- मेधा इनामदार
Gold : global economy सोने हा भारतीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतात सोन्यामध्ये केली जाणारी ही केवळ ‘गुंतवणूक’ नसते, तर त्यात लोकांच्या भावना गुंतलेल्या असतात. सोन्याच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्वामुळे भारतीय लोकांचा कल नेहमीच सोने खरेदीकडे राहिला आहे. किडूकमिडूक का असेना, देशातील प्रत्येक घरात सोने असतेच असते. सोने हा भारतीयांचा वीक पॉईंट आहे असे म्हटले तरी चालेल. त्यामुळेच जागतिक पातळीवर भारत हा सोन्याचा सर्वात आयातदार आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि इतर आर्थिक साधनांसारखे गुंतवणुकीचे पर्याय निर्माण होण्याच्या आधीपासूनच भारतात संपत्ती जमवण्यासाठी सोने हा एक पसंतीचा मार्ग मानला आहे. भारतात महागाई किंवा इतर कोणत्याही आर्थिक अनिश्चिततेपासून बचाव करण्यासाठी सोन्याकडे एक सुरक्षित पर्याय म्हणून पाहिले जाते. जगात अमेरिकेकडे सोन्याचा सर्वाधिक साठा आहे. तो ८१३३.४६ एवढा आहे. त्यानंतर जर्मनी, इटली आणि फ्रान्स यांचा क्रमांक लागतो. ८५५.७३ टन सोन्यासह भारताचा आठवा क्रमांक आहे. भारत सातत्याने सोने खरेदी करत असल्यामुळे ८४५.९७ टन सोन्याचा साठा असलेल्या जपानला मागे टाकून भारताने आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आश्चर्य म्हणजे, एका अंदाजानुसार भारतीय कुटुंबाकडे असलेले ‘घरगुती सोने’ सुमारे २७ हजार आहे. हे सोने जगातील कोणत्याही देशाच्या सोन्याच्या साठ्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे.
Gold : global economy जागतिक अर्थव्यवस्थेतही सोन्याला तेवढेच महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे अलिकडे डॉलरचे स्थान डळमळीत होऊ लागले आहे. वाढत चाललेली महागाई, जागतिक बाजाराला लागलेले युद्धांचे ग्रहण आणि जागतिक मंदीची भीती यामुळे जगातले सर्वच देश आता सोने खरेदी करू लागले या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या काळात आरबीआयने ३२ टन सोने खरेदी केले आहे. भारताची आर्थिक स्थिती चांगली असल्याचेच हे निदर्शक आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या एकूण चलनसाठ्यातील सोन्याचा वाटा ८.१५ टक्क्यांवरून ९.३२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. भारताकडे सध्या ८०० टनांपेक्षा अधिक सोने आहे. यातील ३०० टनांहून अधिक सोने देशातच ठेवले तर इतर सोने हे देशाबाहेर, इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांमध्ये सुरक्षित ठेवले आहे. भारताचे सोने हे ब्रिटन आणि अमेरिकेत ठेवण्यात आले आहे. जगभरातील अनेक देश ब्रिटनच्या बँक ऑफ इंग्लंड या बँकेत सोने ठेवतात. धोका कमी करण्याच्या हेतूने सर्व देशांच्या मध्यवर्ती बँका आपले सोने सुरक्षिततेच्या हेतूने वेगवेगळ्या देशांच्या बँकांमध्ये ठेवतात. त्यामुळे आपत्तीच्या काळात राजकीय आणि आर्थिक परिस्थिती बिघडली तरी परदेशात ठेवलेले सोने सुरक्षित राहते. नैसर्गिक आपत्तींमुळेही सोन्याच्या साठ्याचे नुकसान होऊ शकते. परदेशात सोने ठेवल्याने देशातील आपत्तीच्या काळातही आपले काही सोने सुरक्षित राहील, याची खात्री असते.
स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटनने भारताचे सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवले होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही भारताने बँक ऑफ इंग्लंड बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स (बीआयएस) यांच्याकडेच आपले सोने ठेवले. या बँकांमध्ये भारताचे ३२४.०१ मेट्रिक टन सोने सुरक्षित ठेवले होते तर २०.२६ मेट्रिक टन सोने ठेवींच्या स्वरूपात ठेवण्यात आले होते, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. १९९१ मध्ये एक वेळ अशी होती की भारताकडे आयात करण्यासाठी कोणतेही परकीय चलन शिल्लक नव्हते. गरजेमुळे भारताला आपले सोने गहाण ठेवून कर्ज घ्यावे लागले होते. त्यावेळी भारताने ४७ टन सोने गहाण ठेवले आणि २.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते. माजी राज्यपाल सी. रंगराजन यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, सरकारने सोने गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई विमानतळावर चार्टर विमान उभे होते. ४७ टन या विमानात ठेवण्यात आले होते. हे सोने घेऊन विमान इंग्लंडला गेले. त्यानंतरच भारताला कर्ज मिळाले. अर्थात त्यानंतर भारताने गहाण ठेवलेले सोने सोडवलेच; पण परकीय चलनाचा साठाही वाढवला. परंतु कर्ज संपले तरी सोने मात्र तिथेच होते. तेच सोने आता परत आणले जात आहे.
Gold : global economy हे सोने आताच परत आणण्यामागे दोन हेतू एक म्हणजे आज भारताची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली आहे. आज भारताची परकीय गंगाजळी ६८८ बिलियन डॉलर्स म्हणजे भारताच्या ११ महिन्यांच्या आयातीसाठी पुरून उरेल एवढी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या सुरू असलेल्या इस्रायल तसेच युक्रेन आणि रशियाच्या युद्धपरिस्थितीमुळे एकूणच अर्थव्यवस्था आणि राजकारण सातत्याने बदलते आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चात्त्य देशांनी एकूण संपत्तीच्या ५० टक्के म्हणजे सुमारे ३०० बिलियन डॉलर्सची संपत्ती सध्या गोठवून ठेवली आहे. त्यात सोने आणि डॉलर्सच्या स्वरूपातली करन्सी आणि असेट्स आहेत. त्यामुळे रशिया आज स्वत:चेच पैसे वापरू शकत नाही. सध्या भारत आणि ब्रिटन यांचे संबंध चांगले आहेत. परंतु राजकीय गणिते कशी आणि केव्हा बदलतील हे कुणालाही कधीच येत नाही. त्यामुळे काळजी घेतलेली कधीही चांगलीच. आरबीआयने याच वर्षी मेमध्येदेखील १०० टन सोने भारतात आणले असून आता नुकतेच, म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी १०२ टन सोने लंडनहून भारतात आणले. अजूनही इतकेच टन सोने भारतात आणण्यात येणार आहे. अर्थातच हे सर्व सोने आपलेच आहे, जे आजवर लंडनच्या बँकेत होते.
हे १०० सोने भारतात आणण्यासाठी अनेक महिन्यांचे नियोजन करण्यात आले. अर्थ मंत्रालय, आरबीआय आणि सरकारच्या इतर शाखांसह स्थानिक अधिकारी नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये गुंतले होते. १०० टन सोने एका देशातून दुसर्या देशात हलवणे हे काही सोपे काम नाही. त्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था उभारणे गरजेचे होते. युक्रेन, इस्रायल या भागात युद्धे सुरू आहेत भारतासाठी इतर दहशतवादी संघटनांचे आव्हानही आहेच. १०० टन म्हणजे जवळपास १० मोठे ट्रक भरेल इतके सोने. ते वाहून आणण्यासाठी २० मोठ्या हत्तींइतक्या जागेची गरज आहे. त्याचे बाजारातील मूल्य जवळपास ८.५ अब्ज डॉलर म्हणजे ७,०९,२२,०८,७५,००० रुपये होते. विशेष म्हणजे भारतात सोने आणण्यासाठी आरबीआयने सीमा शुल्कात सूट दिली आहे. परंतु आयातीवर आलेल्या एकात्मिक जीएसटीमध्ये मात्र कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. कारण हा कर राज्यांशी सामायिक केला जातो. हे सोने आणण्यासाठी भारतीय वायुसेनेच्या सी १७ ग्लोबमास्टर या भारताच्या सर्वात मोठ्या मालवाहक विमानाचा वापर करण्यात आला. ते एका वेळी ८० टन वजन वाहू शकते. भारतीय वायुसेनेकडे अशी ११ विमाने आहेत. अत्यंत गोपनीयतेने कडेकोट सुरक्षेत हे शंभर टन सोने भारतात परत आणण्यात आले.
Gold : global economy मुंबईतील मिंट रोडवरील रिझर्व्ह बँकेच्या जुन्या कार्यालयाच्या इमारतीत सोने ठेवले जाते. याशिवाय नागपुरातील तिजोरीतही पूर्ण सुरक्षेसह सोने ठेवले जाते. आता आणलेले सोनेदेखील याच दोन्ही तिजोरींमध्ये ठेवण्यात आले आहे. सोने ही अत्यंत सुरक्षित संपत्ती आहे. ते अस्थिर संपत्तीच्या श्रेणीत मोडत सोन्याला संपूर्ण जगात सर्वाधिक लिक्विडिटी (तरलता) आहे, असे मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे युद्ध किंवा आर्थिक संकटांच्या काळात सोने स्थिर राहते किंवा त्याच्या किमती वाढतात. त्यामुळे भारतीयच नव्हे तर, सारे देशही सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याचाच पर्याय निवडतात हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे.