गंदरबाल हल्ल्याचा बदला घेणार : नायब राज्यपाल

21 Oct 2024 19:02:42
- शांतता खंडित करण्यासाठीच निष्पापांच्या हत्या
 
श्रीनगर, 
Ganderbal attack : जम्मू-काश्मिरात अलिकडेच शांततेत पार पडलेली विधानसभेची निवडणूक पाकिस्तानच्या पचनी पडली नाही. हा देश शांततेचा सर्वांत मोठा शत्रू आहे. येथील शांततेचे वातावरण विस्कळीत करण्यासाठी पाकिस्तानच्या आदेशावरून निष्पाप नागरिकांना ठार करण्यात येत आहे. या निष्पापांच्या हत्येचा बदला घेणारच, असा इशारा नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिला.
 
 
Manoj Sinha
 
पोलिस हुतात्मा दिन कार्यक्रमात सिन्हा बोलत होते. गंदरबाल येथील दहशतवादी हल्ल्याचा सखोल तपास करा आणि निष्पाप नागरिकांच्या हत्येत सामील असलेल्या अतिरेक्यांना शोधून काढा आणि त्यांना ठार मारा, अशी सूचना सिन्हा यांनी दिली. रविवारी गंदरबाल जिल्ह्यात बोगद्याच्या बांधकामात सहभागी असलेल्या कामगारांवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. यात सात जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला अतिशय भ्याड असून, तो आम्ही कधीच विसरू शकणार नाही, असे ते म्हणाले.
 
 
Ganderbal attack : जम्मू-काश्मिरात शांततेचे वातावरण आहे. येथील लोकांनी हिंसाचार नाकारला आहे आणि हीच पाकिस्तानची खरी समस्या आहे. शांततेचे वातावरण बिघडविण्यासाठी पाकिस्तान आता निष्पाप लोकांना ठार मारत आहे, असा आरोप सिन्हा यांनी केला. आपल्याला दहशतवादविरोधी मोहीम आणखी तीव्र करावी लागणार आहे. सोबतच, मादक पदार्थांच्या तस्करीवरही आपल्याला आळा घालायचा आहे, अशी सूचना सिन्हा यांनी पोलिसांना केली.
Powered By Sangraha 9.0