लक्षवेधी अर्थ घडामाेडींचे वास्तव

    दिनांक :20-Oct-2024
Total Views |
अर्थचक्र
- महेश देशपांडे
economic cycle : सरता आठवडा लक्षवेधी बातम्यांमुळे चर्चेत राहिला. काहीशा विशेष आणि वेगळ्या वाटणाऱ्या या बातम्या अर्थजगतातले वास्तव दाखवणाऱ्या ठरल्या. त्यापैकी पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे ‘एक्स’ हा साेशल मीडिया प्लॅटाॅर्म प्रचंड ताेट्यात असल्याचे समाेर आले. दरम्यान, म्युच्युअलफंडात छाेट्या शहरातून गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे समाेर आले. त्याच वेळी महागड्या घरांची विक्री वाढत असून स्वस्त घरांची विक्री कमी हाेत असल्याचे स्पष्ट झाले. ट्विटर म्हणून ओळखले जाणारे ‘एक्स’ आता अडचणीत आले आहे. टेस्ला आणि स्पेसएक्ससारख्या बड्या कंपन्यांचे मालक अ‍ॅलन मस्क यांनी ते विकत घेण्यासाठी गुंतविलेले पैसे बुडत आहेत. ‘एक्स’चे मूल्य आता 75 टक्क्यांहून अधिक खाली गेले आहे. यामुळे अ‍ॅलन मस्कच नव्हे, तर त्याचे गुंतवणूकदारही चिंतेत आहेत. ही घसरण कायम राहिल्यास त्यांना लवकरच कठाेर निर्णय घेणे भाग पडू शकते. 'फिडेलिटी ब्लू चिप ग्राेथ फंडच्या अहवालानुसार, मस्क यांनी सुमारे 44 अब्ज डाॅलर्समध्ये ट्विटर विकत घेतले हाेते. फिडेलिटीने त्यात सुमारे 19.6 दशलक्ष डाॅलर्सची गुंतवणूक केली हाेती; परंतु, जुलै 2024 पर्यंत फिडेलिटी शेअर्सचे मूल्य 5.5 दशलक्ष डाॅलर इतके कमी केले जाईल. अहवालानुसार, ‘एक्स’चे बाजारमूल्य फक्त 9.4 अब्ज डाॅलर्स आहे. अशा प्रकारे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अ‍ॅलन मस्क यांना सुमारे 34 अब्ज डाॅलर्सचे माेठे नुकसान झाले आहे. मस्क यांच्यासाठी हा माेठा आर्थिक धक्का आहे. महसूल निम्म्यावर आला आहे. जाहिरातीमुळे मिळणारे उत्पन्नही माेठ्या प्रमाणात घटत आहे.
 
 
arthachakra
 
 
‘एक्स’ सार्वजनिकपणे व्यापार करणारी कंपनी नाही. अशा परिस्थितीत त्याचे बाजारमूल्य शाेधणे फार कठीण आहे; पण त्याचे गुंतवणूकदार बाजारमूल्याची माहिती देत राहतात. 'फिडेलिटी’ने ‘एक्स’चे मूल्य सतत कमी केले आहे. यावेळी तिने त्याचे बाजारमूल्य 78.7 टक्क्यांनी कमी केले आहे. यापूर्वी जानेवारी आणि मार्चमध्येही त्यांनी मस्क यांच्या या कंपनीचे मूल्य कमी केले हाेते. ‘एक्स’च्या एकूण उत्पन्नात जाहिरातीमधून मिळालेल्या उत्पन्नाचा वाटा सुमारे 75 टक्के आहे; पण त्यात सातत्याने घट हाेत आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनीने आपले सॅन फ्रान्सिस्काेमधील कार्यालय आधीच बंद केले आहे. याशिवाय अनेक कर्मचारीही कमी केले आहेत. ‘एक्स’च्या भवितव्याबद्दल कर्मचारीही साशंक आहेत. 'फिडेलिटी’व्यतिरिक्त बिल एकमन आणि डिडी काॅम्ब हेदेखील त्याचे गुंतवणूकदार आहेत. डिडीवर मानवी तस्करीसारखे गंभीर आराेप आहेत. अशा स्थितीत ‘एक्स’च्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते बंद हाेण्याची भीतीही लाेक व्यक्त करत आहेत.
 
 
economic cycle : दुसरी लक्षवेधी बातमी म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या छाेट्या शहरांमधून नवीन गुंतवणूकदारांच्या संख्येत जाेरदार वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात, एप्रिल-ऑगस्ट 2024 दरम्यान, म्युच्युअलफंड उद्याेगाने 2.3 काेटी नवीन गुंतवणूकदार (फोलिओ क्रमांक) जाेडले आहेत. त्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक गुंतवणूकदार हे छाेट्या शहरांतील आहेत. ‘झेराेधा फंड हाऊस’ने म्युच्युअलफंडात गुंतवणुकीसाठी लहान शहरांमधील गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान म्युच्युअल फंड उद्याेगाने 2.3 काेटी नवीन गुंतवणूकदार जाेडले आहेत. त्यापैकी 1.23 काेटी किंवा 53 टक्के गुंतवणूकदार देशातील टाॅप 30 शहरांव्यतिरिक्त इतर शहरांमधून आले आहेत. म्हणजेच पहिल्या 30 शहरांमधून कमी नवीन गुंतवणूकदार जाेडले गेले आहेत. लहान शहरांमध्ये मे ते ऑगस्ट 2024 या कालावधीत एकूण फोलिओच्या संख्येत एक काेटींनी वाढ झाली आहे. अहवालानुसार, म्युच्युअलफंडात गुंतवणूक करणाऱ्या छाेट्या शहरांमधून नवीन गुंतवणूकदारांची संख्या वाढली असली, तरी म्युच्युअल फंड उद्याेगाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तांमधून छाेट्या शहरांचा वाटा केवळ 19 टक्के आहे. याचा अर्थ लहान शहरांमधून जास्त लाेक गुंतवणूक करत असले, तरी गुंतवणुकीचा सरासरी आकार माेठ्या शहरांपेक्षा कमी आहे.
 
 
छाेट्या शहरांमधून किरकाेळ विभागातील गुंतवणुकीचा सरासरी दर 1.13 लाख रुपये आहे तर टाॅप 30 आणि इतर शहरांसह रिटेल विभागातील गुंतवणुकीचा सरासरी आकार 2.04 लाख रुपये आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत म्युच्युअलफंड उद्याेगातील एकूण ‘एसआयपी’ खात्यातील 54 टक्के याेगदान छाेट्या शहरांमधून आले आहे. छाेट्या शहरांमध्ये अधिक एसआयपी खाती उघडणे हे चांगले लक्षण मानले जात आहे. एप्रिल ते ऑगस्टपर्यंत इंडेक्स फंडांमध्ये 18.7 टक्के ‘एसआयपी’ खाती उघडण्यात आली. छाेट्या शहरांमध्ये उघडलेली 79 टक्के ‘एसआयपी’ खाती वाढ किंवा इक्विटी याेजनांमध्ये आहेत. ‘झेराेधा फंड हाऊस’च्या अहवालानुसार, स्मार्टाेन अ‍ॅप्स, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅटाॅर्म, डिजिटल पेमेंट सिस्टिम आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्रीद्वारे केलेल्या प्रयत्नांमुळे लहान शहरांमधून येणाऱ्या 50 टक्के नवीन गुंतवणूकदारांनी थेट याेजनांद्वारे गुंतवणूक केली आहे. एका आकडेवारीनुसार, एप्रिल 2024 मध्ये लहान शहरांमधून येणाऱ्या गुंतवणूकदारांची एकूण संख्या 8.29 काेटी हाेती. ती ऑगस्ट 2024 मध्ये 9.52 काेटी झाली आहे, म्हणजेच 1.23 काेटी नवीन गुंतवणूकदार सामील झाले आहेत. थेट याेजनेद्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या एप्रिल 2024 मध्ये 2.96 काेटी हाेती. ती ऑगस्टमध्ये वाढून 3.6 काेटी झाली. म्हणजेच 64 लाख नवीन गुंतवणूकदारांनी थेट याेजनेद्वारे गुंतवणूक केली आहे.
 
 
economic cycle : आणखी एक दखलपात्र वृत्त म्हणजे लक्झरी आणि महागड्या घरांची विक्री आणि मागणी वाढल्यामुळे 2024 च्या तिसऱ्या  तिमाहीमध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत विक्रमी 87,108 घरे विकली गेली, जी पाच टक्के अधिक आहे. चालू वर्षातील काेणत्याही तिमाहीतील हा सर्वाधिक विक्रीचा आकडा आहे. 2024 च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये एकूण 2 लाख 60 हजार 349 घरांची विक्री झाली आहे. बंगळुरूमध्ये घरांच्या किमती सर्वाधिक वाढल्या आहेत. तिथे 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हैदराबाद आणि मुंबईमध्ये किमती सहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. ‘नाईट फ्रॅंक इंडिया’ने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी कार्यालय आणि निवासी बाजाराबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार एक काेटींहून अधिक किमतीच्या घरांना सर्वाधिक मागणी आहे. एक काेटी किंवा त्याहून अधिक किमतीची घरे निवासी युनिट्सच्या एकूण विक्रीच्या 46 टक्के आहेत. तिसऱ्या तिमाहीमध्ये या श्रेणीतील एकूण 40,328 युनिट्सची विक्री झाली. 50 लाख ते एक काेटी रुपये किमतीच्या घरांच्या विक्रीचा वाटा एकूण विक्रीच्या 30 टक्के आहे. या कालावधीमध्ये 26,011 युनिट्सची विक्री झाली तर 50 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीचा वाटा 24 टक्के आहे. 2024 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 50 लाखांपेक्षा कमी किमतीच्या 20,769 गृहनिर्माण युनिटची विक्री झाली आहे. ‘नाइट फ्रॅंक इंडिया’ने सांगितले की, परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट हाेत आहे. अहवालानुसार, 50 लाख किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री 2023 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 23,026 युनिट्सच्या तुलनेत 14 टक्क्यांनी घसरून 20,769 युनिट्सवर आली आहे. घरांच्या किमतीत झालेली वाढ, गृहकर्जाचे महागडे व्याजदर, मागणीत झालेली घट आणि काेराेना महामारीचा या विभागावर झालेला विपरीत परिणाम ही त्यामागील मुख्य कारणे आहेत. त्यामुळे विक्रीत घट झाली आहे.
 
 
economic cycle : मुंबई आणि काेलकाता ही एकमेव निवासी बाजारपेठ आहे, जिथे या विभागातील विक्रीत वाढ झाली आहे. ‘नाईट फ्रॅंक इंडिया’च्या मते, घरांच्या किमती वाढल्यामुळे या किमतीमध्ये घरे घेऊ इच्छिणाऱ्या घर खरेदीदारांना बाजारापासून दूर ठेवले जात असून या विभागात पुरवठ्याअभावी विक्रीचे प्रमाणही कमी आहे. यामुळे महागड्या घरांची मागणी वाढत राहील. ‘नाईट फ्रॅंक इंडिया’चे अध्यक्ष शिशिर बैजल म्हणाले की, निवासी क्षेत्राच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे रिअल इस्टेट मार्केटसाठी हा उत्तम काळ ठरला आहे. एक काेटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांच्या सेगमेंटमुळे विक्रीत जाेरदार वाढ झाली आहे. ते म्हणाले की, दिल्ली एनसीआर ही एकमेव बाजारपेठ घसरत आहे; मात्र गेल्या 13 तिमाहींमध्ये एक काेटींहून अधिक किमतीच्या घरांच्या विक्रीत सातत्याने वाढ हाेत आहे. बैजल यांच्या मते, स्थिर आर्थिक दृष्टिकाेन आणि व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळे मागणी मजबूत राहण्याची शक्यता आहे.
(लेखक आर्थिक घडामाेडींचे अभ्यासक आहेत.)