डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे मराठी साहित्यातील योगदान अद्वितीय

    दिनांक :21-Oct-2024
Total Views |
-प्रा. महेश एलकुंचवार यांचे प्रतिपादन
 
नागपूर, 
डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे मराठी साहित्याच्या क्षेत्रातील योगदान अद्वितीय आहे, असे गौरवोद्गार नाटककार Mahesh Elkunchwar प्रा. महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केले. त्यांना विदर्भ संशोधन मंडळाचा डॉ. वसंतकृष्ण वऱ्हाडपांडे स्मृती पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र व रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. मदन कुलकर्णी, सचिव डॉ. राजेंद्र वाटाणे, डॉ. हेमंत साने प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
vsm
 
Mahesh Elkunchwar : प्रा. महेश एलकुंचवार म्हणाले की, विदर्भ संशोधन मंडळाशी प्रत्यक्ष संबंध आला नसला तरी विदर्भ संशोधन मंडळाच्या परंपरेची व त्यांच्या अफाट संशोधन कार्याची जाणीव आहे. मंडळाची परंपरा आजही कार्यकारिणीतील पदाधिकारी व सभासद मंडळी निष्ठेने पुढे नेत आहे, याचा अभिमान वाटतो. त्यामुळे पुरस्काराची रोख आपण मंडळाच्या विकासासाठी परत देतो आहे.
 
 
डॉ. वसंतरावांचे मराठी साहित्याच्या क्षेत्रातील योगदान अद्वितीय आहे. अत्यंत संवेदनशील मनाच्या वसंतरावांनी जितक्या ताकदीने कथा, कादंबरी, कविता, ललित निबंध लेखन केले तितक्याच तटस्थतेने समीक्षा लेखन केले. मराठी वाड्.मयाच्या इतिहासाचा पुरवणी खंडदेखील त्यांनी लिहिला. परंतु त्यांच्या अकाली जाण्याने आपणाला जो आघात झाला त्यापेक्षा त्यांच्या जाण्याने झालेली मराठी साहित्याची अपरिमित हानी कधीच भरून निघणार नाही. त्यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार विदर्भ संशोधन मंडळाने देऊन उपकृत केले याचे निश्चितच समाधान आहे.
 
 
डॉ. विनायक देशपांडे म्हणाले की, प्रा. महेश एलकुंचवार हे नागपूरचे भूषण आहेत. त्यांनी पुढेही समाजवास्तव प्रकट करणारी नाटके लिहून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करावे, अशी भावना व्यक्तकेली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मदन कुलकर्णी यांनी संक्षिप्त विवेचन केले. संचालन व प्रास्ताविक डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी केले.