घर भारतात, पण घरात भारत आहे का?

    दिनांक :30-Oct-2024
Total Views |
धर्म-संस्कृती
- प्रा. दिलीप जोशी
Indianness भारतीय माणूस संवेदनशील आहे हे मान्यच, पण आपलं सुंदर सोडून दुसर्‍याचं स्वीकारण्याची आपण चूक तर करीत नाही ना? यावर चिंतनाची गरज आहे. मी भारतात राहतो, पण माझ्या घरात भारत आहे का, हे तपासण्याची गरज आहे. १८३५ मध्ये मेकॅलोने घरात इंग्रज घुसविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याचा प्रयत्न सद्यस्थितीत यशस्वी दिसतो. आमची मुले हृदयाचा गर्भितार्थ असणारे आई आणि बाबा हे शब्द विसरले. त्या जागी मम्मी आणि डॅडी आले. आई-बाबा म्हणणे मागासलेपणा वाटणारे आम्ही झालोत. मम्मी म्हणजे मसाला भरलेला मृतदेह आणि डॅड म्हणजे मृत हे समजत असे नाही. त्यामुळे आई आणि वडील भावबंध बोथट झाले. घरात भारत नसल्याने हे सर्व झाले, हे भारतीय समाजाने ओळखले पाहिजे. पूर्वी वाढदिवसाला हिंदू संस्कृतीत ताट-पाट-रांगोळी असायची. पाटाभोवती दिव्यांची आरास. पाच जणी औक्षण करून आशीर्वाद द्यायच्या. हे पवित्र संस्कार सोडून आता केक आला, मेणबत्त्या मुद्दाम फुंकून विझवून टाकायच्या. ‘दिवा विझणे’ खरं तर अपशकुन; पण इथे तर स्वतः फुंकून दिवा विझवायचा. मग आपल्या घरात अवदसा आणि अवकळा का येणार नाही? घरातला भारत बाहेर काढायचा अन् अपशकुनी क्रिया घरात आणायच्या.
 

mobilefamily 
 
आपले नवीन वर्ष गुढीपाडवा. त्या दिवशी प्रभातसमयी मंगलस्नान, गुढ्या, तोरणे, घरावर भगवी पताका अशा सर्वांगसुंदर वातावरणातले नवीन वर्ष कुठे आणि ३१ रात्री मद्यपान, विक्षिप्त चाळे करत रात्र जागायची. रात्री तर राक्षस जागे असतात, पण आपल्या घरात भारत नसल्यामुळे हे राक्षशी प्रकार रूढ होताहेत. ‘वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी’ हा भारतीय प्रकार नाहीच. इथे साता जन्माच्या गाठी आहेत. सात जन्मपर्यंत आमची हीच जोडी राहील, हा आमचा विश्वास आहे. त्यांच्यामध्ये एक वर्षभर लग्न टिकण्याची शाश्वती त्यामुळे वर्षभर लग्न टिकले की, ते आनंद साजरा करतात. आपण त्यांचेच अनुकरण करत घरातला भारत बाहेर काढतो. ‘व्हॅलेंटाईन डे’ आपल्या संस्कृतीत आहे? इथे तर ‘भुता परस्परे जडो मैत्र जिवाचे...’ आपल्या संस्कृतीत अखंड आणि अभंग मैत्री सांगितली. केवळ माणसा-माणसातच नाही तर चराचर सृष्टीशी कायम मैत्री आहे. गोमाता, तुळशीमाता, गंगामाता अशा चराचरांना आपण आपले स्वकीय समजतो. इंग्रजाळलेल्या संस्कारात हृदयाची विशालता आणि उदारता नसल्यामुळे तिथे एक दिवसाचा व्हॅलेंटाईन आहे.
 
 
Indianness इथे आपण ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ म्हणणारे आम्ही आई-वडिलांची नित्य सेवा करतो. तिथे मदर्स डे, फादर्स डे साजरा करतात. कारण आई-वडिलांचा घटस्फोट होऊन त्यांनी दुसरी लग्ने केलेली असतात. त्यांची मुले अनाथालयात असतात. वर्षातून एकदा भेटता यावे म्हणून मदर्स डे आणि फादर्स डे करतात. इथे जन्मोजन्मीचे नाते आहे, पण आमच्या घरात भारत नसल्याने आम्ही पाश्चिमात्य अंधानुकरण करतो. आमच्या घरातील ‘शुभं करोती’ गेली, तुळशीजवळचा दिवा गेला, अंगणातील सडा आणि रांगोळी गेली, गाईचा घास नैवेद्य गेला म्हणजे भारतीयत्वाचे संस्कारच संपुष्टात आणले आपण. आपला परिवार एकत्रित भोजन करायचा, ‘वदनी कवळ घेता’ हा भोजनमंत्र व्हायचा, हसत खेळत घास बत्तीस वेळा चावत जेवायची प्रथा होती. त्यातून शरीर आणि मन सुदृढ व्हायचे. आपली आई मोठ्याने रामरक्षा, हरिपाठ, भीमरूपी, अकरावा अध्याय म्हणायची आणि ते ऐकून ऐकून आपलं सहज पाठांतर व्हायचे. दुर्दैवाने घरातला भारत बाहेर गेला आणि आपण इंग्रज घरात प्रत्येक माणूस मोबाईलवर आपल्याच तालात व्यस्त झाला. सार्‍यांची मुंडकी भ्रमणध्वनीत खाली. आपल्या घरी कुणीही येऊ नये ही कायम मानसिकता. जोडे घालून स्वयंपाक खोलीत सर्रास जाणे. देवघर तर जवळजवळ नाहीतच जमा. खाण्याच्या भाज्या रस्त्यावर उघड्या आणि पायातील पायताण वातानुकूलित दुकानात विकले जातेय. पूर्वी शौचाला घराबाहेर आणि जेवण घरात असे. मात्र उलट झाले. जेवायला हॉटेलात बाहेर जायचे आणि शौचास घरात जायचे. अशा कितीतरी बाबी आहेत ज्या पाश्चिमात्य आपण अकारण स्वीकारल्या आणि आपल्यातले Indianness भारतीयत्व गमावून बसलो. आपण भारतात राहतो; पण आपल्या घरात भारत आहे का, हा प्रश्न प्रत्येक भारतीय माणसाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. पुढील पिढीवर भारतीय संस्कार झाले नाहीत गुन्हेगार आपण ठरणार आहोत. घरातला बाहेर गेलेला भारत पुन्हा घरात आल्यास बहुतेक प्रश्न सुटतील, यात शंका नाही. 
 
- ९८२२२६२७३५