इस्रायलने उद्ध्वस्त केल्या इराणच्या लष्करी सुविधा

    दिनांक :26-Oct-2024
Total Views |
- हवाई हल्ल्यांची मालिका
- २५ दिवसांनी दिले प्रत्युत्तर
 
तेल अवीव, 
Israel attacks : या महिन्याच्या सुरुवातीला इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला इस्रायलने चोख प्रत्युत्तर दिले. अत्यंत सुनियोजित पद्धतीने इस्रायलने इराणवर हवाई हल्ले चढवत या देशाची लष्करी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केली. इराणची क्षेपणास्त्र केंद्रे तसेच जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांची ठिकाणे आमच्या लढाऊ विमानांनी अचूक हल्ला करीत उद्ध्वस्त केली, असे इस्रायलच्या लष्कराने सांगितले. इराणची राजधानी तेहरानमधून स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. मात्र, या हल्ल्यांमुळे मर्यादित स्वरूपाचे नुकसान झाले, असे इराणने सांगितले.
 
 
Israel attacks
 
इराणने इस्रायलवर दोन वेळा हल्ले केले. यात नागरिकांना धोका असलेल्या ठिकाणांचाही होता, असे इस्रायल सैन्य दलाचे प्रवक्ते रिअर अ‍ॅडमिरल डॅनियल हागारी यांनी जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे. याबाबत इस्रायलने जारी केलेल्या छायाचित्रात पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट आणि लष्करी सल्लागार तेल अवीवमधील किरया लष्करी तळावरील नियंत्रण कक्षात दिसत आहेत.
 
 
Israel attacks : इराणमध्ये सूर्योदय होईपर्यंत काही तास इस्रायलने हवाई हल्ले केले. हल्ल्यात सर्वप्रथम इराणची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली. इराणने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी आमच्यावर होती. इस्रायलच्या सैन्याने आपली उद्दि÷ष्टे पूर्ण केली आहेत. इराणने पुन्हा हल्ला करण्याची चूक केल्यास त्याला तसेच उत्तर द्यावे लागेल, असे हागारी यांनी सांगितले.