चक्क पर्यटकांसमोर वाघाने वनमजुराला नेले ओढत!

25 Jan 2024 18:59:49
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाने 52 वर्षीय वनमजुरावर हल्ला करून जंगलात ओढत नेले आणि हा प्रकार चक्क वाघांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांसमोर घडला. त्यामुळे एकच थरकाप उडाला. अंगावर आणणारी ही घटना गुरुवार, 25 जानेवारी रोजी ताडोब्यातील निमढेला भागात घडली. रामभाऊ रामचंद्र हनवते असे मरण पावलेल्या वनमजुराचे नाव असून, ते प्रकल्पात रोजंदारीवर काम करीत होते.

Tadoba-Andhari Tiger Reserve 
 
गुरूवारी सकाळी रामभाऊ नेहमीप्रमाणे आपल्या कामावर रूजू झाले. काम आटोपून ते त्याच भागात असलेल्या झाडांची कवट फळे वेचत होते. Tadoba-Andhari Tiger Reserve परिसरात एका वाघिणीचा वावर आहे. ती आपल्या बछड्यांसह या भागात फिरताना आढळून आली होती. पर्यटकांना अगदी सहज दर्शन होत होते. रामभाऊ हनवते यांच्यावर या वाघिणीने हल्ला केला. रामभाऊ यांनी आरडाओरड केली तेव्हा जवळच असलेल्या पर्यटकांची नजर त्यांच्याकडे गेली. तेव्हा वाघ वनमजुराला चक्क ओढत नेत होता. हे बघून पर्यटकांचा थरकाप उडाला. या घटनेची माहिती तात्काळ संबंधित वनाधिकार्‍यांना देण्यात आली. थोड्या वेळात वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या परिसरात तपास केला असता जंगल परिसरातील झुडपात रामभाऊ यांचा मृतदेह आढळून आला.
 
Tadoba-Andhari Tiger Reserve
 
मृतक रामभाऊंचा मुलगा रंजीत हनवते हा ताडोबा प्रकल्पात मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. त्याला Tadoba-Andhari Tiger Reserve ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने तातडीची आर्थिक मदत देण्यात आली असून, उर्वरित मदत लवकरच देण्यात येईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी दिली. या घटनेनंतर वनात कार्यरत वन विभागाच्या कर्मचार्‍यांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली आहे. यापूर्वी माया वाघिणीने एका वनरक्षक महिलेवर हल्ला करून ठार केले होते. तेव्हा वनकर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा विषय समोर आला होता. मात्र, त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
Powered By Sangraha 9.0