रसाद आयोजित करण्यात आला. शहरातील विविध मंदिरे,श्री दुर्गा उत्सव समिती, श्री गणेश मंडळ यांनी भजन, दिंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्री यंत्र निवासिनी श्री रेणुका देवी मंदिर आर्वीच्या वतीने प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने 51 किलोचा लाडू बनवण्यात येऊन प्रसाद वाटप करण्यात आले. ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मंदिरांमध्ये भजन कीर्तन व दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.