महाराष्ट्राचा चाणक्य!

12 Oct 2024 06:00:00
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
Chanakya of Maharashtra : हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि काँग्रेसचे अवसान पूर्णपणे गेले. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीचे मनोबल मात्र शेकडो पटीने वाढले. याचे सारे परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसून येणार आहेत, यात कोणतीही शंका नाही. उपमुख्यमंत्री तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनीही पक्ष कार्यकर्त्यांसमोर केलेल्या छोटेखानी भाषणात भाजपाला पुढची विजयी सलामी महाराष्ट्रातून मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. हरयाणातल्या भाजपाची पर्यायाने जागा वाटपावेळी चर्चेला बसणार्‍या फडणवीसांची महायुतीतली बार्गेनिंग पॉवर आता कितीतरी पटीने वाढली आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीत सुरू झालेल्या कुरघोडीने आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र समोर आले आहे. तब्बल ३० वर्षे भाजपासोबत युतीत राहून भाजपावर, भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वांवर टीका करण्याचा प्रकार उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पिलावळींनी सातत्याने केला. स्वतःच्यात दम नाही, पण दुसर्‍यांच्या कुबड्यांवर जगूनही त्याच कुबड्यांवर कुरघोडी करणे, अपमान करणे अशी वाईट सवय जडलेल्या ठाकरे आणि पिलावळींनी आता आघाडीतील काँग्रेस पक्षावर कुरघोडी करण्याचा, अपमान करण्याचा प्रकार चालवला आहे. मागील काळातही छोटे-मोठे प्रताप हे करतच आलेत, पण यावेळी तोंड जरा जास्तच उचकटलंय् यांचं. आता काँग्रेसला कळलं असेल भाजपाची सोबतची अवस्था. बाकीचे अनुभवदेखील हळूहळू येतीलच. म्हणतात ना सापाला कितीही दूध पाजलं तरी तो त्याचा गुणधर्म सोडत नाही किंवा कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असते. ज्या ताटात खाल तेथेच भोक पाडणे, अशा काही ज्या प्रचलित म्हणी आहेत ना त्या तंतोतंत लागू होतात यांना.
 
 
Fadanvis
 
हरयाणातील काँग्रेसची उडालेली धूळधाण बघता महाराष्ट्रात वाट बिकट झाली आहे. हा निकाल भाजपा आणि फडणवीसांसाठी थोडा दिलासा देणारा ठरला आहे. तरीपण फडणवीसांसमोरची आव्हानं काही कमी झालेली नाहीत. तसे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे काही राजकारण केले त्यामध्ये त्यांनी भाजपाप्रती समर्पण, शिस्त आणि विकासाचे व्हिजन याच्या जोरावर जनतेची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूरचा सर्वात तरुण होण्यापासून महाराष्ट्राचे सलग पाच वर्षे मुख्यमंत्री होणारे दुसरे व्यक्ती असे स्थान पटकावण्यापर्यंत त्यांनी आपले कौशल्य दाखवले आहे. त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ विकास कामांच्या ब्लू प्रिंटने अंकित केला आहे. महाराष्ट्रात अलिकडे झालेल्या बहुतांश विकास प्रकल्पांवर फडणवीस यांच्याच दूरदृष्टीची छाप दिसून येते. राज्यातील पायाभूत सुविधा असोत, उद्योगधंदे असोत किंवा शहरी नियोजन त्यांच्या दूरदृष्टीचा आणि प्रशासकीय चातुर्याचा ठसा त्यावर दिसून येतो. फडणवीस हे एक असे नेते आहेत की, ज्यांच्या प्रभावाने महाराष्ट्रातील विकासाचा पुढच्या दहा वर्षांचा सारीपाट प्रत्येकाच्या डोळ्यासमोर तरळतो. पण त्यांच्या सोबत सत्तेत सामील असणार्‍या ठाकरे आणि त्यांच्या चेल्यांनी कधीही फडणवीसांच्या विकास कामात सहकार्य केले नाही. उलट त्यात खोडा घालण्याचे काम त्यातही कुठले काम उद्धव ठाकरेंनी सांगितले असेल, तर ते सचिन वाझेंना नोकरीत सामावून घेण्यासारखे; जे फडणवीसांनी नियमात बसत नसल्याने केले नाही. यावरून ठाकरेंचे व्हिजन आणि प्राथमिकता काय होती, याची प्रचीती येते.
 
 
Chanakya of Maharashtra : महाराष्ट्रातील भाजपात नेहमीच स्पर्धात्मक परिस्थिती राहिली आहे. फडणवीस २०१४ मध्ये जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा पक्षातील इतर नेते, मग विनोद तावडे असोत, एकनाथ खडसे असोत किंवा पंकजा मुंडे असोत, यांनी फडणवीस कधी पायउतार होतात याकरिता पुरेपूर प्रयत्न केले. त्यात उद्धव टोळीदेखील सहभागी होती. त्यांनी काही कमी प्रयत्न केले नाही. एकनाथ खडसे ज्यांनी मुख्यमंत्रिपद मिळत नाही या एकमेव मुद्यावर महसूल खात्यासह दहा विविध महत्त्वाच्या खात्यांचा कारभार आपल्याकडे घेतला होता. मुंडे तर जाहीरपणे सांगत होत्या की, जनतेतील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे. विनोद तावडे यांनी बर्‍यापैकी संयम राखला असला, तरी मनुष्यबळ विकास या मंत्रालयांतर्गत येणार्‍या सर्व विषयांचा कारभार त्यांनी आपल्या हाती घेतला होता. या पक्षांतर्गत आव्हानांसह विरोधकांपेक्षा कमी नसलेला सहकारी पक्षाच्या त्रासातून फडणवीसांनी अचूक मार्ग काढला. मग खडसेंनी पक्ष शरद पवारांचा हात धरला तर तावडेंनी थेट दिल्ली गाठली. पंकजा मुंडे मात्र तळ्यात-मळ्यात करत होत्या. केंद्रीय नेतृत्वाने गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणून त्यांच्यावर मध्यप्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी टाकली. पण ती जबाबदारी पार पाडण्याऐवजी त्या महाराष्ट्रभर रॅली काढण्यामध्येच धन्यता मानू लागल्या. पण महाराष्ट्रातील आव्हानांना तोंड देत विरोधकांची पुरती धूळधाण उडविली आणि धोक्याने गमावलेली सत्ता पुन्हा हस्तगत केली.
 
 
आता विधानसभा निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात. अशावेळी भाजपाला महाराष्ट्रात कमकुवत करायचा असेल तर फक्त आणि फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केले पाहिजे, असा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे आणि होत राहणार. यासाठी भाजपातील त्यांचे विश्वासू सहकारी त्यांच्यापासून जाणार. त्यांना आपल्या बाजूने उतरवले जाणार, याची जाणीव फडणवीस यांनाही आहे. परंतु महाभारतात पांडवांकडून अभिमन्यूने जशी खिंड लढवली तशी खिंड आता भाजपाकडून देवेंद्र फडणवीस लढविणार असे दिसते. त्यांनी स्वतः एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, मी आधुनिक महाभारतातला अभिमन्यू आहे. मला चक्रव्यूह भेदता येतो. त्यांचे हे विधान फार महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या महाराष्ट्र दौर्‍यात फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. विरोधकांच्या टीकेला पचवत, त्यांना प्रत्युत्तर देत पक्षांतर्गत कुरबुरी निपटवून महाराष्ट्रात पुन्हा भाजपाप्रणीत सरकार स्थापन करायचे तर महायुतीला फडणवीसांशिवाय पर्याय नाही, हेच खरे आहे.
 
 
Chanakya of Maharashtra : त्याचवेळी हरयाणात काँग्रेसला फाजील आत्मविश्वास नडला. केवळ जाट समाजाच्या भरवशावर सरकार स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न तेथील जनतेने उधळून लावला. महाराष्ट्रातही मराठा, धनगर, ओबीसी अशा विविध समाजघटकांच्या आंदोलनाला हवा देत विरोधक सत्ताधारी महायुतीवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहे. पण जनता आता सुज्ञ झाली आहे. खोट्या भूलथापांना भुलणारी नाही. यावेळी मविआमध्येदेखील मोठे आव्हान एकमेकांचेच उभे ठाकले आहे. उबाठा काँग्रेसवर उखडत आहे. हरयाणासारखी महाराष्ट्रात होणार नाही. कारण येथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत. याचा अर्थ काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना कोणी विचारत नाही. आमच्या जिवावर काँग्रेसचे अस्तित्व असल्याचे हे सूचक विधान आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान आणि हरयाणासारखा अतिआत्मविश्वास काँग्रेसला महाराष्ट्रात आहे तर दुसरीकडे ठाकरे, पवार या आघाडीच्या चाणक्यांना मात्र हा आत्मविश्वास कारण त्यांनासुद्धा खात्री झालेली आहे. महाराष्ट्रात आजघडीला एकच फडणवीस नावाचा चाणक्य आहे. 
 
- ९२७०३३३८८६
Powered By Sangraha 9.0