- राज ठाकरेंचे खळबळजनक वक्तव्य
मुंबई,
Raj Thackeray : मी आणि उद्धव एकत्र येऊ नये, यासाठी लोक प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये आतले आणि बाहेरचे अशा सगळ्यांचा समावेश आहे, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारणाला पुन्हा नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Raj Thackeray : राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले. तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येणार का, प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी उत्कंठा वाढवणारी अनेक वक्तव्ये केली. मी माझ्याकडून ‘अलर्ट’ असतो. अनेक गोष्टी माझ्या कानावर येत असतात. हा असे बोलला... तो तसे म्हणाला... अशा गोष्टी मला कळतात. पण, असल्या गोष्टी मी ऐकत नाही. उद्धव ठाकरे आणि मी एकत्र यायला पाहिजे, असे वाटणे वेगळे आहे. व्हायचे असते, तर ते कधीच झाले असते. समोरून त्यांच्याकडून काही लोक बोलत असतात, सांगत असतात, पण मी काय करणार, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येणे हा माझ्या इच्छेचा किंवा माझ्या एकट्याचा विषयच नाही. प्रश्न असा आहे की, यात चर्चा होणे गरजेचे आहे. चर्चा जर होतच तर त्या बोलण्याला काय अर्थ आहे. तुम्ही जगभरात बघितले, तर एकमेकांचे वर्षानुवर्षाचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येऊ शकतात. पण, उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जवळची वाटते, भाऊ जवळचा वाटत नाही. यावर मी काय बोलणार, अशी हतबलता राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
मी भाजपासोबत ‘कम्फर्टेबल’
Raj Thackeray : मनसेच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होणार, असे विधानही राज ठाकरेंनी केले होते. त्यासंदर्भात ते म्हणाले, सध्याचे वातावरण तसे आहे, ज्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार हे आमच्या पाठिंब्याशिवाय स्थापन होऊ शकणार नाही. जर विषय भाजपाचा असेल तर, मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हापासून आणि माझा पक्ष काढल्यानंतरही माझे चांगले संबंध भाजपासोबत चांगले राहिले. प्रमोद महाजन, गोपीनाथराव, या सर्वच नेत्यांसोबत माझे सुरुवातीपासून संबंध आले. त्यामुळे, आपल्यासाठी एक कम्फर्ट झोन असतो, मला वाटते भाजपासोबत मी पहिल्यापासून कम्फर्टेबल आहे, ज्यांसोबत मी चर्चा करू शकतो.