मांडगावात सोयाबीनला एकरी 20 किलोचा उतारा!

17 Oct 2024 20:08:58
तभा वृत्तसेवा
सिंदी (रेल्वे), 
Mandgaon-Soybean : मांडगाव परिसरात सोयाबीन पिकाचा हंगाम सुरू झालेला असुन नगदी पीक असलेले सोयाबीनने शेतकर्‍यांची चांगलीच निराशा केली. शेतकरी संजय झापरु काटवले यांना चक्क 3 एकरात 60 किलो सोयाबीन झाले असून एकरी 20 किलो सोयाबीन पिकाचा उतारा मिळाला आहे. खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी काटवले चांगलेच अडचणीत आले आहे.
 
 
SOYABEAN
 
 
शेतकरी संजय काटवले यांनी 3 एकर जमीन 60 हजार रुपयात मक्त्याने घेतली आहे. या 3 एकरात त्यांनी 1 क्विंटल सोयाबीनची पेरणी केली. यासाठी त्यांना 10 हजार 500 रुपये बियाणे खरेदीसाठी मोजावे लागले. यावर्षी काहीतरी काही पीक होईल या आशेने त्यांनी फवारणी, डवरणी, निंदन असा अतोनात खर्च केला. चार महिन्यानंतर शेतातील सोयाबीनची कापणी, सवंगणी करून काढण्यास सुरूवात करण्यात आली. सोयाबीन पिकाची उतारी चांगली होईल या आशेने शेतकर्‍याचा चेहरा फुलला होता. पण सोयाबीन काढण्याची सुरूवात करण्यात आली त्यावेळी शेवटी त्यांच्या पदरात निराशाच आली. सोयाबीन काढले असता त्यांना चक्क 3 एकरात 1 कट्टा म्हणजे एकरी सोयाबीन पिकाचे उत्पादन 20 किलो घरी आले.
 
 
यासोबतच परिसरातीलच महादेव घुसे या शेतकर्‍याला साडेसहा एकरात 6 पोते सोयाबीनचे उत्पन्न झाले. सरासरी एकरी दीड क्विंटल उत्पन्न त्यांच्या हाती आले. मागीलवर्षी काही शेतकर्‍यांनी सोयाबीन हे बाजारामध्ये विकायला घेऊन गेले असता सोयाबीन 28 ते 36 रुपये प्रति किलो याप्रमाणे विकावे लागले होते. एकीकडे भाव मिळत नाही तर दुसरीकडे उतारा नाही, त्यामुळे शेतकर्‍यांनी काय करावे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
Powered By Sangraha 9.0