महाराष्ट्राला हवे महापरिवर्तन : खडगे

    दिनांक :21-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
महायुती सरकारवर महाराष्ट्रातील शेतकरी नाराज आहेत. या सरकारकडून त्यांना न्याय मिळण्याची शक्यता अतिशय कमी असून, शेतकरी आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेला आता महापरिवर्तन हवे आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष Mallikarjun Kharge मल्लिकार्जुन खडगे यांनी सोमवारी सांगितले. ‘एक्स' या समाजमाध्यमावर हिंदीत पोस्ट करीत खडगे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्यावरून भाजपावर टीका केली. राज्याला दुष्काळमुक्त करण्याचे भाजपाचे दिलेले वचन हे केवळ एक जुमला होते, असा आरोप खडगे यांनी केला.
 
 
Mallikarjun Kharge
 
भाजपा शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा शत्रू आहे. महायुती सरकारच्या काळात राज्यात २० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कृषी क्षेत्राच्या निधीतही मोठी कपात करण्यात आली आहे. भाजपाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दिलेले वचनही फसवे निघाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे वचनही या पक्षाने पाळले नाही, असे खडगे यांनी ‘एक्स'वर म्हटले आहे. कांदा आणि सोयाबीन उत्पादकांवर निर्यात शुल्क लादून आणि आयातबंदीच्या माध्यमातून भाजपाने त्यांचा त्रास आणखी वाढविला आहे. महायुतीचे सरकार सत्तेबाहेर केल्याशिवाय आपल्या समस्या दूर होणार नाही, याची खात्री शेतकऱ्यांना झाली असून, यासाठी ते राज्यात महापरिवर्तन आणण्याच्या तयारीत आहेत, असा दावाही Mallikarjun Kharge खडगे यांनी केला.