प्रफुल्ल व्यास
वर्धा,
Maharashtra Election : लोकसभा निवडणुकीत आर्वी चांगलीच चर्चेत आली. अगदी काँग्रेसमधून थेट शरद पवार गटात प्रवेश घेऊन अमर काळे खासदार झाले. आता विधानसभा निवडणुकीत तर तिकीट न मागताच मयूरा अमर काळे यांना शरदचंद्र पवार राकाँकडून तिकीट देण्यात आले. तर भाजपाने देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिली. एकाच घरात खासदार आणि आमदारकीची तिकीट दिल्याने मतदार संघात असंतोष असताना खा. अमर काळे यांनी आपली लढत दादाराव केचे, सुमित वानखेडे यांच्यासोबत नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असल्याचा व्हीडिओ आता समाजमाध्यमांवर चांगलाच धूम करतो आहे.
शरदचंद्र पवार राकाँचे प्रदेश प्रवक्ता कराळे मास्तर यांनी दोन दिवसांपूर्वी आपली खदखद व्यक्त केल्यानंतर खा. अमर काळे यांनी कराळे या मतदार संघातील नसल्याने त्यांना तिकीट देण्याचा प्रश्नच नव्हता. मयूरा काळे यांनी तिकीट मागितले नव्हते. त्यांचा अर्जही नव्हता. पुण्यात झालेल्या मुलाखतींना त्या नव्हत्या. येथुन 7 जणांनी उमेदवारी मागितली होती. परंतु, पक्षाने आपल्याला विधानसभा लढायची असल्याचा आदेश दिल्याने त्यांची उमेदवारी दाखल करण्यात आली. निवडणूक ही संधी आहे. आम्ही निवडणूक लढतो आहे. परंतु, मयूरा काळे यांची लढाई दादाराव केचे किंवा सुमित वानखेडे यांच्यासोबत नसुन ती लढाई फडणवीसांसोबत असल्याचे खा. अमर काळे यांनी केल्याचा व्हीडिओ आता जिल्ह्यात फिरतो आहे.
आर्वीत भाजपा महायुतीने सुमित वानखेडे यांना तिकीट दिले. ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक वर्षांपासुन असुन त्यांनी स्वीय सहाय्यक, विशेष कार्य अधिकारी, मानद सचिव आदी जबाबदार्या पार पाडल्या. दरम्यान, आर्वी विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. लिफ्ट इरिगेशन, औद्योगिक वसाहत, शासकीय रुग्णालय आदींची मुहूर्तमेढ केली. विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्यासह सुमित वानखेडे यांनी तिकीट मागितले होते. या चढाओढीत सुमित वानखेडे यांना तिकीट मिळाले. आ. केचे यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घेतल्याने आर्वीत भाजपाची बाजू मजबूत होत असताना काल खा. अमर काळे यांनी आपली लढाई फडणवीसांसोबत असल्याचे स्पष्ट केल्याने खा. काळे यांना वानखेडेंमध्ये फडणवीस दिसु लागले अशी चर्चा रंगू लागली आहे.