- पोटनिवडणुकीतही रक्तरंजित संघर्ष!
कोलकाता,
Bengal violence : पश्चिम बंगालमध्ये सहा विधानसभेच्या जागांसाठी बुधवारी झालेल्या मतदानादरम्यान सकाळी उत्तर २४ परगणा जगतदल भागात तृणमूल काँग्रेसचे नेते अशोक साहू त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी बॉम्ब फेकत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. राज्याच्या विविध भागांतून हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्याचा दावा, विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी केला आहे.
गोळी लागल्याने अशोक साहू यांचा मृत्यू झाला. ते एक प्रामाणिक व्यक्ती होते आणि कधीही भ्रष्ट गुंतले नव्हते. पोलिसांना खर्या घटनेबद्दल सर्व काही माहीत आहे, असे साहू यांच्या भावाने सांगितले. तृणमूलचे माजी वॉर्ड अध्यक्ष अशोक साहू हे चहाच्या दुकानात बसले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Bengal violence : या प्रकरणाचा तपास सुरू आहे, बराकपूरचे आयुक्त आलोक राजोरिया यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर सांगितले. पोटनिवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सीआरपीएफच्या १०८ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. तालडांगरा येथे २२, मेदिनीपूर येथे १९, मदारीहाट, सीताई आणि हरोआ येथे प्रत्येकी १८ आणि नैहाटी येथे १३ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, हिंसाचाराच्या विविध घटना आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील सीताई, मदारीहाट नैहाटी, हरोआ, मेदिनीपूर आणि ताल्डांगरा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. दरम्यान, तृणमूलचे खासदार जगदीश बसुनिया यांनी दावा केला की, कूचबिहारमधील मतदान प्रक्रियेत बीएसएफ हस्तक्षेप करत आहे.
धमकीचा व्हिडीओ व्हायरल
राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते, शुभेंदू अधिकारी यांनी एक्सवर व्हिडीओ शेअर केला असून, मंगळवारी रात्री आलेले गुंड सीताई विधानसभा मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांना धमकावताना दिसल्याचा आरोप केला. हे ममतांच्या राजवटीत खर्या लोकशाहीचे उदाहरण आहे, अशी पोस्ट शुभेंदू अधिकारी यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवर शेअर केली आहे.