Shetkaryanche Amaran Poshan : यंदाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी अंतर्गत लावण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदिया जिल्ह्यातील शेतकर्यांना दिवसा 12 तास वीजपुरवठा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्यांनी उन्हाळी पिकांची लागवड केली. मात्र 1 जानेवारी रोजी काढलेल्या आदेशाने शेतकर्यांना रात्रीच्या सुमारास 8 तास वीजपुरवठा केला जात असल्याने संतप्त शेतकर्यांनी रस्त्यावर टायर जाळून शासनाविरोधात रोष व्यक्त केला होता. तरीही दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने आज, 28 जानेवारी रोजी संतप्त शेतकर्यांनी आमरण उपोषणाला येथील लाखांदूर चौकात सुरू केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष मिथून मेश्राम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकर्यांनी उपोषणात सहभागी झालेत. जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवरच अवलंबून आहेत. जिल्ह्यातील शेतकरी खरीप व उन्हाळी हंगामात धान पिकांची लागवड करतात. धान पिकाला सिंचनाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. सिंचन करण्यासाठी शेतकर्यांकडे कृषी वीज पंप आहेत. मात्र कृषी वीज पंपांना रात्रीचे प्रहरी वीजपुरवठा होत असल्याने शेतकर्यांना जीव मुठीत घेऊन सिंचनासाठी शेतशिवारात जावे लागते. रात्रीच्या सुमारास शेताशिवारात सिंचनासाठी गेलेल्या शेतकर्यांवर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यामुळे शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथून मेश्राम यांनी अधिवेशनादरम्यान जयंत पाटील यांची भेट घेऊन शेतकर्यांची आपबीती सांगितली.
यावरून जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी लावली होती. यावेळी ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसा 12 तास वीज पुरवठा देण्याची घोषणा केली असल्याची माहिती देण्यात आली. घोषणेवरून जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्यांनी उन्हाळी धान पिकांची लागवड केली. 1 जानेवारी रोजी रात्री 8 तास वीजपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी मिथून मेश्राम यांचे नेतृत्वात अर्जुनी मोरगाव येथील रस्त्यावर टायर जाळून शासनाविरोधात संताप व्यक्त केला होता व दिवसा विज पुरवठा न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार 28 जानेवारी रोजी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. आमरण उपोषणाला मिथून मेश्राम, अनिल लंजे, प्रविण लंजे, विवेक कापगते, सुरेश लंजे, राजेश लंजे, सुरेश खोब्रागडे, पवन नाकाडे, जितेंद्र तुमडाम, राहुल बोलके, राहुल भोयर, रमण परशुरामकर, मोरेश्वर लंजे, यशवंत भोवते यासह शेकडो शेतकरी बसले आहेत.