महाराष्ट्राच्या काही मुख्यमंत्र्यांनी भूषवली केंद्रात महत्त्वाची मंत्रिपदे

    दिनांक :30-Oct-2024
Total Views |
- उर्वरितांकडे आली दुय्यम दर्जाची जबाबदारी
 
श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, 
CM of Maharashtra : महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवलेल्यांपैकी अनेकजण नंतर दिल्लीत राष्ट्रीय राजकारणात आले आणि त्यांनी केंद्रातही अनेक महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली. पण, काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेकांकडे दुय्यम दर्जाची मंत्रिपदे आली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जवाहरलाल नेहरूंच्या बोलावण्यावरून संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत आले. त्यावेळी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, असे याचे वर्णन करण्यात आले होते. चव्हाणांप्रमाणे शरद पवार यांनीही देशाचे संरक्षणमंत्रिपद भूषवले. पवार दीर्घकाळ कृषिमंत्री होते.
 
 
CM of Maharashtra
 
दोनदा मुख्यमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण देशाचे गृहमंत्री होते. चव्हाण यांनी अर्थ आणि संरक्षण अशा दोन महत्त्वाच्या खात्याची जबाबदारीही सांभाळली. सुशीलकुमार काही काळ गृहमंत्री होते. विलासराव देशमुख, मनोहर जोशी, नारायण राणे यांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर केंद्रात मंत्रिपदे भूषवली. योगायोग म्हणा की आणखी काही, शंकरराव चव्हाण, शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यानंतर महाराष्ट्रातून केंद्रात आल्यानंतर बहुतांश जणांना दुय्यम दर्जाचे असे अवजड उद्योग खाते सांभाळावे लागले. या खात्याचे नाव अवजड उद्योग असले, हे खाते अन्य खात्यांच्या तुलनेत हलकेफुलके असे आहे.
 
 
CM of Maharashtra : मुख्यमंत्री राहिलेले मनोहर जोशी आणि विलासराव दशमुख अवजड उद्योग मंत्री होते. मुख्यमंत्री न झालेले शिवसेनेचे सुरेश प्रभू, बाळासाहेब विखे पाटील, सुबोध मोहिते, अनंत गीते आणि अरविंद सांवतही अवजड उद्योग मंत्री राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनीही हे खाते सांभाळले. भाजपाचे प्रकाश यांच्याकडेही सुरुवातीला या खात्याची जबाबदारी होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद जवळपास वर्षभर भूषवलेले नारायण राणे मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री होते. मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे अब्दुल रहमान अंतुले डॉ. मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अल्पसंख्यक कल्याण मंत्री होते.
 
 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले भाजपाचे गोपीनाथ मुंडे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ग्रामविकास मंत्री पण, दुर्दैवाने मुंडे यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना अल्पकाळासाठी केंद्रात मंत्रिपद भूषवता आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ भूषवलेले वसंतराव नाईक यांना मात्र राष्ट्रीय राजकारणात येण्याची संधी मिळाली नाही. तीच स्थिती त्यांच्या पुतण्याची म्हणजे सुधाकरराव नाईक यांचीही होती. सुधाकरराव नाईकही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. वैदर्भीय मारोतराव कन्नमवार, वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील बाबासाहेब भोसले अशोक चव्हाण यांनाही केंद्रात मंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाली नाही.
 
 
CM of Maharashtra : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहून चुकलेले पृथ्वीराज चव्हाण यांनीही केंद्रात अनेक महत्वाची मंत्रिपदे सांभाळली. पण, चव्हाण आणि अन्य मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक म्हणजे चव्हाण आधी केंद्रात मंत्री होते, नंतर ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आले. तर बाकीचे नेते आधी महाराष्ट्रात होते, नंतर ते केंद्रात मंत्री झाले.