बलुचिस्तानातून हिंगलाज देवी विदर्भाच्या अमरावती आली!

09 Oct 2024 14:04:37
अमरावती,
Hinglaj Devi-Amravati : हिंगलाज देवीचे मूळ स्थान हे पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे आहे. फार पूर्वी बलुचिस्तानमध्ये हिंगलाज मातेचा मोठा थाट होता. मात्र कालांतराने हिंगलाज देवीला त्या ठिकाणी काळजी वाटायला लागली. आपल्या खऱ्या भक्ताच्या शोधात ती निघाली असताना ब्रह्मदेवा यांच्या सांगण्यावरून ती वऱ्हाडातील अकोली नगरीत आली. अकोली नगरीजवळ सत्य अरण्य या जंगलात हिंगलाज मातेला अमृतगीर महाराज ज्वालामुखी हिंगलाज देवीची तपस्या करीत असल्याचे त्यांना तिथे दिसले. अमृतगीर महाराजांच्या सहकार्याने त्यांनी चिंतामणजी भगत या देवीच्या भक्ताची कठीण परीक्षा घेतली. चिंतामणजी भगत हे अकोली येथे त्यांच्या बहिणीकडे गुरे चारण्याचे काम करीत होते.
हेही वाचा : नवरात्रीची नवमी कधी? 11 की 12 ऑक्टोबर  
 
hinglaj devi
 
अतिशय आजारी असताना चिंतामणजी भगत यांना ज्वालामुखी हिंगलाज मातेने दृष्टांत दिला. या दृष्टांतानुसार त्यांनी अमृतगीर महाराजांच्या सहकार्याने हिंगलाज मातेची पालखी अकोली नगरीतून घनदाट अरण्यात नेली. मातेच्या दृष्टांतानुसार त्यांनी घनदाट जंगलात तीन भव्य परकोट उभारून परकोटाच्या मधात उंबराच्या झाडाखाली मंदिर उभारून या मंदिरात इ.सन 1303 मध्ये देवीची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून मंदिर परिसरात असणाऱ्या परिसराला हिंगलाजपूर असे नाव पडले.
 
 हेही वाचा:  देवीचे 'ते' शक्तीपीठ जेथे मुस्लिमही टेकवतात डोकं !
 
नऊ पिढ्यांपासून देवीची सेवा करण्यात येत आहे. या मंदिरामध्ये या मंदिराचे संस्थापक चिंतामणजी भगत यांची मूर्ती देखील स्थापन करण्यात आली आहे. त्यांचा जीवन कार्यकाळ 1250 ते 1357 असल्याचा उल्लेख देखील आहे. चिंतामणजी भगत यांच्यानंतर मंदिराचे सेवाधारी म्हणून 1358 ते 1453 दरम्यान फिरकुजी भगत हे ह्या मंदिराचे सेवाधारी होते. यानंतर 1654 ते 1544 दरम्यान कृष्णाजी भगत यांनी सेवाधारी म्हणून हे मंदिर सांभाळले. 1545 ते 1638 हा नागोजी भगत हे मंदिराचे सेवाधारी होते.
 
1639 ते 1735 दरम्यान सटवाजी भगत यांनी सेवाधारी म्हणून हे मंदिर सांभाळले. 1736 ते 1830 दरम्यान आकाजी भगत हे मंदिराचे सेवाधारी होते. 1831 ते 1920 दरम्यान गणोजी भगत यांनी या मंदिराची सेवा केली. 1921 ते 1992 पर्यंत परशुरामजी भगत हे या मंदिराचे सेवाधारी होते. आता भगत कुटुंबातील नव्या पिढीतील रामदास भगत यांच्याकडे सेवाधारी म्हणून हिंगलाज देवी संस्थानची जबाबदारी आहे.
 
हिंगलाज देवीच्या मंदिर परिसरात महादेवाचे तसेच हनुमानाचे मंदिर सुद्धा आहे. या मंदिरात नवरात्र उत्सवात अष्टमीच्या दिवशी या मंदिरात होम पटवल्या जातो. नवरात्र उत्सवासोबतच हनुमान जयंतीचा देखील उत्सव या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेच्या दिवशी लाकडाचे 11 गाडे ओढण्याची परंपरा आहे. हा गाडे ओढण्याचा सोहळा पाहण्यासाठी हिंगलाजपूर परिसरालगत असणाऱ्या अनेक गावांमधून हजारो लोक येथे उपस्थित असतात. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे ही यात्रा भरते. दुपारी तीन वाजेपर्यंत हा संपूर्ण परिसर शांत झालेला असतो, अशी माहिती देखील रामदास भगत यांनी दिली.
पाकिस्तानातही आहे देवीचे मंदिर
अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यात असणारी हिंगलाजपूर येथील हिंगलाज देवी ही मूळची बलुचिस्तानमधील असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे सध्या पाकिस्तानात असणाऱ्या बलुचिस्तान प्रांतात आज देखील हिंगलाज नदीच्या काठावर हिंगलाज मातेचे मंदिर आहे. प्राचीन काळापासून या ठिकाणी असणाऱ्या हिंगलाज मातेच्या दर्शनासाठी पाकिस्तानातील अनेक हिंदू धर्मीय नियमित जातात, अशी माहिती हिंगलाजपूर येथील देवीच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांनी दिलेली आहे.
Powered By Sangraha 9.0