Republic Day 2024 chadrapur : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, सोबतच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे, त्या शहिदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करू या, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पोलिस मुख्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आ. सुधाकर अडबाले, आ. किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम. यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, सर्व व्यसनांपासून मुक्त होऊन अमृत कलश हातात घेण्याचा संकल्प करणे, हाच खरा प्रजासत्ताक दिन साजरा करणे होय. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केले. अयोध्या येथे झालेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला चंद्रपूरकरांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ हा मंत्र लिहून एक आगळा विश्वविक्रम केला, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता वाघांच्या संरक्षणासोबतच जटायूचे संवर्धन करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 1 लक्ष 84 हजार हेक्टरवर धानाची शेती केली जाते. राज्य सरकारने आता धानाचा बोनस वाढवून 20 हजार रुपये हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत 40 हजार रुपये मंजूर केले आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे यासाठी मोरवा येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून त्याचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या 542.05 कोटीच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचेही यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले.