मानोरा,
Ram Mandir Invitation : प्रभू श्रीरामांच्या मंदिरातील श्रीरामांच्या भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज यांना देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्म जागरण क्षेत्र प्रमुख महेंद्रजी रायचुरा आणि अ. भा. धर्म जागरणचे ज्येष्ठ प्रचारक श्यामजी हरकरे यांनी धर्मपीठाधीश्वर महंत बाबूसिंग महाराज यांची भेट घेऊन २२ जानेवारी रोजी संपन्न होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. धार्मिक,राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्गज अशा ८८९ व्यक्तींना राज्यातून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रित करण्यात आले आहे.
श्रीराम मंदिर प्रशासन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेल्या धर्मपिठाधीश्वर बाबूसिंग महाराज यांच्या निमंत्रणामुळे बंजारा समाज बांधवांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. बंजारा समाजाचे धर्मांतर रोखण्यासाठी बाबूसिंग महाराज मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत, शिवाय समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा, चालीरीती मोडीत काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न असून समाजाने काळाच्या कसोटीवर टिकणारे शिक्षण घेण्यासाठी प्रेरित होण्यासंदर्भात पुढाकार ते घेत असतात.
तीर्थक्षेत्र उमरी येथील सती सामकी माता देवस्थानचे विश्वस्त महंत यशवंत महाराज यांना सुद्धा श्रीराम मंदिर प्रशासन आणि संघ परिवाराकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. निमंत्रण मिळाल्यावर महंत बाबूसिंग महाराज यांनी रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळत असल्यामूळे आनंद द्विगुणित झाल्याचे प्रतिक्रिया दिली.