४२६ मतदान केंद्रांवर महिला राज!

    दिनांक :12-Nov-2024
Total Views |
मुंबई, 
केंद्रीय निवडणूक आयोगाने 'Women Controlled Polling Station' ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र' स्थापित करण्याचा आदेश दिला आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी ही केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे या मतदान केंद्रांवर महिला राज असणार आहे.
 
 
Women Polling Station
 
महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सर्व महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. या सर्व केंद्रांत कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.
सर्वांत कमी अन् सर्वांत जास्त
'Women Controlled Polling Station' नाशिक जिल्ह्यात सर्वांत जास्त ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, qहगोली जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे प्रत्येकी तीन केंद्र असणार आहेत.
जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र
अहमदनगर १२, अकोला ६, अमरावती ८, औरंगाबाद १३, बीड ८, भंडारा ८, बुलढाणा ७, चंद्रपूर ९, धुळे ५, जालना ६, कोल्हापूर १०, लातूर ६, मुंबई शहर १२, नागपूर १३, नांदेड ९, नंदुरबार ४, उस्मानाबाद ४, पालघर ६, परभणी ८, पुणे २१, रायगड ९, रत्नागिरी ६, सांगली ८, सातारा १७, ठाणे १८, वर्धा ९ आणि यवतमाळ ७.