पर्यावरण जागरूक हाेण्याची खरी वेळ

27 Oct 2024 05:50:00
गाथा पर्यावरणाची
- मिलिंद बेंडाळे
Environment : सुप्रसिद्ध बाैद्ध विचारवंत थीच नट हान यांनी हवामान बदलाच्या गंभीर समस्येबाबत म्हटले हाेते की, आपण सध्या चालत असलेल्या मार्गावरच चालत राहिलाे, तर आपल्या अपेक्षेपेक्षा लवकर मानवजातीचा विनाश हाेईल. हवामान बदलाची परिस्थिती समजली असलेले आणि वस्तुस्थिती माहीत असलेले याच्याशी असहमत हाेऊ शकत नाहीत. जगभर सत्तेत असलेले लाेक सध्याचा मार्ग बदलण्याविषयी सतत बाेलतात आणि अनेक उपायांवर चर्चा करतात; प्रत्यक्षात काेणताही बदल घडत नाही, तेव्हा आश्चर्य वाटते. याचे सर्वात जवळचे उदाहरण म्हणजे दिल्लीतील वायू प्रदूषणाची भीषण समस्या. दरवर्षी तीच आश्वासने, न्यायालयाचे तेच तेच नाराज निर्णय हे दिल्लीचे नशीब बनले आहे. तसे, ही समस्या  फक्त दिल्लीची नाही, ती देशभरात आहे, जगभरात आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी भारताची नवी पिढी पर्यावरण प्रदूषणाला सामाेरे जाण्यासाठी तयार हाेण्याची शक्यता निर्माण झाली हाेती; पण ती राजकारणाची बळी ठरली.
 
 
delhi-pollution
 
खरे तर, सर्वाेच्च न्यायालयाने डिसेंबर 2003 मध्ये ‘एनसीईआरटी’ला पर्यावरण शिक्षण हा वेगळा विषय म्हणून शिकवण्यासाठी पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश दिले हाेते. या संस्थेने मार्च 2004 मध्ये अभ्यासक्रम तयार करून न्यायालयासमाेर ठेवला. न्यायालयाने ताे सर्व राज्य सरकारांना पाठवला. सर्व राज्य सरकारांनी ताे स्वीकारला. राष्ट्रीय पातळीवर ही अत्यंत समाधानाची बाब हाेती. आपल्या शालेय शिक्षणाच्या रचनेत आवश्यक ते बदल करून पर्यावरण शिक्षण हा स्वतंत्र विषय बनवण्याबाबतही त्यांनी सांगितले. मे 2004 मध्ये केंद्रात नवीन सरकार आले. हा निर्णय मागील सरकारने केलेल्या प्रयत्नांचे \लित असल्याने अंमलबजावणी झाली नाही. धाेरण-निर्धारणाच्या पातळीवर दृष्टीचा अभाव असताे, तेव्हा असे अनेक निर्णय घेतले जातात, ज्यांचा आधार शैक्षणिक नसून राजकीय विचारधारांच्या सततच्या संघर्षात कुठे तरी दडलेला असताे. 20 वर्षांपूर्वी पर्यावरण शिक्षण हा अनिवार्य आणि स्वतंत्र विषय बनवला असता, तर आज एक तरुण पिढी देशाच्या प्रशासनात कार्यरत असती. तिच्या मनात पर्यावरण रक्षणाविषयीची आदरभावना निर्माण झाली असती. त्यांच्यापैकी काेणी तरी दिल्लीची समस्या हे एक आव्हान मानून साेडविण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न केले असते आणि ते यशस्वी झाले असते, अशी शक्यता आहे.
 
 
Environment : इंदूर आणि सुरतसारख्या शहरांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत मिळालेले यश आणि देशभरात ज्याचे काैतुक झाले, त्यामागे कुठेतरी एक उत्साही, अभ्यासू आणि दूरगामी व्यक्तिमत्त्व हाेते. जबाबदार व्यक्तीला प्रामाणिकपणे एखादी समस्या साेडवायची असेल, तर ती मार्ग शाेधून त्यावर ताेडगा काढू शकते, हे आता सर्वसामान्यांना समजले आहे. त्यासाठी पहिली गरज ही आहे की, त्यांनी कुटुंब आणि करीअरऐवजी लाेकसेवा हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवून पुढे जावे. लाेकशाही म्हणते की, जे लाेकप्रतिनिधी घटनात्मक पदांवर नियुक्त केले जातील ते लाेकसेवेमुळेच तेथे पाेहाेचतील आणि त्यानंतर सर्व काही या सेवेला समर्पित करतील. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बाेस, डाॅ. राजेंद्र प्रसाद, आचार्य कृपलानी यासारख्या ऋषिमुनींना स्वतंत्र भारतात नेतृत्व प्रदान करणाèया लाेकप्रतिनिधींकडून हीच अपेक्षा हाेती. दुर्दैवाने सध्याच्या राजकीय आणि पक्षीय वैचारिक बांधिलकींच्या अर्धवट समजुतीमुळे त्यांच्या आकांक्षा पूर्णपणे नाकारल्या गेल्या आहेत. सर्वसामान्यांचे जीवन प्रभावित करणाèया प्रत्येक क्षेत्रात निर्णय घेणाऱ्यांचा स्वार्थीपणा व्यक्तीसाठी वेदनादायक परिस्थिती निर्माण करताे. त्यामुळे जनहिताचे माेठे प्रकल्प आपले उद्दिष्ट साध्य करू शकत नाहीत. देशातील सुशिक्षित वर्ग आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी पुढे येईल आणि सरकारी यंत्रणा प्रामाणिक असेल, तेव्हाच सर्वसामान्यांच्या जीवनात अपेक्षित बदल घडतील हे स्पष्ट आहे.
 
 
मानवी क्रियाकलापांमुळे पृथ्वी अनेक प्रकारच्या वादळांना ताेंड देत आहे. अव्यवस्थित विकास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अंदाधुंद शाेषणामुळे पृथ्वीवरील संकट अधिक गडद हाेत आहे. यामुळेच राेज काेणत्या ना काेणत्या भागात नैसर्गिक आपत्ती येतच असतात. मध्यंतरी अवकाळी पावसाने दुबई शहर हादरले. 16 एप्रिल राेजी झालेल्या मुसळधार पावसाने तेथील जनजीवन विस्कळीत झाले हाेते. तेव्हा तिथे एकाच दिवसात 250 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. एवढा पाऊस दुबईत दाेन वर्षांमध्ये पडताे. निसर्गाच्या प्रहारामुळे दुबईचे सारे ग्लॅमर निस्तेज झाले. दुबईमध्ये पावसाने कहर केल्यानंतर तीन दिवसांनी पाकिस्तानला निसर्गाचा फटका बसला. मुसळधार पावसामुळे 80 हून अधिक लाेकांना जीव गमवावा लागला तर शेकडाे घरांचे नुकसान झाले. हिमाचल प्रदेशमध्येही एप्रिल महिन्यात र्ब\वृष्टी झाली. ती ही अशा वेळी झाली जेव्हा देशाच्या अनेक भागांमध्ये अवेळी उष्ण वारे वाहत हाेते. हैदराबादमध्येही अशाच प्रकारे जाेरदार अनपेक्षित पाऊस झाला. अशा घटना आता जगभर अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहेत. निसर्गाचे असे वागणे हा चिंतेचा विषय असतानाच असे का घडत आहे, याचा विचार करायला हवा. या सर्व घटनांच्या मुळाशी हवामान बदल असल्याची वस्तुस्थिती काेणापासून लपून राहिलेली नाही.
 
 
Environment : हवामान बदलाचे दुष्परिणाम वर्षभर नवनवीन स्वरूपात दिसून येत आहेत. निसर्गाच्या प्रतिकूल मानवी क्रियाकलापांमुळे पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे, हे सर्वज्ञात आहे. महासागर असाे, पर्वत असाे, नद्या असाे की शेतजमिनी; निसर्ग सर्वत्र हाहाकार माजवत असताे. अनेक देशांमध्ये डाेंगराळ भागातील जलाशय काेरडे पडत आहेत आणि वनक्षेत्र कमी हाेत आहे. या कारणास्तव वन्य प्राणी दरराेज तहान शमवण्यासाठी बाहेर पडतात, तेव्हा त्यांचा मानवाशी संघर्ष हाेताे. जंगलातील ओलावा कमी हाेत असल्याने आणि कमालीचे तापमान यामुळे जंगलांना आग लागण्याच्या घटनाही वाढत आहेत. पावसाळ्यात नद्या काेरड्या पडत असून माेठ्या नद्यांमधील पाण्याचे प्रमाण सातत्याने कमी हाेत आहे. लागवडीच्या जमिनीतील कार्बनचे प्रमाण सातत्याने कमी हाेत आहे. याचा परिणाम अन्न उत्पादनावरही हाेत आहे. एकाच देशाचे वेगवेगळे भाग दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्त आहेत. हवामान बदलाची समस्या वाढवणाऱ्या कारणांमध्ये वाढती लाेकसंख्या आणि त्याचा उपभाेगवाद यांचाही समावेश आहे. वाढत्या लाेकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि अधिकाधिक उपभाेग घेण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे निसर्गाच्या संसाधनांचा अतिशाेषण केला जात आहे. उपभाेक्तावादामुळे कार्बन डाय ऑक्साईड, क्लाेराे फ्लाेराे कार्बन आणि मिथेन यांसारखे हरितगृह वायू वातावरणात माेठ्या प्रमाणात पाेहाेचत आहेत. ग्राहकाेपयाेगी वस्तूंच्या निर्मितीपासून दैनंदिन गरजांपर्यंत पाण्याचा वापर सातत्याने वाढत असून त्या प्रमाणात त्याचे संवर्धन हाेत नाही.
 
 
Environment : आज अनेक देशांमध्ये कचऱ्याचे डाेंगर तयार हाेत आहेत. जगात दरवर्षी लाखाे टन प्लॅस्टिक कचरा निर्माण हाेताे, जाे 2050 पर्यंत अनेक पटींनी वाढण्याची अपेक्षा आहे. भारतातही माेठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक कचरा निर्माण हाेताे. ताे गेल्या पाच वर्षांमध्ये दुप्पट झाला आहे. यातील 90 टक्के कचरा, नद्या आणि नाल्यांमध्ये जाताे. प्लॅस्टिक कचèयामुळे पृथ्वीवरील जैवविविधतेवर गंभीर परिणाम हाेत आहे. या कचऱ्याचे छाेटे कण पाण्यात हळूहळू विरघळतात. त्याचा मानवी आराेग्यावर वाईट परिणाम हाेताे. प्लॅस्टिक कचरा ही पृथ्वीसाठी माेठी समस्या बनली आहे; परंतु त्याचा वापर कमी करण्यासाठी काेणतेही ठाेस पाऊल उचलले जात नाही. महासागर प्लॅस्टिकच्या कचऱ्याने भरलेले आहेत. ते इतर मार्गांनीही पृथ्वीच्या आराेग्यासाठी धाेकादायक ठरत आहे. पृथ्वीवरील संपूर्ण जैवविविधता धाेक्यात आली आहे. आता जागरूक हाेण्याची, सुधारण्याची आणि उपभाेगवादाला आळा घालण्याची वेळ आली आहे. आताही जर आपण सतर्क राहिलाे नाही, तर संकट इतके गंभीर हाेऊ शकते की, त्याला सामाेरे जाणे कठीण हाेऊ शकते. आधुनिक जीवनशैलीत बदल घडवून आणल्याशिवाय काहीही हाेणार नाही, हे सरकारांबराेबरच समाजानेही समजून घेतले पाहिजे. आपल्याला भाैतिक जीवनाचा त्याग करावा लागेल. अन्नपदार्थांची हाेणारी नासाडी थांबवून वीज आणि पाण्याचा आर्थिक वापर करायला शिकावे लागेल. ‘वापरा आणि फेका’ची संस्कृती साेडली पाहिजे. हवामान बदल थांबविण्याची जबाबदारी पर्यावरण संस्था आणि सरकार यांची आहे, असा विचार करणे याेग्य नाही.
(लेखक वन्यजीव आणि पर्यटनविषयक अभ्यासक आहेत.)
Powered By Sangraha 9.0