एकल इंजिन हेलिकॉप्टर देशातच विकसित होणार

27 Jan 2024 19:37:57
- टाटा समूहाचा एअरबससोबत करार
 
नवी दिल्ली, 
टाटा समूह आणि एअरबस या विमान निर्मिती कंपनीत एक महत्त्वाचा करार झाला आहे. यामुळे एच 125 या श्रेणीतील Single engine helicopter एकल इंजिन हेलिकॉप्टर इतर काही विमानांची निर्मिती देशातच होणार आहे. या करारामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळणार असून, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या करारानुसार, गुजरातमधील बडोदा येथे सुट्या भागांची अंतिम जुळवाजुळव केली जाणार आहे. यासाठी 36 एकर जागेवर प्रकल्प उभारला जाणार आहे.
 
 
Single engine helicopter
 
याच वर्षीच्या मध्यापर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची आणि नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हैदराबादमधील एअरबसच्या प्रकल्पावर विमानाचे सुटे भाग तयार केले जातील आणि तिथून ते बडोद्याला आणले जातील. त्यानंतर बडोद्यातच Single engine helicopter या हेलिकॉप्टर आणि विमानांची जुळवाजुळव केली जाईल. बडोदा येथील प्रकल्पात सी-295 प्रकारातील किमान 40 वाहतूक विमाने तयार केली जाणार आहेत, अशी माहिती या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी दिली. टाटा आणि एअरबस यांच्यात हा करार परस्पर संमतीने झाला आहे. ही देशाच्या खाजगी क्षेत्रातील पहिली हेलिकॉप्टर असेंब्ली सुविधा असणार आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन् यांनी याबाबत माहिती दिली. या अंतर्गत तयार होणार्‍या एकल इंजिन हेलिकॉप्टरची निर्यातही केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
 
800 हेलिकॉप्टर्सची तातडीची गरज
सध्या देशात अशा 800 हेलिकॉप्टर्सची तातडीची गरज आहे. ही मागणी विविध क्षेत्रांकडून केली जात आहे. टाटा आणि एअरबस यांच्यातील करारामुळे ही मागणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0