नवीन प्रकारचा दहशतवाद

10 Nov 2024 05:50:00
राष्ट्ररक्षा
 
Air India plane : गेल्या आठवड्यामध्ये भारताला एका नवीन प्रकारच्या दहशतवादाला सामोरे जावे लागले. विमाने किंवा विमानतळावर बॉम्ब ठेवला असल्याच्या धमक्यांमुळे विमान कंपन्यांना पंधराशे ते दोन हजार कोटी एवढा अतिरिक्त खर्च करावा लागला. झालेले नुकसान सोशल मीडिया कंपनी आणि धमक्या देणार्‍यांकडून वसूल केले पाहिजे. भारत हा जगातील सर्वाधिक विस्तारणार्‍या हवाई वाहतूक बाजारपेठांपैकी एक आहे. विमानात बॉम्ब असल्याच्या खोट्या धमक्यांद्वारे भारतातील विमान कंपन्यांना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्यामुळे विमान उड्डाणांना आणि व्यवसायाला प्रचंड फटका बसला आहे.
 
 
air-india
 
बॉम्ब अफवांच्या संख्येत गंभीर वाढ
गेल्या आठवड्यात कॅनडातील इकॉलुएट या एअर इंडियाचे विमान उतरले होते. प्रवाशांना घेऊन मुंबईहून शिकागोला जाणार्‍या बोईंग विमानाला १५ ऑक्टोबरला बॉम्ब असण्याची धमकी मिळाल्यामुळे मार्ग बदलावा लागला होता. कित्येक तासांनंतर या खोळंबलेल्या प्रवाशांना शिकागोला नेलं; मात्र ही धमकी खोटी होती. भारतातील विमान कंपन्यांना लक्ष्य करत या महिन्यात आतापर्यंत अनेक खोट्या धमक्या देण्यात आल्या आहेत. गेल्या एका आठवड्यातच अशा किमान ९० धमक्या देण्यात आल्या होत्या. जून महिन्यात दिवशी ४१ विमानतळांना ई-मेलद्वारे विमानात किंवा विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या खोट्या धमक्या देण्यात आल्या. यामुळे विमानतळांवरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. निम्म्या धमक्या दिल्ली आणि मुंबई या देशातील दोन सर्वात मोठ्या विमानतळांच्या बाबतीत होत्या. अलिकडच्या काळात भारतीय विमान कंपन्यांना लक्ष्य करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये व्यत्यय निर्माण करणार्‍या घटनांमुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांत या धमक्यांना बळी पडलेल्या कोणत्याही मोठ्या विमान कंपनीने या विषयावर भाष्य केलेले नाही. हा सर्वांत जास्त सणासुदीचा गर्दीचा हंगाम आहे आणि त्यांना प्रवाशांमध्ये भीती निर्माण करायची नाही. एअरलाईन्सविरुद्ध हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवाद आहे आणि त्यावर कठोर कारवाई केली गेली.
 
 
खोट्या धमक्यांचा वाईट हेतू
Air India plane विमान कंपन्यांना लक्ष्य करण्यासाठी देण्यात येणार्‍या बॉम्बच्या खोट्या धमक्यांचा संबंध अनेकदा वाईट हेतू, लक्ष वेधून घेणं, मानसिक आरोग्याच्या समस्या, व्यवसायात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न किंवा खोडसाळपणा करणे इत्यादी बाबींशी आहे. गेल्या वर्षी बिहारमधील एका विमानतळावर चेक-इनची प्रक्रिया चुकल्यानंतर निराश झालेल्या प्रवाशानं असाच खोडसाळपणा केला आणि स्पाईस विमानाला उड्डाणाला विलंब करण्यासाठी बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली.
 
 
भारतातील हवाई सेवा क्षेत्रात प्रचंड विस्तार
मागील काही वर्षांपासून भारतातील हवाई सेवा क्षेत्रात प्रचंड विस्तार होतो आहे. भारत ही जगातील सर्वाधिक वेगानं विस्तारणारी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी भारतात देशांतर्गत विमान उड्डाणांमधून १५ कोटींहून अधिक प्रवास केला. देशातील ३३ आंतरराष्ट्रीय विमानतळांसह १५० हून अधिक कार्यरत विमानतळांवर भारतात दररोज ३,००० हून अधिक विमानं येतात आणि जातात. गेल्या आठवड्यात बॉम्बसंदर्भातील अफवा शिगेला पोहोचल्या असताना १४ ऑक्टोबरला भारतातील विमान कंपन्यांनी ४,८४,२६३ प्रवाशांची वाहतूक केली. देशात एकाच दिवसात इतक्या प्रवाशांची वाहतूक करण्याचा हा एक विक्रम आहे. भारतात ७०० प्रवासी विमानं सेवेत आहेत तर १,७०० हून अधिक विमानांच्या ऑर्डर प्रलंबित आहेत. भारत ही नक्कीच व्यावसायिक विमानांची सर्वात वेगानं विस्तारणारी बाजारपेठ होईल. मात्र अशा प्रकारच्या खोट्या बॉम्ब माहितीमुळे किंवा अफवांमुळे या क्षेत्राला फटका बसत आहे. विमान कंपन्यांना आलेल्या बॉम्बच्या धमक्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होते.
 
 
खोट्या धमकीचा काय परिणाम होतो?
बॉम्ब धमकी किंवा माहिती मिळाल्यानंतर जर विमान आकाशात असेल तर त्याला लगेचच जवळच्या विमानतळाकडे न्यावं लागतं. धोक्याची माहिती दिलेल्या विमानांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी लढाऊ विमानांचाही वापर करावा लागतो. एकदा का विमान विमानतळावर उतरलं की, प्रवासी विमानातून उतरतात. त्यानंतर विमानातील सर्व सामान, माल आणि खाद्यपदार्थांची कसून तपासणी केली जाते. या प्रक्रियेसाठी तास लागू शकतात. विमानातील पायलट असो किंवा इतर कर्मचारी असो त्यांच्या कामाचे तास ठरलेले असतात. त्या मर्यादेपेक्षा अधिक तास ते काम करू शकत नाही. परिणामी विमानातील सर्व कर्मचार्‍यांच्या जागी दुसर्‍या कर्मचार्‍यांची व्यवस्था करावी लागते. यातून विमानाच्या उड्डाणास आणखी विलंब होतो. या सर्व प्रक्रियेसाठी मोठा खर्च होतो आणि विमान वाहतुकीवर नकारात्मक परिणाम होतो. नियोजित मार्गावरून इतरत्र वळवण्यात आलेल्या किंवा विलंब झालेल्या विमानामुळे, विमानतळावर उभे असलेल्या विमानामुळे, विमान कंपनी महसूल कमावत नसते, तर त्यांचा अतिरिक्त खर्च करते. त्यामुळे ते विमान उड्डाण कंपनीसाठी पैसे गमावणारं ठरतं. विमान उड्डाणास विलंब झाल्याने त्याचा वेळापत्रकावर मोठा परिणाम होतो.
 
 
धमक्यांसाठी सोशल मीडियाचा वापर
Air India plane सोशल मीडियावरील अकाऊंटवरून टाकण्यात येणार्‍या बॉम्ब अफवांमध्ये नाट्यमयरीत्या वाढ झाल्यामुळे यासाठी जबाबदार असणार्‍या गुन्हेगारांची ओळख पटवणं कठीण झालं आहे. या धमक्या एखाद्या व्यक्तीनं दिली आहे की संघटनेनं दिली आहे की कोणीतरी याची नक्कल करत आहे, याबद्दल स्पष्टता नाही. गेल्या आठवड्यात भारतीय अधिकार्‍यांनी एका १७ वर्षांच्या शाळा सोडलेल्या मुलाला अटक केली होती. मीडियावरील या पोस्ट कुठून टाकण्यात आल्या, याचा तपास करताना आयपी अ‍ॅड्रेस (खझ रववीशीीशी) चा शोध घेतला असता, काही पोस्टचा उगम लंडन आणि जर्मनीहून झाला आहे. बॉम्ब असल्याच्या अशा खोट्या धमक्यांमागे कोण आहे, याचा छडा लावणं हे एक मोठं आव्हान आहे. सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना ताकीद दिली आहे की, अशा पोस्ट किंवा मेसेजेस सोशल मीडियावर लगेच ब्लॉक झाले पाहिजे आणि अशा पोस्ट व्हायरल होऊ देऊ नये. कारवाई न केल्यास सरकार सोशल मीडियावर कारवाई करेल. विमानतळांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणं किंवा विमानांच्या उड्डाणांमध्ये व्यत्यय आणणं या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी भारतीय कायद्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.
 
 
एअरलाईन्स विविध कारणांमुळे तोट्यात
हा लिहून पूर्ण असताना अजून एक बातमी आली की, आता काही मोठ्या शहरातील मोठ्या हॉटेल्सना धमकी मिळत आहे की, त्या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले आहे. म्हणजे आपण एका दहशतवादाच्या प्रकाराला सामोरे जात असताना, दुसरा दहशतवादाचा प्रकार पुढे येत आहे. म्हणून सरकारने आक्रमक कारवाई करून अशा सगळ्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना अत्यंत कडक शिक्षा द्यायलाच पाहिजे, नाहीतर अशा प्रकारच्या धमक्या आणि अफवा पसरविणे थांबणार नाही. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध विनोदी यूट्यूबर जसपाल भट्टी यांचा डजड (डहेीींरसश ेष ीींरषष) नावाच्या एअरलाईन्सवर व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये एअरलाईन्सचा एकच कर्मचारी (जसपाल भट्टी) सगळ्या प्रकारची कामे करताना दिसत होता. कारण जास्त कर्मचारी ठेवणे त्यांना परवडणारे नव्हते. नेमके तेच केले जात आहे. मागच्या आठवड्यामध्ये प्रयागराजवरून विमानाने पुण्याला येत असताना, प्रयागराज विमानतळावर दोन कर्मचारी सगळ्या प्रकारची कामे करत होते. कारण सध्या सगळ्या एअरलाईन्स विविध कारणांमुळे तोट्यात चालल्या आहेत.
 
 
फसव्या कॉलसाठी कठोर शिक्षा जरूरी
Air India plane एखाद्या खोट्या धमकीसाठी किंवा बॉम्ब असल्याचा फसव्या कॉलसाठी सरकार अशा गुन्हेगारांचा समावेश नो-फ्लाय लिस्टमध्ये त्यांना विमान प्रवास करण्यास प्रतिबंध करण्याबरोबरच या गुन्ह्यांसाठी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करणारे नवीन कायदे आणण्याचा विचार करत आहे. सरकारने अनेक अशा अफवा पसरवणार्‍या व्यक्तींना अटक केली आहे. आशा करूया यामुळे अशा प्रकारच्या धमक्या देणे, अफवा पसरवणे आणि भारताचे नुकसान करणे थांबवले जाईल. रेल्वे रुळावर दगड ठेवणे, सिमेंटचे पेव्हर ठेवणे किंवा लाकडाचे मोठे स्लीपर ठेवणे हासुद्धा घातपाताचा दहशतवाद आहे. यावरसुद्धा आपण लक्ष ठेवायला पाहिजे आणि दोषींना शिक्षा द्यायला पाहिजे.
 
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
- ९०९६७०१२५३
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
Powered By Sangraha 9.0