निवडणुकीचे आयपीएल!

    दिनांक :30-Oct-2024
Total Views |
वेध
- विजय निचकवडे
Election IPL : सध्या सगळ्यांच्या डोक्यात एकच किडा वळवळतोय, तो म्हणजे निवडणुकीचा! ज्याचा प्रत्यक्ष निवडणुकीशी संबंध आहे, त्यांचे बरेच बरे आहे. पण ज्यांचा संबंध नसतो, तेही निवडणूक अंगावर चिंतन-मंथन करताना दिसत आहेत. इथपर्यंत ठीक आहे; मात्र यावेळची निवडणूक म्हणजे आयपीएलचा सामना आहे की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. कोणत्या संघाचा खेळाडू, कोणत्या संघाकडून ऐनवेळी मैदानात उतरेल याचा नेम नाही. अशावेळी निष्ठा, प्रामाणिकपणा यांची दिलेली तिलांजली सर्वमान्य असते.
 
 
leader-a
 
आम्हाला आयपीएलच्या खेळाची व्यवस्था माहीत आहे. खेळाडूंचा लिलाव होतो, लागते आणि त्यानुसार खेळाडूंची खरेदी केली जाते. मग ज्याच्यामध्ये क्षमता अधिक, त्याला मोठ्या किमतीला चांगल्या संघात स्थान मिळते. म्हणूनच तर आयपीएल म्हणजे एकाच संघातील अनेक खेळाडूंना एकमेकांच्या विरोधात लढविण्याची सोपी व्यवस्था असल्याचे बोलले जाते. नक्कीच तो खेळ आहे. जय-पराजय झाला तरी, त्यात सामाजिक नुकसान होत नाही. परंतु निवडणुकीच्या निमित्ताने उतरणार्‍या उमेदवारांकडून सध्या खेळल्या जात असलेल्या आयपीएलमुळे उमेदवाराचे होत नसले, तरी सर्वसामान्य जनता आणि ज्या भागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक लढविली जाते, त्या भागाचे नक्कीच नुकसान होते.
 
 
आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये जेवढा सुळसुळाट झाला नव्हता, तेवढा यावेळी झाला. कारण आज इच्छुकांपुढे दोनच पर्याय शिल्लक राहिले. महाविकास आघाडी आणि महायुती. या दोन पर्यायांमध्ये प्रमुख पक्षांच्या इच्छुकांना आपले भले करून घ्यावयाचे आहे. अशावेळी नाही मिळत उमेदवारी तर दुसर्‍या पक्षात उडी मारण्याचा पर्याय त्यांच्याकडे आहे. मात्र, या उमेदवारांनाही आपले प्राबल्य आणि निवडून येण्याची क्षमता सिद्ध करूनच प्रवेश घ्यावा लागतो, हे तेवढेच खरे! फरक एवढाच की, आयपीएलमध्ये जाहीर बोली लागते, येथे गुप्त बैठका आणि भेटीगाठीतून पक्ष असलेल्या संघात स्थान मिळते. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला विषय म्हणजे पक्षबदल आणि पक्षप्रवेश! कुणी या पक्षातून तर कुणी त्या पक्षातून निवडणूक लढविण्यासाठी उड्या मारतो आहे. आज एका पक्षाच्या बड्या नेत्याला भेटलेली व्यक्ती उद्या दुसर्‍या पक्षाच्या नेत्याच्या गळ्यात गळे घालून त्याचे गुणगान गाताना दिसत असल्याने आयपीएलपेक्षाही विचित्र अवस्था निवडणुकीच्या आयपीएलची झाली आहे.
 
 
Election IPL : निवडणूक लढविण्यास प्रत्येक पक्षात अनेक इच्छूक असतात. कित्येक वर्षांपासून पक्षासाठी काम करताना कधीतरी ही इच्छा जागृत होते. मात्र आयपीएलच्या खेळाडूंप्रमाणे अचानक येऊन एखादा नवा खेळाडू तिकिटाचा डाव साधून जातो आणि निष्ठावान आहे तिथेच राहतो. नवीन आलेल्याच्या पाठीमागे उभे राहून ‘आगे बढो, हम साथ है...’ म्हणणारा हा स्वतः कधीच पुढे जात नाही, हे वास्तव आहे. कदाचित आयपीएलचा खेळ करणे ही राजकीय पक्षांची निवडणूक जिंकण्याची खेळी असू शकेल, पण मग अशावेळी इच्छूक असताना जिवाचे रान करून प्रयत्न करणार्‍यांच्या इच्छांना खतपाणी घालण्याचे काम तरी केले जाऊ नये? आज जिल्ह्यातच नव्हे, तर सर्वत्रच या आयपीएलच्या राजकीय वातावरण गलिच्छ झाल्याचे चित्र आहे. पक्षातील कार्यकर्ते तर नाराज आहेतच; सोबतच मतदारांचाही गोंधळ झालेला आहे. स्वार्थासाठी पक्षांची अदलाबदली करणार्‍यांच्या पाठीशी राहायचे का? अशा मानसिकतेत मतदार आल्यास अशा खेळाडूंची चिंता नक्कीच वाढू शकते. आज निष्ठा, प्रामाणिकपणा या गोष्टी नगण्य असल्याचेच यातून स्पष्ट होते. पण या आयपीएलच्या खेळात मतदार संघाचे होते, हे तेवढेच खरे! अनेक खेळाडूंनी अनेक नव्या राजकीय संघांमध्ये सहभागी होत क्रिकेटच्या आयपीएलला मागे टाकले आहे. म्हणूनच तर समाजमाध्यमांवर आता अनेक प्रकारचे संदेश सामाजिक होत आहे. ‘सकाळी प्रचाराला निघताना, साहेब पक्षातच आहेत ना, याची खात्री करून घराबाहेर पडा...’ अशा आशयाचा संदेश बरेच काही सांगून जाणारा आहे. 
 
- ९७६३७१३४१७