सामर्थ्यशाली राष्ट्राची आराधना आवश्यक

14 Oct 2024 06:00:00
अग्रलेख...
Hindu Samaj : ‘धर्म व संस्कृती आणि सनातन मूल्यांच्या रक्षणासाठी आणि स्वत:च्या अस्तित्वासाठी हिंदूंची एकजुटता अतिशय आवश्यक असून, आताच जर एक झालो नाही तर हिंदू समाज दुर्बल होऊन भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. सद्भाव आणि सहिष्णुतेचे रक्षण बलसंपन्न समाजच करू शकतो. दुर्बलता घातक असून, जग दुर्बल लोकांना महत्त्व नाही तर सामर्थ्यशाली, शक्तिसंपन्न लोकांचीच सर्वत्र पूजा होते’ हा सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विजयादशमीच्या पर्वावर दिलेला संदेश समस्त हिंदू समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि हिंदूंना आत्मचिंतन करण्यास व अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करणारा आहे. हिंदू समाजाला व भारताला दुर्बल करणार्‍या शक्तींचे अंत:स्थ हेतू ओळखून या देशद्रोही शक्तींचा पाडाव करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय होण्याच्या आवश्यकतेवरही सरसंघचालकांनी आपल्या भाषणात भर दिला. हिंदू समाजाला आपले स्वत्व, स्वाभिमान, शौर्य, पराक्रम, उदात्त संस्कृती, शाश्वत मूल्ये, भव्य-दिव्य परंपरा, इतिहास, विजयी वारसा यांचा विसर पडला आणि त्यामुळेच आज विविध प्रकारची सांस्कृतिक व वैचारिक आक्रमणे हिंदूंवर होत असून, समाजाला दुर्बल करीत आहेत, याविषयी सरसंघचालकांनी आम्हा सर्वांनाच सजग, केले आहे.
 
 
Rss bhagavatji
 
वस्तुस्थिती ही आहे की, ज्या देशाला किंवा ज्या देशातील नागरिकांना आपल्या उज्ज्वल इतिहासाचा आणि भूगोलाचा विसर पडतो तेव्हा ते राष्ट्र एकतर दुर्बल होते किंवा विभाजित होते किंवा त्या राष्ट्राचा विनाश तरी होतो. आज अफगाणिस्तान, पाकिस्तान व वर्तमानातील बांगलादेशातील परिस्थितीतून ही बाब सिद्ध झाली आहे. जेव्हा जेव्हा हिंदू विसरला तेव्हा तेव्हा या राष्ट्राचे विभाजन झाले आहे. बांगलादेशातील अल्पसंख्यक हिंदूंवर सध्या अस्तित्वाचेच भयंकर संकट कोसळले आहे. मात्र, तेथील हिंदूंनी काळाची पावले ओळखून एकत्रित होऊन शक्तीचा हुंकार केला आणि त्यामुळेच हिंदू समाजाचे काही प्रमाणात रक्षण झाले. बांगलादेशातील या घटनांचा यथार्थ बोध भारतातील हिंदूंनी घेतला पाहिजे. याचे कारण असे की, हा पराक्रम, शौर्य, विजिगीषुवृत्तीची आठवण करून देणारा सण आहे. त्यामुळे समस्त हिंदू समाजाने गतवैभव प्राप्त करण्यासाठी व भारतमातेला पुन्हा तिचे गौरवाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी तन-मन-धनपूर्वक राष्ट्र आराधना केली पाहिजे. सामाजिक समरसता, पर्यावरण, नागरी कर्तव्य, कुटुंब प्रबोधन आणि स्वआधारित व्यवस्था या पंचसूत्रांच्या आधारावर पुढील वाटचाल करण्याचे सरसंघचालकांनी केलेले आवाहन महत्त्वाचे आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाला बळकटी प्राप्त करून देणारे आहे. केवळ समानतेच्या नाही तर आत्मीयतेच्या पायावर व्यक्ती आणि राष्ट्राचा विचार भारतीय संस्कृतीत केला जातो. भारताच्या राष्ट्रवादाचा उदय स्वार्थासाठी नाही, त्याचा आधार परस्पर संघर्ष नाही तर समन्वय आणि परस्पर अनुकूलता हा आहे. सामूहिक जीवनाची समान अनुभूती सर्व भारतीयांच्या अंत:करणात निर्माण व्हावी, राष्ट्र म्हणून आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. राष्ट्र जीवनाच्या आधारे मनुष्यात उदात्त तत्त्वे विकसित होऊ शकतात. मानवी जीवनातील श्रेष्ठ गुणांची आराधना भारतीयत्वाची विशेषता आहे. या पृष्ठभूमीवर सरसंघचालकांनी प्रतिपादिलेल्या पंचसूत्रांकडे पाहिले पाहिजे. कोणतेही राष्ट्र बळकट व्हायचे असेल तर समाजातील भेदभाव संपुष्टात यायला हवेत व सर्वांमध्ये ऐक्याची भावना वृद्धिंगत होण्याची आवश्यकता आहे. सामाजिक समरसतेची आवश्यकता आहे. आज पाश्चात्त्यांच्या भोगवादी व चंगळवादी संस्कृतीचा भारतीय जनमानसावर एवढा पगडा आहे की, देशवासीयांना भारताची उदात्त संस्कृती व चिरंतन जीवनमूल्यांचा विसर पडला आहे. त्यामुळेच भारतीयांनी सरसंघचालकांनी सांगितलेल्या पंचसूत्रांचा प्रामाणिकपणे अवलंब केला तर हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य बनू शकते. पाश्चात्त्यांच्या ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’ आणि जडवादी विचारसरणीमुळे स्तरावरच पर्यावरणाचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनसामग्रीचा अंदाधुंद वापर केल्यामुळे भारतासमोरही पर्यावरण संरक्षणाचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच नागरिकांना आपल्या कर्तव्यबुद्धीचा विसर पडल्यामुळे अनेक सामाजिक स्वरूपाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्यघटनेने आपल्याला जसे मूलभूत अधिकार दिले आहेत तसेच कर्तव्य पालनही सांगितले आहे. मात्र, आम्हा आत्मकेंद्रित वृत्तीमुळे आम्हाला देश व समाजविषयक कर्तव्याचा विसर पडला आणि अधिकार तेवढे लक्षात राहिले.
 
 
 
Hindu Samaj : टोकाची व्यक्तिवादी विचारसरणी, ‘मी’ आणि ‘माझे’ या पाश्चात्त्य मूल्यांना भारतीयांनी आपल्या जीवनात स्थान दिल्यामुळे संकुचित व आत्मकेंद्रित वृत्ती, कमालीचा स्वार्थ घराघरात, कुटुंबात वाढला. आधुनिक जीवनशैलीमुळे भारतीयांची परंपरागत कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त झाली. स्थैर्य, समाधान, समन्वय, सहकार्य, त्याग मूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्थेला हादरे बसल्याने पुन्हा नव्याने कुटुंब प्रबोधन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. संस्कार निर्माण करणारी, चारित्र्य घडविणारी, नीतिमूल्यांचे संवर्धन करणारी, शाश्वत जीवनमूल्यांवर आधारित कुटुंब व्यवस्था नव्याने निर्माण करणे हे हिंदू समाजापुढचे मोठेच आव्हान आहे. यासाठी कुटुंब प्रबोधन ही काळाची गरज आहे. भारतीयांना अर्थात हिंदूंना ‘स्व’चा विसर पडल्याने क्षेत्रात परकीयांचे अनुकरण करण्याची वृत्ती बळावली. मग ती राज्यव्यवस्था असो किंवा अर्थव्यवस्था, स्वदेशी अथवा कायदे असो की उद्योग व कृषी क्षेत्र असो. प्रत्येक वेळी परकीयांचे अनुकरण करण्याची वृत्ती अतिशय घातक आणि आणि या देशाच्या अस्तित्वालाच नख लावणारी आहे. त्यामुळे भारताने आपल्या शाश्वत विचारांच्या, अस्सल भारतीय जीवनमूल्यांवर आधारित व्यवस्था विकसित पाहिजे आणि त्याचाच अवलंब केला पाहिजे. स्वदेशी निर्मित वस्तू, उत्पादने खरेदी करण्यावर अधिकाधिक भर दिला पाहिजे. त्यामुळे देशातील संपत्ती देशातच राहून कोट्यवधी लोकांना रोजगार मिळू शकेल. त्यामुळे स्वदेशी आधारित अर्थव्यवस्था भारताला अधिकाधिक बळकटी देणारी ठरू शकते. आज इस्रायल, जपान, चीन, रशिया, जर्मनी या देशांनी प्रखर राष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या जोरावर आधारित व्यवस्था निर्माण केली. प्रत्येक क्षेत्रातील मग ती भाषा असो अथवा तंत्रज्ञान, अथवा उच्च शिक्षण सर्वच क्षेत्रातील पाश्चिमात्यांचा प्रभाव त्यांनी झुगारून लावला आणि आज ते देश नवनवीन आव्हाने स्वीकारत विकासाच्या वाटेवर अग्रेसर आहेत. प्रखर राष्ट्रवाद आणि स्वाभिमान आणि ज्वलंत देशभक्ती या गुणांच्या बळावर चिमुकले इस्रायल-हमाससह सर्वच क्रूर जिहादी दहशतवादी आणि आक्रमक इस्लामी देशांशी जबरदस्त झुंज देत आहे. एक इंच भूमीदेखील शत्रूच्या घशात जाऊ देणार नाही, असा इस्रायलचा ठाम निर्धार आहे. आज आम्हा हिंदूंना इस्रायलकडून प्रेरणा घेण्याची नितांत आवश्यकता आहे. भारताचे नंदनवन समजल्या जाणार्‍या काश्मिरात आणि ईशान्य भारतात तसेच देवभूमी केरळमध्ये असंख्य जिहादी विषारी नाग घुसले आहेत. त्यांचा तातडीने बंदोबस्त होणे अत्यंत अत्यावश्यक आहे. संपूर्ण देशातील नागरिक या दृष्टीने सावध व सजग राहिले पाहिजेत. आमच्या देशात लव्ह जिहाद बरोबरच लॅण्ड जिहाद आणि व्होट जिहादची नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. त्या विरुद्ध हिंदू समाजाने एकत्रित येऊन कृतिशील होण्याची आज नितांत आवश्यकता आहे. जर पुन्हा भारताला सामर्थ्यशाली करायचे असेल तर हिंदूंनी एकत्र येऊन, सर्व इच्छाशक्ती एकवटून राष्ट्र उभारणीच्या कार्यात संपूर्ण योगदान दिले पाहिजे. सरसंघचालकांच्या विजयादशमीच्या संदेशाचा हाच अन्वयार्थ आहे. 
Powered By Sangraha 9.0