आज वर्धा जिल्ह्यात 1040 ठिकाणी दुर्गा तर 164 शारदा मातांची स्थापना

    दिनांक :02-Oct-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Navratri 2024 : वर्धेतील नवरात्रोत्सव संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. नऊ दिवसीय उत्सवात धार्मिक, सामाजिक कार्यक्रमासह अन्नदान मोठ्या प्रमाणात करण्यात येते. गुरुवार 3 रोजी नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असल्याने शहर दुर्गादेवीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 19 पोलिस ठाण्यांतर्गत 1 हजार 40 ठिकाणांवर दुर्गा तर 164 ठिकाणांवर सार्वजनिक शारदा उत्सव मंडळाच्या वतीने शारदा मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.
 
 

DEVI 
 
 
शहरातील मूर्तिकरांकडे दुर्गा मातेच्या मूर्ती तयार झाल्या असून रंगरंगोटीचे कामही पूर्ण झाले आहे. शहरातील विविध मंडळांच्या वतीने रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, याव्यतिरिक्त सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
 
 
पोलिस प्रशासनाच्या वतीने सर्वत्र बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक व चार उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणेदार, सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात 1100 महिला व पुरुष पोलिस कर्मचारी कार्यरत राहणार आहे. याशिवाय गृहरक्षकदलाचे 500 महिला, पुरुष जवानांचा बंदोबस्त राहणार आहे.
 
 
पोलिस स्टेशन निहाय दुर्गा मातेची स्थापना
 
 
वर्धा शहर पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात 54, रामनगर 40, सावंगी 34, सेवाग्राम 32, सेलू 23, सिंदी (रेल्वे) 19, दहेगाव 23, आर्वी 75, तळेगाव 56, आष्टी 53, कारंजा 43, हिंगणघाट 110, समुद्रपूर 56, वडनेर 100, गिरड 54, पुलगाव 102, देवळी 55, खरांगणा 40 व अल्लीपूर पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात 70 ठिकाणांवर दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना होणार आहे.