उत्तर वाहिनीच्या तिरावरील ठाणेगावची जगदंबा माता

09 Oct 2024 19:53:46
संजय नागापुरे
कारंजा (घाडगे), 
Thanegaon-Jagdamba Mata : पर्वतरांगा व घनदाट अरण्यातून वाहणार्‍या गावनदीला ठाणेगाव येथे उत्तर वाहिनीचे रूप प्राप्त झाले आहे. त्याच ठिकाणी जगदंबा मातेचे प्राचीन मंदिर आहे. उत्तर वाहिनीवर विराजमान असलेली ही जगदंबा असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान व कारंजा तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाते.
 
 
MATA
 
 
हे देवस्थान पुरातन आहे. तिथे असलेल्या शिलालेखावरून ते 1223 (शालीवाहन शके 1140) मध्ये बांधण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. मंदिराच्या आवारात कोरीव शिलालेख मिळाला आहे. देवस्थानाचा गाभारा खोलगट असून गर्भगृहात जगदंबेची कोरीव मूर्ती व्याघ्रासनी आहे. मूर्तीसमोर शिवपिंड आहे. त्या पिंडीखाली जलतीर्थ असल्याची वंदना आहे. मंदिर परिसरात भग्नमूर्तीही आढळतात. हेमाडपंथी बांधणीच्या या मंदिरात प्रवेशासाठी दोन दगडी प्रवेशद्वारे वाकून ओलांडावी लागतात. मंदिराच्या सभोवताल पूर्वी दगडी चिर्‍यांचा कोटो होता. तो ढासळल्यामुळे नवीन भिंत बांधण्यात आली. सभामंडपदेखील दगडी चिर्‍यांचा आहे. उन्हाळ्यामध्ये कोणत्याही वातानुकुलीत यंत्राची येथे गरज भासत नाही इतके थंड वातावरण असते.
 
 
 
प्रवेशद्वारावर व खांबांवर दगडी मूर्त्या कोरलेल्या आहेत. या मंदिराचा पुरातन इतिहास बघितल्यास येथे घनदाट अरण्य होते. या अरण्यातील चंड व मुंड या दोन राक्षसांचा वध केल्यावर ही शक्ती माता येथे स्थानापन्न झाली. तिचे स्थान बसले म्हणून ठाणेगाव असे या गावाला संबोधतात. देवीचे मूळ नाव चंडिका, पण काळाच्या प्रवाहात बदल होऊन जगदंबा माता पडले. देवीचे दोन मुखवटे असले तरी मुळ देवी एकच आहे. मूर्तीवर पितळी चेहर्‍याचा मुखवटा, अलंकार व चांदीचे मुकूट चढविण्यात येते. मूळ देवीच्या मूर्तीमागे खोळ आहे. या खोळीलासुद्धा मुकूट बसविण्यात येतो. या देवस्थानाच्या व्यवस्थापनासाठी 1952 मुध्ये ट्रस्ट स्थापन करण्यात आली. देवराव घाडगे आणि बाबूराव जाचक यांनी मंदिराच्या देखभाल खर्चाकरिता शेत दिले. मंदिर परिसरात सभागृह व मंगल कार्यालयाचे बांधकाम झाले. त्यामुळे नागरिकांची सोय झाली व ट्रस्टला उत्पन्नाचा मार्ग मिळाला. दरवर्षी नवरात्र व चैत्र महिन्यात मंदिरावर दिव्यांची रोषणाई करण्यात येते. असंख्य भाविक येथे स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवितात. या मूर्तीसमोर केलेली मनोकामना पूर्ण होते, असा भाविकांचा विश्‍वास आहे.
Powered By Sangraha 9.0