दैवी देणगीचा वापर कसा करावा?

    दिनांक :19-Oct-2024
Total Views |
यंगिस्तान
जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Sharad Pawar : ‘द कार्स' नावाच्या कार्टुन चित्रपटांची अतिशय सुंदर सीरिज आहे. त्यातील तिसऱ्या भागाची कथा अशी की, लाईटनिंग मॅकविन नावाची कार ही हीरो असते. ही कार अनेक वर्षे रेसिंग स्पर्धा जिंकले. पण अचानक स्टॉर्म नावाची अत्यंत आधुनिक कार स्पर्धेत सहभागी होते आणि मॅकविन कारचा पराभव होतो. मग मॅकविन ट्रेनिंग घेण्यासाठी स्टर्लिंगकडे येतो; जिथे क्रूझ ही नुकतीच वयात आलेली कार त्याला प्रशिक्षण देते. क्रूझला रेसर व्हायचं असतं, पण ते तिला जमत नाही म्हणून ती ट्रेनर होते. मॅकविनला मात्र आधुनिक तंत्र शिकताना खूप अडचणी येतात, तरीदेखील त्यावर मात करत प्रशिक्षण पूर्ण करतो. मॅकविन चॅम्पियन असलेल्या स्टॉर्मला हरवून जिंकते. मॅकविनला कळतं की, आयुष्यभर अपमान सहन करत बसण्यापेक्षा किंवा नव्या पिढीसोबत लढत बसण्यापेक्षा आता निवृत्त होऊन नव्या पिढीला आशीर्वाद दिले पाहिजे आणि त्यांचे मार्गदर्शन केले पाहिजे.

Sharad Pawar
 
नुकतेच Sharad Pawarशरद पवार यांनी एक विधान केले आहे. पवार म्हणाले, ८४ असो किंवा ९० असो; हे म्हातारं काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य मार्गावर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. पहिली गोष्ट देवाने कोणाला किती आयुष्य द्यावे, यात आपण ढवळाढवळ करू शकत नाही. कुणी अल्पायुषी ठरतं तर कुणी दीर्घायुषी जगतं. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे शरद पवारांचा देवावर विश्वास नसला, तरी मी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. शरद पवारांनी शंभरी पार करावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे. पण हे झालं वैयक्तिक आयुष्य. ही परमेश्वराची देणगी आहे. पण आपण दीर्घायुषी जीवन जगताना काय केलं, हे आपलं कर्तृत्व आहे. दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांना दीर्घायुष्य लाभलं नाही, पण त्या अल्पायुषी जीवनातच महाराजांनी मानव जातीला हजारो वर्षे उपयोगी पडेल असं कार्य करून ठेवलं आहे. औरंगजेबाला दीर्घायुष्य लाभलं, पण त्याच्या आयुष्याची माती झाली. मराठी माणसाने त्याची कबर महाराष्ट्रात खोदली. त्याला महाराष्ट्र जिंकला आला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना दीर्घायुष्य लाभलं. मात्र राजकारणातून बाजूला होत त्यांनी प्रबोधनाची चळवळ सुरूच ठेवली. नेहरू हे दीर्घायुषी होते. पण ठिकठिकाणी नेहरूंची जयंती किंवा पुण्यतिथी उत्साहाने साजरी होताना दिसत नाही. शासकीय नियम आहे म्हणून करावी लागते. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती व पुण्यतिथी सर्वसामान्य माणूस उत्साहाने साजरी करतो. दीर्घायुष्यापेक्षा जे जीवन आपण कसे जगलो आहोत, त्यात आपण काम काय केलं, हे जास्त महत्त्वाचं.
 
देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग विशीतच फासावर चढला. ज्ञानेश्वर माउलींनी आपलं कर्तव्य पूर्ण झाल्यावर विशीतच संजीवनी समाधी घेतली. बरं, या संजीवनी समाधीवर शरद पवारांच्या वैचारिक तालमीत तयार झालेले लोक टीका करतात आणि कोणताही पुरावा नसताना ब्राह्मणांनीच त्यांची हत्या केली, तुकोबांची हत्या ब्राह्मणांनी केली, असा प्रचार करून जातिभेद निर्माण करतात. शिवाजी महाराजांच्या सैन्यात ५७ टक्के मुस्लिम होते, असा जावईशोध लावतात. प्रभू राम आणि स्वामी समर्थांवर उघडपणे टीका करणाऱ्याला पवार मूक आशीर्वाद देतात. ब्राह्मणांनी स्त्री शिक्षणाला विरोध केला व फुलेंना तीव्र विरोध केला, असा प्रचार केला जातो. पण ज्या भिडे नावाच्या ब्राह्मणाने फुलेंना स्त्री शिक्षणासाठी वाडा दिला, त्याचं चरित्र का सांगितलं जात नाही? मग जेव्हा आम्ही तरुण मंडळी शरद पवारांविषयी लिहायला बसतो, तेव्हा आम्हाला सुचत नाही की, नेमकं चांगलं काय लिहावं? आमचं ज्ञान कमी पडत असेल तर आम्ही मार्गदर्शन घ्यायला तयार आहोत. आम्हाला त्यात कोणताही कमीपणा वाटत नाही.
 
 
Sharad Pawar : शरद पवार इतकी वर्षे राजकारणात आहेत. चार वेळा मुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस सोडले तर इतर मुख्यमंत्री त्यांच्या मर्जीतले होते. आजही पवार राजकारणात आहेत, सत्ता नसली तरी राजकारणावर त्यांचा प्रभाव आहे. ते भाकरी फिरवू शकतात. हे खरं असलं तरी या सर्व गोष्टींचा जनतेला काय फायदा? शरद पवारांचं राजकारणात प्रस्थ आहे, यापलीकडे पवारांविषयी कुणीच काही बोलत नाही. त्यांचे मर्जीतले लोकही बोलत नाहीत. इतक्या वर्षांत पवारांनी असं कोणतं धोरण राबवलं, ज्यामुळे महाराष्ट्राचा कायापालट झाला? आज पवार विद्यमान सरकारवर टीका करत आहेत, पण प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत व अधिक काळासाठी सत्तेवर असताना असा कोणता चमत्कार पवारांनी करून दाखवला आहे, ज्याचा परिणाम किमान शंभर वर्षे टिकून राहणार आहे? नरेंद्र मोदींनी ३७० कलम हटवल्यानंतर अब्दुल्ला यांना भारतीय संविधानाला समोर ठेवून शपथ घ्यावी लागली, हे मोदींचं कर्तृत्व आहे. हा दीर्घकाळ टिकणारा परिणाम आहे, हे देश एकसंध ठेवणारं कर्तृत्व आहे.
 
 
ज्याप्रमाणे मोदी ‘मन की बात' हा कार्यक्रम राबवतात, त्याप्रमाणे शरद पवारांचे असे कोणते विचार आहेत, ज्यामुळे जाती-जातीतील भांडणे मिटतील, ज्यामुळे तरुण पिढी घडेल, तरुण पिढीला मार्गदर्शन होईल, महाराष्ट्राचं आनंदवनभुवन होईल? शरद पवारांचे असे कोणतेही विचार, मार्गदर्शक तत्त्वे लेख लिहिताना आपल्याला आठवत नाहीत, हे दुर्दैव आहे.
 
 
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख कार्यकत्र्यांच्या मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, पवारांनी आजवर केवळ राजकारण केले. राज्याला विकासापासून कायम दूर ठेवत स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी राज्यात जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे ठोस काम केले. अनेक वर्षे केंद्र आणि राज्यात सत्ता असताना, चार वेळा मुख्यमंत्री असतानाही पवारांच्या कार्यकाळात राज्य मागे पडले. अन्य छोटी छोटी राज्ये महाराष्ट्राच्या पुढे गेली. याला सर्वस्वी पवार जबाबदार आहेत. उदयनराजे काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी पवारांचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे. या वक्तव्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. काही साहित्यिक, राजकीय नेते, कलाकार शरद पवारांना जाणता राजा वगैरे म्हणतात. पण पवारांची स्तुती करणे, पवारांच्या मर्जीत राहणे ही काय पात्रता आहे का? योग्यतेचे हे मापदंड आहेत का? पवार शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेतात. हे तिन्ही महापुरुषच होते. पण पवारांनी यांचं नाव घेत महाराष्ट्र जोडला का? सर्व जातींना एकत्र आणलं का? या तिन्ही महापुरुषांचे तत्त्व महाराष्ट्राच्या भूमीत रुजवले का? की केवळ राजकारणासाठी त्यांचं नाव घेतलं? याची स्पष्टता या पितामहांनी दिली पाहिजे.
 
 
Sharad Pawar : प्रिय वाचकहो, वयोवृद्ध असण्याचं महत्त्व काय हे मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी तानाजी रणांगणात पडले. तेव्हा वयोवृद्ध शेलार मामांनी नेतृत्व केलं आणि गडजिंकून दिला. आपण ‘गड आला पणसिंह गेला' असं म्हणतो. पण वयोवृद्ध शेलार मामा नसते, तर गडही गेला असता ना! एका म्हाताऱ्या माणसाने आपल्याला गडजिंकून दिला, हे इतिहासातलं केवढं तरी मोठं उदाहरण आहे. बरं, गड जिंकल्यानंतर शेलार मामांनी स्वतःचा दबदबा निर्माण केला नाही, स्वतःच्या मर्जीतली माणसे बसवली नाहीत, स्वतःला जाणता राजा म्हणवून घेतलं नाही. याला म्हणतात निष्काम कर्मयोग! दीर्घायुष्य म्हणजे मिळकत नव्हे. ही देवाची देणगी आहे. या देणगीचा वापर आपण कसा करतो, हे आपल्यावर अवलंबून असतं. दीर्घायुष्य शाप ठरावं की वरदान, हे आपल्याच हातात आहे. कै. वामनराव पै म्हणून गेले आहेत ना, तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!