मुख्यमंत्री होण्याची सीता सोरेन यांची राहिली इच्छा अपूर्ण

    दिनांक :21-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
पती दुर्गा सोरेन यांच्या निधनानंतर Sita Soren सीता सोरेन राजकारणात सक्रिय झाल्या. जामा विधानसभा मतदारसंघातून त्या तीन वेळा आमदार झाल्या. राज्यसभा निवडणुकीत पैसे घेऊन मतदान केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. या प्रकरणात त्या सात महिने तुरुंगात होत्या. नंतर जामिनावर त्यांची सुटका झाली.
 
 
Sita Soren
 
हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात समावेश व्हावा, अशी Sita Soren सीता सोरेन यांची इच्छा होती; मात्र ती कधीच पूर्ण झाली नाही. त्यामुळे आपल्याला डावलले जाते, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. सासरच्या लोकांनी आपली उपेक्षा केल्याचा आरोप सीता सोरेन सातत्याने करीत असतात. हेमंत सोरेन यांना तुरुंगात जावे लागल्यावर झारखंडचा नवा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू झाली असताना सीता सोरेन यांचे नावही पुढे आले. आपणच शिबू सोरेन यांचे वारसदार असल्याचा त्यांचा दावा होता. पण, सीता सोरेन यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीला घरातून विरोध झाला. हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी Sita Soren सीता सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यास तीव्र विरोध केला. या काळात सीता सोरेन आणि कल्पना सोरेन यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध आणि आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सीता सोरेन यांचे नाव मागे पडले आणि चम्पई सोरेन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यांचे मुख्यमंत्रिपद सहा महिनेही टिकले नाही, हा भाग वेगळा.
 
 
झामुमोत एकाकी पडल्यानंतर Sita Soren सीता सोरेन यांनी झामुमोचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना दुमका लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. चारा घोटाळ्यात तुरुंगात जायची वेळ आल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री केले. तसाच प्रयत्न हेमंत सोरेन यांनीही केला. पण, तो सीता सोरेन आणि झामुमोतील अन्य आमदारांनी हाणून पाडला. त्यामुळे नाईलाज म्हणून चम्पई सोरेन यांचे नाव पुढे आले आणि ते पर्यायी मुख्यमंत्री ठरले.
 
 
चम्पई यांचे आडनाव सोरेन असले तरी, शिबू सोरेन परिवाराशी त्यांचा कोणताच नातेसंबध नाही. शिबू सोरेन यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची झामुमोत प्रतिमा होती. औटघटकेचे मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर हेमंत सोरेन यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी चम्पई सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे दुखावल्या गेलेले चम्पई सोरेन यांनीही नंतर भाजपात प्रवेश केला.