मतदारांना पैशांचे प्रलोभन दिल्याचा आमदारावर गुन्हा

21 Oct 2024 17:36:36
छत्रपती संभाजीनगर, 
मतदारांना पैशांचे प्रलोभन दिल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे आमदार Santosh Bangar संतोष बांगर यांच्याविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. बाहेरगावी असलेले मतदार आपल्या मतदारसंघात मतदान करण्यासाठी आल्यास त्यांना ऑनलाईन पैसे दिले जातील, असे आवाहन करणारा आ. बांगर यांचा व्हिडीओ सामायिक झाला. या व्हिडीओवरून हिंगोली जिल्ह्यात आ. बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने सोमवारी दिली.
 
 
Santosh Bangar
 
सत्ताधारी शिवसेनेचे बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जे मतदार बाहेरगावी आहेत, त्यांनी आपल्या मतदारसंघात मतदान करण्यासाठी आल्यास त्यांना फोन पे- ऑनलाईन पेमेंट केले जाईल. अशा मतदारांची यादी २-३ दिवसांत आम्हाला सादर करावी. त्यांना भाड्याने गाडी हवी असल्यास तसेच त्यांना जे काही हवे असल्यास त्यांना उपलब्ध करून दिले जाईल, असे Santosh Bangar आ. बांगर या व्हिडीओमध्ये म्हणत असल्याचे ऐकू येत आहे. हा व्हिडीओ काही प्रादेशिक वृत्तवाहिन्यांनी शेअर केला आहे. गत आठवड्यात हा व्हिडीओ समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने बांगर यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते व ते त्यांनी सादर केले.
Powered By Sangraha 9.0