राष्ट्रवादाची अखंड प्रेरणा; लोहपुरुष सरदार पटेल

    दिनांक :31-Oct-2024
Total Views |
दखल
- प्रवीण अविनाश योगी
१९१८ साली वयाच्या ४२ व्या वर्षी राजकारणात प्रवेश करणारे Sardar Vallabhbhai Patel बॅरिस्टर वल्लभभाई झवेरभाई ’सरदार’ बनले १९२८ साली, पूर्ण एका दशकानंतर! १९२८ च्या बारडोली लढ्याने त्यांना सरदार बनवले आणि याच लढ्याने त्यांना राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले. त्यानंतर जणू ते वल्लभभाई उरलेच नाहीत. संपूर्ण देशात ते सरदार म्हणून ओळखले जाऊ लागले. १९२८ पासून त्यांच्या सरदारत्वाची ओळख देशातल्या राजकारणींना आणि शासनव्यवस्थेला पटली होती, पण १९४५ इतिहासाने एक वळण घेतले आणि त्यांचे ‘सरदारत्व’ चहूअंगांनी फुलून आले. १९४५ ते १९५० पर्यंत म्हणजेच त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी केलेली कामगिरी देशभरातच नव्हे तर जगभरात अजोड आहे. सरदारांबद्दल लिहिणार्‍या कोणाही तटस्थ इतिहासकाराला अतिशयोक्तीचा आरोप सहन करून देखील म्हणावेच लागेल की, या पाच वर्षांच्या काळात जर सरदार नसते तर त्यांनी केलेले दुसरे कोणीही करू शकले नसते. एक वेळ पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष दुसरे कोणी होऊ शकले असते; परंतु सरदार नसते तर त्यांच्या जागी कोणीच नसते.
 
 
Sardar-3
 
आपण ज्याला अखंड हिंदुस्थान म्हणत होतो तो देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी दोन भागांत विभागला गेला. इतिहासात आपल्याला असेच शिकवले गेले. १९४७ आधी विशेषतः १८५७ ते या काळातल्या देशाचा नकाशा पाहिला तर एक गोष्ट चटकन नजरेत भरते की देश त्याकाळीही दोन भागांत विभागलेलाच होता. देशाच्या १८५७ ते १९४७ पर्यंतच्या एकूण एक नकाशा मध्ये दोन रंग दाखवले जात असत. ‘ब्रिटिश इंडिया’ म्हणल्या जाणार्‍या देशाचा ६० टक्के भाग म्हणजेच जवळपास अकरा लाख चौरस मैलांचा प्रदेश त्यातल्या प्रांतांसह रंगात दाखवला जात असे आणि सुमारे पाच लाख चौरस मैल म्हणजे जवळपास ४० टक्के भाग पिवळ्या रंगात चित्रीत केलेला असे. हा पिवळा रंग देशी संस्थानांचा होता. ५६२ संस्थानिक आणि त्यांच्या साडेआठ कोटी प्रजेची गणना ब्रिटिश इंडियात होत नव्हती. हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशा दोन भागांत जेव्हा देश विभागला गेला त्यावेळी साडेसात लाख चौरस मैलांचा प्रदेश आणि अठ्ठावीस कोटी लोकसंख्या हिंदुस्थानच्या वाट्याला आली. आठ कोटी लोकसंख्या आणि पावणे चार लाख चौरस मैलांचा प्रदेश पाकिस्तानच्या वाट्याला आला होता. अशा रीतीने वस्तीच्या प्रमाणात हिंदुस्थानला कमी आणि पाकिस्तानला जास्त भूभाग मिळाला होता.
 
 
पाकिस्तान अलग झाल्यानंतर हिंदुस्थानला जे राष्ट्र उभे करायचे होते त्याच्यापुढे अनेक समस्या होत्या. १५ ऑगस्ट १९४७ पूर्वीच्या नकाशातील स्वतंत्र म्हणता येतील अशी ५६२ राज्य आपापल्या सीमांच्या आत मुटकुळे करून पडून होती; परंतु या राज्यांच्या सीमा मात्र जणू चहूबाजूंनी स्वतंत्र हिंदुस्थानला आवळत होत्या. स्वतंत्र झालेला हिंदुस्थान संस्थानांच्या सरहद्दींच्या विळख्यातून मुक्त झाला नसता तर ब्रिटिश शासनाचा अंत होण्याला कोट्यवधी जनतेच्या दृष्टीने काही उरला नसता. खेरीज पाकिस्तान निर्माण होत असताना लाखो लोकांची कत्तल झाली होती. चारही बाजूंनी हिंदुस्थानात निर्वासितांचे लोंढे येत होते. जातीयवादाचे विष देशभर पेरले जात होते. अविश्वासाच्या अशा घोर अंधकारात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला होता. पण लोकांची मने शंका कुशंकांनी भरली होती. स्वातंत्र्याचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी जनतेची ज्या एका व्यक्तीवर खिळली होती त्या व्यक्तीचे नाव होते Sardar Vallabhbhai Patel वल्लभभाई झवेरभाई पटेल ऊर्फ सरदार पटेल.
 
 
सरदार पटेल हे जन्माने गुजरातेतील पाटील घराण्यात जन्मलेले असे गृहस्थ होते. गुजरातमधील ही पटेल मंडळी शिक्षणात, व्यवसायातही पुढारलेली आहेत. पटेल मंडळी उद्योगी म्हणून प्रसिद्ध आहेत. तशी भांडकुदळ आणि लढाऊ म्हणूनही प्रसिद्ध आहेत. सरदारांच्या मध्ये जी एक निर्भय, वृत्ती आढळते ती त्यांच्या घराण्यातून त्यांना वारसा हक्काने मिळालेली आहे. वयाच्या २५ व्या वर्षी इ.स. १९०० ला ते वकील झाले आणि लवकरच त्यांचा वकिलीत जमही चांगला बसला. यापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. बोरसद या ठिकाणी फौजदारी खटले ते थाटात चालवीत होते. आपल्या भागातील ते मान्यवर प्रतिष्ठित वकील होते. १९०९ त्यांची पत्नी जव्हेरबाई वारली आणि सरदार वयाच्या ३४ व्या वर्षी विधुर झाले. ही घटना त्यांच्या जीवनाला एक नवीन कलाटणी देणारी अशी ठरली. ३४ वे वर्ष म्हणजे ऐन तारुण्य. ऐन तारुण्यात विधुर झालेल्या प्रतिष्ठित कमावत्या वकिलाने पुन्हा लग्न करून नव्याने संसार मांडला असता तर त्यात कुणीच गैर मानले नसते. पण पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला. सरदारांच्या बाबतीत एक मुद्दा अतिशय स्वच्छपणे समजून घेतला पाहिजे आणि तो म्हणजे सरदारांनी कधी आपल्या व्रतबद्धतेचा गाजावाजा केला नाही. वयाच्या ३४ व्या वर्षापासून ७५ व्या वर्षापर्यंत त्यांचे विधुर जीवन हे सर्व अर्थाने व्रतस्थ जीवन होते. सरदारही लोकप्रिय नेते होते. त्यांच्या पायावर सर्वस्व समर्पण इच्छिणार्‍या महिला कार्यकर्त्यांची उणीव नव्हती. तरीही सरदार पटेल यांच्या स्वभावातच रूढ अर्थाची रसिकता नव्हती. तिथे महात्म्याला शोभेसे प्रयोग नव्हते. रसिक कवीला शोभेसी लगट नव्हती. जुन्या कर्मठ नियमानुसार जरी पाहिले तरी सरदारांचे जीवन एक व्रतस्थ, निष्कलंक, चारित्र्यवान पुरुषाचे जीवन होते. महिला कार्यकर्त्यांना पितृवात्सल्यापलीकडे इतर कशाचाही विचार तिथे मनात आणता येणे नव्हते, हाही एक ब्रह्मचर्याचा प्रयोग होता. आणि हे ब्रह्मचर्य सरदारांनी पचवलेले होते. म्हणूनच स्त्रियांच्या मेळाव्यात जुन्या वत्सल पित्याप्रमाणे ते मनमोकळेही वागत आणि कमालीचे अलिप्तही असत. सरदारांचे हे निष्कलंक चारित्र्य हा एक दबदब्याचा विषय असे. या व्रतस्थ चारित्र्याबाबत काँग्रेसमध्ये त्यांच्याशी तुलना करता येण्याजोगा दुसरा माणूस दिसत नाही.
 
 
बॅरिस्टर होण्यासाठी सरदार गेले आणि त्या परीक्षेत सहज पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. १९१२ ला ते बॅरिस्टर झाले आणि परत आल्यानंतर त्यांनी जी वकिली केली तीही पुन्हा भरमसाट पैसा मिळवणारी होती. व्यावहारिक उद्योग जमले नाहीत म्हणून राजकारणाकडे वळणारा हा माणूस नव्हता. खोर्‍याने पैसा ओढण्याची आपली शक्ती सिद्ध केल्यानंतर एका क्षुद्र वस्तूचा तुच्छ मोह झटकून टाकावा तशी सरदारांनी वकिली झटकून टाकली.
 
 
इ.स. १९१८ च्या खेडा प्रकरणापासून Sardar Vallabhbhai Patel सरदारांचे वकिलीकडे दुर्लक्ष होऊ लागले. १९१९ ला ते अहमदाबादचे मेयर होते. १९२१ ला अहमदाबादच्या अखिल भारतीय काँग्रेसचे ते स्वागताध्यक्ष होते. १९१५-१६ पर्यंत राजकारणाशी फारसा संबंध नसणारा हा माणूस पुढच्या पाच-सहा वर्षांत गांधीं खालोखालचा गुजरातचा सर्वात मोठा नेता ही त्यांच्या कर्तृत्वाची पावती आहे. वल्लभभाई एकदा कामाला लागले म्हणजे रात्रंदिवस काम करीत. प्रत्येक काम तपशीलाने आखणे, शिस्तबद्धपणे शेकडो लोकांच्याकडून ते पार पाडून घेणे, कामातून संघटना बांधणे, संघटनेतून काम वाढवणे आणि सर्व चोखपणात आपण अग्रभागी राहून इतरांना धारेवर धरणे अशी त्यांची पद्धती होती. संघटना उभी करण्याचे, गरजेनुसार पैसा उभा आंदोलनासाठी सत्याग्रही जागे करण्याचे त्यांचे सामर्थ्य विलक्षण होते. एखादे अजस्त्र राक्षसी यंत्र असावे त्याप्रमाणे त्यांची गती असे. तरीही कुठेही घाई, गडबड, धांदल असा त्यांचा स्वभाव नव्हता. कोणत्याही बाबतीत अंगचोरपणा करण्याची त्यांची पद्धत नव्हती. त्याग, निर्भयपणा आणि सर्वस्वाचे बलिदान करण्याची त्यांची ताकद अजोड होती. देशाची फाळणी जाहीर झाली आणि त्यासोबतच वेगळ्या पिवळ्या रंगात दाखवल्या जाणार्‍या ५६२ संस्थानिकांवरच्या ब्रिटिश सार्वभौमत्वाचाही अंत झाला. केंद्रीय शासन बदलल्यानंतर नव्या सरकारला आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जुने करार यथावत पाळावे लागले असते किंवा प्रदेश ताब्यात घ्यावे लागले असते. देश सोडून जाणार्‍या ब्रिटिश सरकारने ५६२ राजांवरच्या आपल्या सार्वभौमत्वाचा हक्क नव्या सरकारकडे सुपूर्द केला नव्हता. देशातील बहुतेक सर्व राजे ‘१८५७ सालापूर्वी होतो तसे आता आपण स्वतंत्र राजे होणार’ असा अर्थ काढून मोकळे झाले होते. संस्थानिकांचे हे स्वप्न मूळ धरू लागले असते तर हिंदुस्थान आणि पाकिस्तानानंतर लवकरच हा देश शेकडो तुकड्यात विभागला गेला असता. हिंदुस्थानच्या मधोमध असणारी हैदराबाद, भोपाळ, जुनागड सारखी राज्ये मुस्लिम लीगच्या बाजूने होती आणि वेळ आली पाकिस्तानात सामील व्हायला तयार होती. जेसलमेर, बिकानेर आणि जोधपूर सारख्या राजस्थान-पाकिस्तानच्या सीमेवरील राज्यांना पाकिस्तानात सामील होण्यासाठी जिनांनी लालूच दाखवली होती.
 
 
सौराष्ट्रातल्या राज्यांचा एक स्वतंत्र संघ स्थापून स्वत: त्याचे प्रमुख होण्यासाठी तिथल्या जामसाहेबांच्या हालचाली सुरू होत्या. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची त्यांनी तयारी ठेवली होती. मैसूरने तर ब्रिटिशांनी जप्त आपला प्रदेश परत मागितला होता आणि त्रावणकोरने आता आपण स्वतंत्र होत असल्याची घोषणा करून टाकली होती. अशा अतिशय बिकट परिस्थितीत १९४७ सालच्या जुलै महिन्यात सरदारांनी सर्व राज्यांच्या विलीनीकरणासाठी निर्माण केलेल्या स्वतंत्र खात्याचा कारभार हाती घेतला. एकेका राजाशी झालेल्या चर्चा, त्यातून उद्भवलेले प्रश्न, त्या प्रश्नांवर शोधलेले तोडगे... यांची कहाणी खूप आहे. विस्तारभयास्तव ते येथे सांगणे शक्य नाही. वयाची बहात्तरी गाठली असताना प्रकृती ढासळत असताना अखंड परिश्रम केल्यानंतरही गांधी, जवाहरलाल, समाजवादी, तथाकथित धर्मनिरपेक्ष या सगळ्यांचे फटकारे सहन करून अत्यंत त्रस्त झाले असतानाही सरदारांनी ही परिस्थिती अभूतपूर्व शांतपणे हाताळली.
 
 
सदैव बदलत राहणार्‍या, विकसित होत राहणार्‍या सामाजिक अवस्थेत ‘राजे आणि त्यांची राज्ये’ प्रस्थापित झालेली आणि स्वीकारली गेलेली एक परंपरा होती. शेकडो वर्षांपासून राज्य उपभोगणार्‍या राजांच्या मनात अन्यायाची अथवा अपमानाची भावना निर्माण न व्हावी अशा तर्‍हेने ही परंपरा नव्या परिस्थितीत सहजपणे मिसळली जावी अशी Sardar Vallabhbhai Patel सरदारांची इच्छा होती. सरदारांचे ते वैशिष्ट्यच होते. ब्रिटिशांच्या शासन काळात शासन व्यवस्थेतील लीगच्या बाजूने अथवा काँग्रेस विरोधी असणार्‍या अधिकार्‍यांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अपमानित करून दूर लोटण्या ऐवजी त्यांचा अनुभव आणि त्यांची कार्यपद्धती यांचा देशाला जास्तीत जास्त लाभ व्हावा, अशी यंत्रणा त्यांनी निर्माण केली. राजांच्या मामल्यातही त्यांनी हेच धोरण स्वीकारले. आजवर उपभोगलेले वैभवशाली जीवन हिसकावून घेण्याऐवजी त्यांचे जीवनमान हळूहळू कमी करत आणून काही दशकांनंतर ते सर्वसामान्य जनतेसारखे व्हावे, अशा प्रकारच्या व्यवस्था त्यांनी योजली. राज्यांच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित वर्षासनांची रक्कम वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळी ठरवली. प्रसंगी आवाज चढवला, डोळे वटारले, क्वचित हातही उगारले आणि अगदीच निरूपाय झाला तेव्हा जुनागड, हैदराबाद इथल्या मुसलमान शासकांचा समाचारही घेतला.
 
 
बरेच इतिहासकार, विचारवंत, विद्वान, राजकारणी पंडित सरदारांची तुलना बिस्मार्कशी करण्याचा प्रयत्न करतात. सरदारांना बिस्मार्कच्या बरोबरीला नेऊन आपण त्यांचे उर्ध्वमूलन करत आहोत, असा एक भ्रामक समज ते बाळगून आहेत. बिस्मार्कने जर्मनीचे एकीकरण केले आणि सरदारांनी भारताचे एकीकरण केले एवढ्या एकच साम्याच्या आधारावर ते हा निष्कर्ष काढून मोकळे होतात. जर्मनी हा देश दोन-तीन डझन राज्यांमध्ये विभागलेला होता. एकच धर्म आणि एकच भाषा असून सुद्धा या राज्यांमध्ये नेतृत्वासाठी मारामारी सुरू होती. अशा परिस्थितीत बिस्मार्कने अत्यंत घातकी विजय मिळवला. मोठ्या प्रमाणावर कत्तली केल्या आणि एकीकरणाच्या नावाखाली तो स्वत:च सम्राट होऊन बसला. सरदारांनी यापैकी काहीच केले नाही. सरदारांसमोर ५६२ राजे होते. त्यांच्याशी संघर्ष करावा असा पुसटसाही विचार नव्हता. जुनागड आणि हैदराबादमध्ये नाईलाजापोटी थोडे बहुत रक्त सांडले. परंतु सरदारांनी प्राप्त एकीकरणाची सिद्धी जगाच्या इतिहासात अशी काही अजोड आहे की, बिस्मार्क त्यांच्यापुढे लहानसे पोर वाटावे!
 
 
Sardar Vallabhbhai Patel : भारत सरकार तर्फे ‘भारतरत्न’ हा किताब देऊन अत्यंत विरळा आणि असामान्य व्यक्तींचे राष्ट्रीय स्तरावर ऋण मान्य केले जाते. तरी १९५० मध्ये दिवंगत झालेल्या आपला वर्तमान राष्ट्रीय नकाशा घडवणार्‍या सरदार पटेल यांना भारतरत्न सन्मान थेट १९९१ राजीव गांधींसोबत देण्यात आला. तामिळ अभिनेता आणि राजकारणी एम. जी. रामचंद्रन यांना त्या आधीच हा सन्मान प्राप्त झाला होता. १९५४ मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि १९५५ मध्ये जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या हयातीतच या सन्मानाने विभूषित केले गेले. मृत्यू झाल्यानंतर ४१ वर्षांनी ‘भारतरत्न’ सन्मान मिळवणारे सरदार या परंपरेत मृत्यूनंतर ४९ वर्षांनी सन्मान मिळवणार्‍या गोपीनाथ बारडोली यांच्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकावर आहेत.
 
 
१९५४ मध्ये मौलाना आझाद यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर दुसर्‍या-तिसर्‍या महिन्यातच संसदेच्या दालनात त्यांचे तैलचित्र लावण्याबद्दल जवाहरलाल यांनी संसदेला सुचवले. ग्वाल्हेरचे राजे शिंदे त्यावेळी तिथे उपस्थित होते. १९५० मध्ये निधन पावलेल्या सरदार पटेल यांचे तैलचित्र अद्याप लावले गेले नसल्याचे त्यांच्या आले. राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांनी सरदारांचे तैलचित्र संसदेत लावण्याची व्यवस्था केली. आपल्या स्वत:च्या खर्चाने त्यांनी अत्यंत तातडीने सरदारांचे चित्र काढून घेतले. तेवढ्याच त्वरेने राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांनी ते संसद भवनात लावले. त्याप्रसंगी सरदारांना श्रद्धांजली अर्पण करताना शिंदेंनी म्हटले होते,
'Here is the man whom I once hated. Here is the man of whom I was afraid. Here is the man whom I admire and love!'
 
- ७५०७४९३११२